बासमती तांदळाच्या निर्यातीत पाकिस्तानची कामगिरी भारतापेक्षा सरस

बासमती तांदळाच्या निर्यातीत भारताचा वाटा घसरला आहे. इराणमधून खरेदी घटल्यामुळे हा फटका बसल्याचे मानले जात आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान हा बासमती तांदळाचे उत्पादन आणि निर्यातीत खूपच छोटा खेळाडू आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताचा निर्यातीचा आलेख घसरत असताना पाकिस्तानने मात्र निर्यात वाढवण्याची कामगिरी केली आहे.
Basmati export
Basmati export

बासमती तांदळाच्या निर्यातीत भारताचा वाटा घसरला आहे. इराणमधून खरेदी घटल्यामुळे हा फटका बसल्याचे मानले जात आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान हा बासमती तांदळाचे उत्पादन (Basmati Rice Production) आणि निर्यातीत खूपच छोटा खेळाडू आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताचा निर्यातीचा (India's Basamati Export) आलेख घसरत असताना पाकिस्तानने मात्र निर्यात वाढवण्याची कामगिरी केली आहे.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर कालावधीत भारतातून बासमती तांदळाची निर्यात जवळपास १९ टक्क्यांनी घटली आहे. तर पाकिस्तानने मात्र २८.५ टक्क्यांनी निर्यात वाढवली आहे. हिंदू बिझनेसलाईन या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या वर्षी भारताने सुमारे ४६ लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला. मागील आर्थिक वर्षात कोरोनाचे संकट तीव्र असूनही भारताने चांगली कामगिरी केली होती. त्याआधीच्या वर्षात (२०१९-२०) निर्यात सुमारे ४४ लाख टन  राहिली, असे  ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (AIREA) कार्यकारी संचालक विनोद कौल यांनी सांगितले. भारताचा इराणशी ऑईल फॉर फुड (अन्नाच्या बदल्यात तेल) करार होता.  परंतु भारताने मे 2019 पासून इराणमधून क्रूड आयात करणे बंद केले. त्यामुळे इराणला भारताकडून बासमती तांदळाची खरेदी कमी करावी लागली.   तोपर्यंत भारतीय बासमती निर्यातीत इराणचा वाटा ३४ टक्के होता.

पाकिस्तानची निर्यात वाढली - 

अपेडाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-डिसेंबर २०२१ दरम्यान भारताची बासमतीची निर्यात घटून २७.४५ लाख टनावर आली. त्याचे मूल्य २३८२ दशलक्ष डॉलर्स होते. मागील वर्षी याच कालावधीत ३३.८१ लाख टन निर्यात झाली होती. त्याचे मूल्य २९४७ दशलक्ष डॉलर्स होते. 

पाकिस्तानने यंदाच्या हंगामात ४.१४ लाख टन बासमती तांदळाची निर्यात केली. मागील वर्षी २.९३ लाख टन तांदूळ निर्यात करण्यात आला होता. थोडक्यात यंदा पाकिस्तानच्या बासमती निर्यातीत २८.५८ टक्के वाढ झाली. भारताशी तुलना करता बासमती तांदूळ निर्यातीचे एकूण आकारमान आणि पैशातील मूल्य अगदीच कमी आहे. परंतु आधीच्या वर्षातील निर्यात कामगिरीशी तुलना करता पाकिस्तानने मोठी मजल मारल्याचे दिसते. भारताची बासमती निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के घटलेली असताना पाकिस्ताने निर्यातीत २८.५८ टक्के वाढ नोंदवली आहे.

युरोपीय संघातील तांदूळ बाजारात पाकिस्तानचा वाटा २५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. भारताचा वाटा १६ टक्क्यांच्या आसपास आहे. भारतात पाण्याच्या टंचाईमुळे बासमती तांदळाच्या लागवडीच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे कीडनाशकांचे अंश (रेसिड्यू) राहत आहेत. या समस्येमुळेही युरोपमधील निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com