‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा

'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' हे एक मिथक आहे. त्यामुळे शेती करणारे त्या कथित प्रतिष्ठेत कायमचे अडकून पडले. अर्थात आज चित्र बदललंय. शेती करतोय, हे लपवण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची प्रचंड स्पर्धा, वशिलेबाजी, लाचखोरी यावरून सगळ्यांनाच सरकारी नोकरी कितीतरी प्रिय असल्याचं सिध्द होतं. याउलट शेतीत कामासाठी साधा मजूरही मिळणं मुश्किल बनलंय, हे चित्रच बोलकं आहे.
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा

"जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप समृद्धी होती. घरात खाण्या-पिण्याची चंगळ होती. शेतकरी खूश होता. तो आनंदानं शेती करत होता. सगळी आबादीआबाद होती. मात्र आधुनिक शेतीनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. नव्या तंत्रामुळं शेती तोट्यात आली. शेतकरी असमाधानी बनला...."

असं कोणी म्हणायला लागलं की, मी अनुमान काढतो की, याने किंवा याच्या बापजाद्याने कधीही शेती केलेली नाही. कुठल्या तरी कथा-कादंबऱ्यांत किंवा सिनेमात याने ही जुनी शेती(agriculture) बघितली असावी. किंवा मग जाणीवपूर्वक घेतलेलं हे ढोंग असावं. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' हे एक मिथक आहे. त्यामुळे शेती करणारे त्या कथित प्रतिष्ठेत कायमचे अडकून पडले. अर्थात आज चित्र बदललंय. शेती करतोय, हे लपवण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची प्रचंड स्पर्धा, वशिलेबाजी, लाचखोरी यावरून सगळ्यांनाच सरकारी नोकरी कितीतरी प्रिय असल्याचं सिध्द होतं. याउलट शेतीत कामासाठी साधा मजूरही मिळणं मुश्किल बनलंय, हे चित्रच बोलकं आहे. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून माझ्या शेतीबद्दलच्या आठवणी ताज्या आहेत. पहिल्यांदा मला आठवतो तो माझ्या शेताचा रस्ता. हागणदारीतून, नदीतून, चिखलातून, काट्याकुट्यातून, पाणंदीतून जाणारा तो रस्ता. उन्हाळ्याचे तीन-चार महिने सोडले तर कायम पाण्यातून, चिखलातून जावं लागायचं. पायात हमखास काटे मोडायचे. सुई हातात घेऊन पाय टोकरणं, हा ठरलेला कार्यक्रम असायचा. पायाच्या बोटांना चिखल्या व्हायच्या. ते पांढऱ्या बोटांचे पाय बघताना मलाच कसं तरी व्हायचं. मी रात्री एव्हरेडी कंपनीची दोन सेलची बॅटरी एका हातात आणि डब्बा दुसऱ्या हातात घेऊन शेताकडं जागलीला जायचो. वडील शेकोटी पेटवून वाट बघत बसलेले असायचे. हिवाळ्यात(winter) शेकोटीसमोर बसलो की, पुढच्या बाजुनं पोळायचं तर पाठ गारठलेली असायची. आज या जागली बंद झाल्या आणि हा त्रासही! त्या काळात शेतातून मालवाहतूक करण्यासाठी बैलगाडी हे एकमेव साधन होतं. बैलगाडीसाठी हा रस्ता अधिकच भयानक होता. शेत ते गाव या एक किमीच्या अंतरात दोन ठिकाणं अशी होती की तिथं वर्षातून एक-दोन वेळा गाडी उलथायची, चाक मोडायचा, बैल पडायचे किंवा जू मधून मान काढून घ्यायचे. एकदा गाडीतून पडून माझं डोकं फुटलं होतं. ते आठवलं तर आताही अंगावर काटा येतो. आज मात्र चित्र बदललंय. आदळत-आपटत का होईना आज या रस्त्यावरून चार चाकी वाहनं जातात. अगदी कार सुध्दा. दुचाकी तर थेट वावराच्या बांधावर जाते. जुन्या शेतीचे गोडवे गाणाऱ्यांना रस्त्याचं हे दु:ख माहिती नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आधुनिक यंत्रांचा. शेतीतील बैलांची संख्या कमी झाली म्हणून जे रडताहेत, ते शेती करणारे नाहीत. ते कथित सेंद्रीय शेतीचं कौतुक करणारं आहेत. आज ट्रॅक्टर नसता तर, निम्मी शेती पडीक पडली असती. नांगरणी, पाळी असो की पेरणी; ही कामं ट्रॅक्टरमुळे सुलभ झाली आहेत. शारीरिक कष्ट वाचले आणि वेळही. पूर्वी धान्याच्या राशी आठवडा-आठवडा, कधी पंधरवडाभरही चालायच्या. बैलाद्वारे मळणी व्हायची. शेवटी माणसांना कणसं काठ्याने बडवावी लागायची. योग्य वारा लागला नाही तर, घंटोनघंटे उधळणी चालायची. ज्वारीच्या कुसामुळं सगळं अंग  खाजायचं. डोळ्यांत कचरा जाऊन ते लाल व्हायचे, कचकच करायचे. धान्याची रास म्हणजे बैलांसह गडीमाणसांचे बेहाल असायचे. त्यावेळी दुसरा पर्याय नसल्यानं, हे करावंच लागायचं. आज मळणीयंत्रामुळे शेकडो पोत्यांच्या राशी काही तासात होतात. आज कोणाला ‘तू बैलाने मळणी करून रास कर,' असं म्हटलं तर त्याला वेड्यात काढतील. शिवाय आज केवळ बैल सांभाळण्यासाठी वार्षिक सव्वा लाख पगाराचा गडी कोणालाही परवडणार नाही. बहुतेकांनी बैल ठेवणं बंद केलं ते यामुळेच! पूर्वीच्या शेतीत गुंतवणूक कमी होती. साहजिक उत्पादनही कमी होतं. शेतकऱ्यांच्या शेतावर जनावरांसाठी गोठे असायचे. लाकूड आणि गवताचा वापर करून बनवलेले. माणसांसाठीही तोच निवारा असायचा. पावसाळ्यात ते गोठे गळायचे. दगडी खिळपटात साप निघायचे. पावसाची झड लागली की छपरातून पाणी यायचं. विजांचा कडकडाट सुरू झाला की, जिवाचा थरकाप व्हायचा. तरीही जनावरांच्या शेणा-मुताशेजारीच आम्हीही तासनतास बसायचो. दुसरा पर्यायच नव्हता. आज बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पत्र्याचा पक्का निवारा आहे. ज्यांना गवताच्या गोठ्यांचा अनुभव आहे; तेच या पत्र्याच्या शेडचं मोल जाणू शकतात. जुन्या शेतीचं गुणगान करणाऱ्या महाभागांना देशात झालेल्या हरित क्रांतीबद्दल खूपच राग आहे. पण ते हे विसरतात की, त्यावेळची पारंपरिक शेती जनतेची भूक भागवायला असमर्थ ठरली होती. त्यामुळे इतर देशातून अन्नधान्य आयात करण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी हरित क्रांतीची कास धरावी लागली. परंपरागत बी-बियाणे आणि शेती मशागतीची पध्दत जर एवढी चांगली होती तर, ती लोकांची भूक का भागवू शकत नव्हती, याचे समर्पक उत्तर या ‘जुनं ते सोनं' म्हणणाऱ्यांकडं नाही. जीवनमान म्हणून विचार केला तर, हरित क्रांतीनंतरच शेतकऱ्यांचं जीवनमान सर्वार्थानं सुधारलंय. मला आजही बालपणीचा काळ स्पष्ट आठवतोय. ५२ एकर जमिनीचा मालक असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मूनही, घरात सुबत्ता अशी नव्हती. मल्ली, झिंगरी नावाची उंच वाढणारी पांढरी ज्वारी उत्पादनाला जेमतेम होती. कधी या ज्वारीच्या कणसांना दाणेच भरायचे नाहीत. त्यावर्षी ज्वारी 'हिसाळ्या' गेली असं म्हणायचे. त्या वर्षी हाल-बेहाल व्हायचे. हरित क्रांतीच्या सुरूवातीला आलेली संकरित ज्वारी पांढरी शुभ्र असायची. कधी ही हायब्रीड ज्वारी तर कधी पिवळी ज्वारी खावी लागायची. गव्हाची चपाती, पोळी फक्त सणावाराला किंवा कोणी पाहुणा आला तरच केली जायची. भाताचीही तीच स्थिती होती. भात खायला मिळणं हे संपन्नतेचं लक्षण मानलं जायचं. दूध, दही, ताक, तूप मात्र भरपूर असायचं. मात्र केवळ यावरच शेतकरी कुटुंबात आनंद ओसंडून वाहात होता, असं म्हणणं वास्तवाला धरून नाही. हरित क्रांतीनंतरच पंजाबातील गहू, तांदूळ देशभरात उपलब्ध होऊ लागला. अन्यथा आजही गहू, तांदूळ हे मुठभरांचंच अन्न राहिलं असतं.

 हे हि पहा : पूर्वीच्या शेतकऱ्यांकडं बैलगाडी हेच वाहन होतं. मालवाहतूक आणि जवळच्या प्रवासासाठीही. साधी सायकल बाळगण्याचीही त्यांची ऐपत नव्हती. आज अनेक शेतकऱ्याकडं किमान एक तरी स्वयंचलित दुचाकी आहे. केवळ शेतीवर अवलंबून नसणाऱ्या शेतकऱ्यांकडं चारचाकीही आहेत. कपड्यांच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी धोती, सदरा, फेटा किंवा टोपी, पायात जाड चामड्याचा बुट हाच शेतकऱ्यांचा वेष असायचा. त्याचेही दोनच जोड असत. आज या वेषातील शेतकरी शोधावा लागेल. सुट, बुट, जिन्स वापरणारे शेतकरी आज सहज पाहायला मिळतील. पूर्वी शेती करणारे बहुतांश शेतकरी अशिक्षित होते. अक्षरओळख असणारे अपवादात्मकच. आज उच्च शिक्षण घेऊन अनेकजण इच्छेने वा अनिच्छेने शेती करीत आहेत. साहजिकच या शेतकऱ्यांची जीवनशैली आधुनिक म्हणावी अशीच आहे. ही कौतुकाचीच बाब आहे. जुन्या काळच्या शेतीतही अवर्षण, अतिवृष्टी, गारपीट, रोग, किडी, वन्य प्राणी हे जोखमीचे विषय होते. आज हे विषय तर जोखमीचे आहेतच शिवाय त्यात आणखी भर पडलीय. मनुष्यबळाची टंचाई ही सगळ्यात गंभीर समस्या आहे. जुन्या शेतीच्या तुलनेत आजच्या शेतीत अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झालीय; मात्र उत्पादन खर्चही वाढलाय. त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करू शकत नाही. शिक्षण, आरोग्य, रूढीपरंपरेने होणारी लग्नं या सध्या मोठ्या खर्चिक बाबी बनल्यात. या गरजा कोरडवाहू शेतीतून भागणं अवघड आहे. त्यातून नैराश्य वाढीला लागलं आहे. कोरडवाहू शेतीवर माणूस जेमतेम जगू शकतो. नोकरदारांसारखं पांढरपेशे आयुष्य त्याला या शेतीतून मिळू शकत नाही. पूर्वीच्या शेतीमध्ये अफाट शारीरिक कष्ट होते. आजच्या शेतीत हे कष्ट खूप कमी झालेत. अज्ञानातून का होईना पूर्वी शेती करणं प्रतिष्ठेचं समजलं जायचं.  आज शेती करणाऱ्यांकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन चांगला नाही. हरितक्रांतीच्या आधी शेतकऱ्यांच्या शेतीकडून माफक अपेक्षा होत्या. गरजा कमी होत्या. अल्पसंतुष्टता होती. त्यामुळे वरवर तो शेतकरी सुखी-समाधानी वाटायचा. पूर्वी दोन-चार-सहा बैलांना कसता येईल एवढी शेती होती. वारसा हक्क कायद्यामुळे प्रत्येक नव्या पिढीत तिचे तुकडे होत गेले. आज बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक बनलेत. अशा परिस्थितीत पडिक जमिनी आणि झाडं संपणं ओघाने आलंच. आज अनेक कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती सोडून बाहेर पडायचंय; पण त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे नाइलाजाने ते शेतीत टिकून आहेत. शेतजमिनींच्या किमती मात्र वाढतच चालल्यात. विकत घेणाऱ्यांना शेती करण्यात रस नाही. ते शेतीकडं गुंतवणूक म्हणून बघतात.   शेतीत वैविध्य आहे. शेतकऱ्यांचे काही प्रश्न सारखे असले तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणून वेगळ्या समस्या आहेत. शेतीच्या प्रतवारीत, पिकांमध्ये, लागवडीत एवढं वैविध्य आहे की, त्यांचं सरसकटीकरण करता येत नाही. शेती हा अफाट प्रगतीचा, समृद्धीचा मार्ग नाही, यावर बहुतेकांचं एकमत आहे. परंतु आजच्या शेतीसमोरची दुखणी कितीही वाढली असली तरी, ही शेती हरित क्रांतीआधीच्या शेतीपेक्षा कमी कष्टाची, अधिक उत्पादन देणारी, अधिक चांगलं जीवनमान देणारी, आहे हे मात्र नक्की. जुन्या शेतीचं कौतुक करणाऱ्यांना कदाचित हेच खुपत असावं...!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.