उजळू देत आशेचे दीप...

शेतात पेरलेली स्वप्ने, आशेचे दीप चांगले उजळू देत आणि उत्पादक श्रम केले म्हणजे समृद्धी अर्थात लक्ष्मी शेतकऱ्यांच्या घरात नांदू देत.
agrowon editorial article
agrowon editorial article

आज दीपावली...लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्दशीसुद्धा! वसुबारस, धनत्रयोदशीनंतर नरकचतुर्दशी येते. त्यानंतर लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि शेवटी भाऊबीज असा हा पाच दिवसांचा सण. परंतु काही वेळा यातील दोन तिथी एकत्र येतात, तसे आज घडले आहे. माणसाने बौद्धिक किंवा उत्पादक श्रम केले तर समृद्धी घरात येते, असे म्हटले जाते. ही समृद्धी म्हणजेच लक्ष्मी आणि या लक्ष्मी पूजनाचाच आजचा दिवस! बळिराजाचा मुख्य हंगाम खरीप हा आहे. या हंगामातील धनधान्याच्या रूपाने शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आलेली असते. काही भागांत रब्बी पेरण्या उरकलेल्या असतात, तर काही भागांत पेरणीला थोडा अवधी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कष्टाच्या कामातून थोडे फुरसतीचे, आनंदाने जगण्याचे हेच ते सुगीचे अन् सणासुदीचे चार दिवस असतात. दिवाळी हा सण खूपच विलक्षण असा आहे. अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर अंधार घेऊन येणाऱ्या या सणामध्ये दिवे, पणत्या, आकाशकंदील लावून, घरादारावर रोषणाई करून आपण अंधाराचे साम्राज्य नष्ट करतो. म्हणून दिवाळीला प्रकाशपर्व अथवा प्रकाशाचा सण असे देखील म्हणतात. अर्थात, अंधाराच्या अंतातून प्रकाशाचा उदय होतो. हा काळ चैतन्यपर्व म्हणूनही ओळखला जातो.  राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष खूपच खडतर गेले आहे. वर्षाची सुरुवातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने झाली. ही कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागात अधिक तीव्र होती. त्यातच अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांमुळे अनेक कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले. जवळचा सोडून गेल्याचे दुःख गिळून बळिराजा खरिपाच्या तयारीला लागला. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी विक्रमी पेरणी झाली. परंतु निसर्गाने घात केला. अतिवृष्टी-महापुराने अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.   बळीचं राज्य यावं, असं वाटत असताना वरचेवर होतेय, स्वप्नांची होळी संकटांशी लढता, लढता  कशी साजरी होईल, शेतकऱ्यांची दिवाळी  सोलापूर जिल्ह्यातील महिला शेतकरी उज्वला शिंदे यांच्या कवितेच्या या चार ओळी शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती आणि त्यात आलेल्या दिवाळी सणाबाबत बरेच काही सांगून जातात. बिकट अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळी सण तरी उत्साह, आनंदात साजरा करता यावा म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या पातळीवर दिवाळीपूर्वी शासनाकडून मदतीच्या घोषणा झाल्या. पीकविमा कंपन्यांना नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याबाबतही शासनाकडून दरडावण्यात आले. परंतु दिवाळी संपत आली तरी सरकारी मदत आणि विमा भरपाईदेखील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी पोहोचली नाही.   अलीकडच्या काळात अस्मानी आणि सुलतानी संकटे शेतकऱ्यांसाठी काही नवीन नाहीत. दिवसेंदिवस या दोन्ही संकटात वाढच होत आहे. असे असले तरी ‘खचला तो शेतकरी कसला.’ सुख-दुःख पोटात घालून, अडीअडचणींना पाठीशी घालून बळिराजा दिवाळी सण साजरा करतोय. तसेच तो रब्बीच्या स्वागतासही सज्ज आहे. खरिपातील कसर रब्बीतून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. घरातील अंधारावर दीप, पणत्या लावून विजय मिळविण्याबरोबर त्यांनी शेतातही आशेचे दीप लावले आहेत, लावणार आहेत. शेतात पेरलेली स्वप्ने, आशेचे दीप चांगले उजळू देत आणि उत्पादक श्रम केले म्हणजे हमखास समृद्धी, अर्थात लक्ष्मी शेतकऱ्यांच्या घरात नांदू देत, हीच या दिवाळीनिमित्त, आजच्या लक्ष्मीपूजनानिमित्त अपेक्षा!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com