पेच हळद विक्रीचा! 

आपला बहुतांश हळदीचा व्यापार हा कच्च्या हळकुंडाचा आहे. हळदीचा पक्का माल तयार करणे, क्रीम, खाद्यान्ने व औषधी उत्पादने निर्माण करणे यात उत्पन्न वाढीच्या मोठ्या संधी आहेत.
agrowon editorial
agrowon editorial

कोरोना विषाणूला प्रतिबंधात्मक तसेच लागण झाल्यावर नियंत्रणात्मक उपायांमध्ये दूध-हळद घेण्याचा ट्रेड भारतातच नाही तर जगभर सुरू झाला आहे. मागील वर्षभरापासून याचा अवलंब अनेक जण करताहेत. त्यामुळे आपल्या देशासह विदेशातूनही हळदीला मागणी वाढली आहे. दरही बऱ्यापैकी मिळू लागलाय. परंतु लॉकडाउनमुळे तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या हळद उत्पादक प्रमुख राज्यांतील बाजारपेठा बंद असल्यामुळे या वर्षी जवळपास २० लाख क्विंटल हळद विक्रीविना शिल्लक आहे. हळदीचा विक्री हंगाम संपत आला आहे, नवीन लागवडीदेखील सुरू झाल्या आहेत. अशावेळी देशभरातील एकूण उत्पादनाच्या केवळ ५० टक्के हळदीचीच विक्री झाली असून तेवढीच शिल्लक आहे. मध्ययुगीन काळापासून जगाचे आकर्षण असलेल्या आणि आजही जागतिक उत्पादन आणि बाजारात दबदबा असलेल्या भारतीय हळद विक्रीची ही अवस्था चिंतेचा विषय आहे. 

देशात जवळपास ४० लाख क्विंटल हळदीचे उत्पादन होते. त्यांपैकी हंगामाच्या शेवटी ८ ते १० लाख क्विंटल हळद शिल्लक राहते. परंतु मागील दोन वर्षांपासून हळदीचा मुख्य विक्री हंगामातच (मार्च ते मे) कोरोनाचा संसर्ग वाढतोय. महाराष्ट्रासह देशभर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात आहे. लॉकडाउनमुळे बाजार समित्या बंद राहत आहेत. सांगलीची हळद बाजारपेठ देशात प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत परराज्यांतून हळद येते. या बाजारपेठेची वर्षाकाठची हळदीची उलाढाल ६०० कोटींची आहे. परंतु गेल्या वर्षीपासून परराज्यांतील हळदीला ब्रेक लागला आहे. स्थानिक हळदीची आवकही घटली आहे. परिणामी, गेल्या वर्षी सांगली बाजारपेठेची उलाढाल जवळपास निम्म्याने (२८० कोटींनी) घटली. या वर्षी तर देशासह आपल्या राज्यातही हळद उत्पादनात १५ ते २५ टक्के घटीचा अंदाज आहे. विशेष म्हणजे हळदीला मागणी आहे. शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक आहे. परंतु शेतकऱ्यांना हळदीची विक्री करता येत नाही, असा पेच निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीपासून हळदीची निर्यातही ठप्प आहे. या सर्वांचा परिणाम दरावर देखील होताना दिसतोय. 

या वर्षी राज्यात हळदीचा हंगाम थोडा उशिरा सुरू झाला. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होता. त्यामुळे हळदीला सुरुवातीला प्रतिक्विंटल ८००० ते ९००० रुपये असा चांगला दर मिळाला. राज्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर टिकून होते. परंतु त्यानंतर मात्र बाजारपेठा बंद, सौदे रद्द होत असल्यामुळे हळद विकायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. एकदा पाऊस सुरू झाला की हळदीला कीड लागते. त्यामुळे दर अजून कमी होणार आहेत. हळद साठवणुकीची सोय बहुतांश शेतकऱ्यांकडे नाही, अशा पेचात हळद उत्पादक अडकला आहे. यातील एक सकारात्मक बाब म्हणजे मराठवाड्यातील काही बाजारपेठांनी हळदीची खडी खरेदी सुरू केली आहे. या पद्धतीत गाडीतच मालाचे सॅम्पल पाहून सौदा ठरतो. खरेदी होते, शेतकऱ्यांना तत्काळ पैसा मिळतो.

अशाप्रकारे सांगलीसह देशभरातील बाजार समित्यांमध्ये गर्दी न करता आणि लॉकडाउनचे सर्व नियम पाळून हळदीची व्यवहार सुरू करायला पाहिजेत. असे केले तरच हळदीचा शिल्लक साठा मोकळा होऊन शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतील, त्याचा उपयोग खरीप हंगामासाठी होईल. आपला बहुतांश हळदीचा व्यापार हा कच्च्या हळकुंडाचा आहे. हळदीचा पक्का माल तयार करणे, क्रीम, खाद्यान्ने व औषधी उत्पादने निर्माण करणे यात उत्पन्न वाढीची मोठी संधी आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हळदीच्या अशा मूल्यवर्धनात पुढाकार घेतला तर विभागवार एकात्मिक मूल्यसाखळी विकसित होईल. यामुळे ठरावीक काळात मिळेल त्या दरात हळकुंडे विक्रीचा उत्पादकांवरचा दबाव दूर होईल. शिल्लक साठ्याची समस्याही दूर होईल.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com