Farmer Suicide : घोषणेला हवी कृतीची जोड

मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यांनी थातूरमातूर उपायांत अडकून न पडता शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरण्यासाठीचे प्रयत्न वाढवायला हवेत.
Farmer Suicide
Farmer SuicideAgrowon

मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त (Farmer Suicide Free) करू, अशी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे क्षण यावेत, यासाठी सरकार सर्वकाही करेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. खरे तर खुल्या अर्थव्यवस्थेच्या मागील तीन दशकांपासून देशात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मागील दोन दशकांत तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले (Farmer Suicide) आहे. शेती क्षेत्रात प्रगत समजले जाणारे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येत देशात आघाडीवर आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांत राज्यात अडीच हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दप्तरी आहे.

Farmer Suicide
महाराष्ट्रात ११ महिन्यांत २४९८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या !

मागील सहा महिन्यांतही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. सरकारच्या अधिकृत आकड्यांपेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप जास्त आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी मागील तीन दशकांपासून केंद्र आणि राज्यातील विविध पक्षांच्या सरकारांना अपयश आले आहे, सत्ता केंद्रातील असो की राज्यातील ती संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी आश्वासने द्यायची, सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा खूपच जिव्हाळा आपल्याला असल्याचा केवळ देखावा करायचा. प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी काहीही करायचे नाही, अशी एक फॅशनच होऊन गेली आहे.

Farmer Suicide
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घ्या 

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करू. राज्य दुष्काळमुक्त, शेतकरी आत्महत्यामुक्त करू अशी अनेक वचने मागील दीड-दोन दशकांत प्रत्येक राज्य सरकारकडून मिळाली. परंतु हे वास्तवात उतरविण्यासाठी कोणत्याही सरकारने शाश्वत कार्यक्रम, योजना, धोरण आखले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण तीच री ओढत राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करून टाकली आहे. ऐन खरीप पेरणीच्या हंगामात राज्यात सत्ता संघर्षाचे नाट्य रंगले आणि या पंधरा दिवसांत शेतीकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. जूनमधील उघडिपीने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. त्यामुळे शिंदे सरकारने खरीप आढावा बैठक तातडीने घेणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. उलट आपल्या पहिल्याच बैठकीत आरे कारशेडसह बुलेट ट्रेन अशा शहरी प्रश्नांबाबत तत्परता दाखवून आपला प्राधान्यक्रम एकप्रकारे स्पष्ट करण्याचे काम केले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट आहेत. असे असताना केंद्र-राज्य सरकार पातळीवर योग्य त्या उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होत असलेले नुकसान, घटते उत्पादन, निविष्ठांचा ढासळत चाललेला दर्जा, शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतीमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेती तोट्याची ठरतेय. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतोय अन् त्यातून त्यांच्या आत्महत्याही वाढताहेत. असे असताना मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यांनी पॅकेज, मदत, सवलत, अनुदान अशा थातूरमातूर उपायांत अडकून न पडता शेती शाश्वत - आर्थिकदृष्ट्या किफायतशीर कशी ठरेल, याकरिता प्रयत्न वाढवावे लागतील. शेतीसाठी पाणी-वीज या पायाभूत सुविधा तर आवश्यकच आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतीपूरक व्यवसायाद्वारे शेतीतील जोखीम कमी करून पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यायला हवा.

शेतीचा संस्थात्मक वित्तपुरवठा सुरळीत करणे, सक्षम पीकविमा योजनेतून शेतीला सुरक्षा पुरविणे, निविष्ठांच्या किमतीवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करणे, शेतीमालाला शाश्वत परवडणारा भाव मिळवून देणे, ग्रामीण शिक्षण- आरोग्याच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा उपायांवर शासनाने भर द्यायला हवा. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली की झाले, असाही सरकारचा एक समज असतो. मात्र मागील आठ वर्षांत दोन वेळा कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. कर्ज परतफेडीची ताकद शेतकऱ्यांमध्ये आली म्हणजे त्यांच्या आत्महत्या थांबतील, हेही लक्षात घेतले पाहिजेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com