व्रतस्थ कर्मयोगी

डॉ. हापसे यांनी सेवा काळात तसेच सेवानिवृत्तीनंतरही ‘जे जे आपणांसी ठावे ते इतरांना सांगावे...’ या उक्तीप्रमाणे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरच नव्हे, तर थेट ऊस पिकाच्या मुळापर्यंत नेऊन पोहोचविण्याचे काम केले.
agrowon editorial
agrowon editorial

प्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे यांचे नुकतेच निधन झाले आहे. डॉ. हापसे यांचे ऊस शेतीतील अतुलनीय योगदान पाहता त्यांच्या निधनाने ऊस उत्पादक शेतकरी अन् साखर उद्योग यांची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, असेच म्हणावे लागेल. एखाद्या कार्यात वाहून घेणे कशाला म्हणतात याचे आदर्शवत उदाहरण डॉ. हापसे आहेत. नगर जिल्ह्यातील नेवासे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या डॉ. हापसे यांचे नोकरीतील आणि सेवा निवृत्तीनंतरचे ऊस शेती क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना ‘व्रतस्थ कर्मयोगी’ ही उपाधीच शोभून दिसते. पुणे येथील कृषी महाविद्यालयात बीएस्सी तसेच एमएसस्सी कृषीचे शिक्षण घेऊन त्यांनी डॉक्टरेट (वनस्पती शरीरक्रियाशास्त्र) पेन्सिल्हानिया स्टेट युनिव्हरसिटी, अमेरिका आणि आयएआरआय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण केली. त्यांच्या सेवाकार्याचे सुरुवातीचे एक दशक कृषी वनस्पतिशास्त्र विभागाशी संबंधित निर्देशक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ असे गेले. त्यानंतर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ऊस विशेषज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावर त्यांच्या एकंदरीतच कामाला कलाटणी मिळाली. पाडेगाव येथील संशोधन केंद्रात तसेच व्हीएसआय, (वसंतदादा शुगर इन्स्टिस्टूट) पुणे येथे कार्यरत असताना उसाच्या अधिक उत्पादनक्षम अन् अधिक साखर उताऱ्याच्या जाती तसेच उत्पादनवाढीचे प्रगत तंत्र विकसित करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.  

  आज आपण पाहतोय अनेक संशोधन संस्थाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचताना दिसत नाही. त्यामुळे त्या संशोधनाचा अथवा नवतंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग होत नाही. परंतु डॉ. हापसे यांनी सेवा काळात तसेच सेवानिवृत्तीनंतरही ‘जे जे आपणांसी ठावे ते इतरांना सांगावे...’ या उक्तीप्रमाणे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरच नव्हे तर थेट ऊस पिकाच्या मुळापर्यंत नेऊन पोहोचविण्याचे काम केले. उसात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढीसाठी ते शेवटपर्यंत झटत राहिले. व्यापारी व्यापार करताना रुपया उभा करण्याचा पहिला विचार करतो. मात्र शेतकरी शेतीतील नियोजन करत नाही, म्हणून तो तोट्यात आहे, शेतकऱ्याने रुपयाला पाच रुपये उभे करण्याचे तंत्र शिकले पाहिजे आणि ते सहज शक्‍य आहे, असा विचार मांडत त्यांनी शेतकऱ्यांना प्रयोगशील आणि व्यावहारिक बनविण्याचे काम केले. त्यामुळेच राज्यात एकरी सरासरी ३० टन ऊस उत्पादन मिळत असताना त्यांनी सुरुवातीला एकरी १०० टन, त्यानंतर एकरी १५० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर साध्य करून दाखविले. त्याही पुढील टप्पा म्हणजे गुजरातमध्ये एका कंपनीच्या सहकार्याने एकरी १७७ टन ऊस उत्पादनाचा प्रयोगही यशस्वी केला.

ऊस उत्पादकता वाढीसाठी ‘इक्रिसॅट’च्या (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स, हैदराबाद) माध्यमातून ‘ॲग्रोवन’ने जवळपास ३० ‘ऊस विकास परिसंवाद’ घेतले होते. त्यात डॉ. हापसे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. शाश्‍वत ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान सेवा कार्यात असताना आणि निवृत्तीनंतरही परिसंवाद, चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील नव्हे, तर जगभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख कोणी ‘चालते बोलते विद्यापीठ’ म्हणून तर कोणी ‘ऊस महर्षी म्हणून करतात. आपले राज्य ऊस आणि साखर उत्पादनात देशात आघाडीवर तर आपला देश या दोन्हीत जगात आघाडीवर असून, यात डॉ. हापसे या कर्मयोग्याचे मोलाचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com