Monsoon Update : देशात यंदा पाऊस बेताचाच

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाप्रमाणे अगदी काटेकोरपणे पाऊस झाला तरच राज्यात चांगले पाऊस म्हणावे लागेल. पाऊसमानात थोडाही फरक झाला तर राज्यातील परिस्थिती बिघडू शकते.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

Weather Update : आपल्याला लागणारे पाणी मग ते पिण्यासाठीचे असो की शेती-उद्योगासाठीचे असो याचा एकमेव स्रोत मॉन्सून आहे. भारताची एकंदरीतच अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने मॉन्सूनबाबत देशात फारच उत्सुकता असते.

त्यातच सध्या देशभर बेमोसमी पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच यावर्षीच्या मोसमी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच वर्तविला आहे. देशात सरासरी ८७ सेंटीमिटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो.

यावर्षी सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता ही सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के आहे. सरासरीच्या कमी पावसाची शक्यता २९ टक्के तर ९० टक्केहून कमी पावसाची शक्यता (दुष्काळ) २२ टक्के आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व पावसाच्या अंदाजाच्या प्रमाणात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता हवामान विभागच वर्तविते.

मुळात सर्वसाधारण पावसाची रेंज (९६ ते १०४ टक्के) ही खूप मोठी आहे. त्यातही उणे-अधिक पाच टक्क्यांचा फरक पडू शकतो. त्यामुळे सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस कमी अधिक म्हणजे तो ९१ ते १०१ टक्के होतो.

Monsoon Update
IMD Prediction 2023 : आयएमडीचा पावसाचा अंदाजः शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज की धोक्याचा इशारा?

यात १०१ टक्के म्हणजे चांगला पाऊस तर ९१ टक्के म्हणजे जवळपास दुष्काळच म्हणावा लागेल. हा सर्वसाधारण पाऊसमानातील फरक आहे. सरासरीच्या कमी पावसाची शक्यता २९ टक्के तर खूपच कमी पावसाची शक्यता २२ टक्के असून त्यात उणे पाच टक्के पाऊस झाला तर फारच भीषण परिस्थिती ओढवेल.

पाऊस किती पडतो यापेक्षा त्याचे आगमन, देशभरातील वितरण आणि परतीचा प्रवास याला खूप महत्त्व आहे. पावसाचे आगमन देशात तसेच राज्यात अगदी ठरावीक वेळेत व्हायला पाहिजेत. पावसाचे आगमन उशिरा झाले तर पेरण्या विस्कळीत होतात.

शेतकऱ्यांचे पीक नियोजन बिघडते. दुबार पेरणीचा खर्चही वाढतो, शिवाय खरीप हंगामात पीक पेरणीला जेवढा विलंब तेवढी उत्पादन घट होते. पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला, परंतु त्याचे वितरण असमान असेल तर तो नुकसानकारकच ठरतो.

याउलट सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा थोडा कमी पाऊस झाला, परंतु त्याचे वितरण समान असेल तर तो शेतीसाठी चांगला समजला जातो. यावर्षीच्या पाऊसमान वितरणाच्या नकाशावर नजर टाकली तर पिवळा रंगच डोळ्यात भरतो.

नकाशातील पिवळा रंग कमी पाऊस दर्शवितो. मागील तीन-चार वर्षांपासूनचे पाऊसमान पाहिले तर कुठे जास्त तर कुठे कमी असा पाऊस होऊन शेवटी तो सरासरी इतका किंवा त्यापेक्षा थोडा अधिक होत असे. यावर्षी मात्र बहुतांश राज्यांत कमी पाऊसमान नकाशावरून तर दिसते.

Monsoon Update
Monsoon Rain : पावसाच्या अंदाजासाठी ‘एल निनो‘ घटक महत्त्वाचा...

महाराष्ट्र राज्यात तर यंदा कमी पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाप्रमाणे अगदी काटेकोरपणे पाऊस झाला तरच राज्यात चांगले पाऊस म्हणावे लागेल. पाऊसमानात थोडाही फरक झाला तर राज्यातील परिस्थिती बिघडू शकते.

तसेच मागील काही वर्षांपासून राज्यात पाऊस लांबत असल्याने खरिपात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊन पुढील रब्बी हंगामही धोक्यात येतोय. तत्पूर्वी काही वर्षे परतीचा पाऊस आलाच नसल्याने खरिपातील पिकांना ताण पडून उत्पादन घटले, तर रब्बी हंगामात टंचाई निर्माण झाली.

यावर्षी तर एल-निनोची स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. एल-निनो म्हणजे पाऊस कमी पडतोच असे नाही परंतु या स्थितीत कमी पाऊसमानाची शक्यता अधिक असते. त्यामुळे शासन-प्रशासनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत असे सर्वांनी सावध राहायला हवे.

मॉन्सून आगमनाला अजून दोन महिने आहेत. मे अखेरीस यापेक्षा अचूक, सुधारित अंदाज हवामान विभाग जाहीर करणारच आहे. तोपर्यंत बेताचाच पाऊस लक्षात घेऊन कामाला लागायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com