साखर उद्योगाचे दिशादर्शक पाऊल

देशात सध्यातरी मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. परंतु प्रत्येकच हॉस्पिटलकडून अचानक ऑक्सिजनची वाढलेली मागणी आणि त्यानुसार पुरवठा करण्यात समस्या उद्‌भवत असल्याने टंचाई भासत आहे.
agrowon editorial
agrowon editorial

सुमारे पाच वर्षांपूर्वी या देशात हवा विकत घ्यावी लागेल, ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना दरदर भटकावे लागेल, ऑक्सिजनचा तुटवडा भासून हजारोंचे प्राण जातील, असे भाकीत कुणी केले असते तर त्यावर कुणीही विश्‍वास ठेवला नसता. परंतु आज देशभर ऑक्सिजनची टंचाई असून, पुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेकांचे प्राण जाताहेत. काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गळती होऊन तर कुठे ऑक्सिजन सिलिंडर अथवा टॅंकर वेळेवर न पोहोचल्याने पुरवठा खंडित झाल्याने कोरोनाबाधित रुग्ण पटापट मरताहेत. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. दिल्ली, महाराष्ट्रासह आता देशभरातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोना बाधितांचे प्राण वाचविणाऱ्या व्हेंटिलेटर बेड्स, रेमडेसिव्हिर, लस आणि ऑक्सिजन या चारही बाबींचा देशभर प्रचंड तुटवडा आहे. कोरोनाची वर्षभरापूर्वी आलेली पहिली लाट देशात कोणीही गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणा उद्‌ध्वस्त करण्याचे काम करून आता मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्यातच जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाने घातलेले थैमान थांबवून तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर बेड्स, रेमडिसिव्हिर इंजेक्शन, औषधे या आरोग्य सुविधांबरोबर लस आणि ऑक्सिजन यांची निर्मिती वाढवून पुरवठा सुरळीत करावा लागेल. अशावेळी राज्यातील काही साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची ही संकल्पना असून, त्यास कारखान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

भारतात दररोज सात हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होत असून, वैद्यकीय ऑक्सिजनची दररोजची मागणी पाच हजार मेट्रिक टनाची आहे. अर्थात मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. परंतु प्रत्येकच हॉस्पिटलची अचानकच वाढलेली मागणी आणि त्यानुसार पुरवठा करण्यात समस्या उद्‌भवत असल्याने टंचाई भासत आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत भारताने जवळपास नऊ हजार तीनशे मेट्रिक टन प्राणवायूची निर्यात देखील केली आहे. निर्यात केलेला प्राणवायू हा द्रवरूप होता. आणि तो औद्योगिक तसेच वैद्यकीय अशा दोन्ही कारणांसाठी वापरता येण्याजोगा होता. यावरून प्राणवायूबाबत शासनापासून सर्वजण किती गाफील राहिले आहेत, याचा प्रत्यय येतो. सध्याची ऑक्सिजनची वाढती मागणी त्यात तिसऱ्‍या लाटेचा विचार करून उत्पादन वाढवायला पाहिजे. परंतु त्यापेक्षाही मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. देशात प्राणवायू तुटवड्याचे महासंकट आलेले असताना टाटा, रिलायन्स आणि महिंद्रा असे अपवादात्मक वैयक्तिक पातळीवर ऑक्सिजननिर्मिती करता घेतलेला पुढाकार वगळता आयटी, ऑटोमोबाईल, कृषी निविष्ठांसह इतर निर्मिती उद्योग क्षेत्रांकडून काही प्रयत्न झालेले नाहीत. सर्वच उद्योगसमूह थेट ऑक्सिजननिर्मिती करू शकले नाही तरी सामाजिक जबाबदारीतून त्यासाठी अर्थसाह्य तर करू शकतात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. सामूहिक स्वरूपात ऑक्सिजन निर्मितीबाबत तर अजूनही कोणत्या क्षेत्राने विचार केलेला दिसत नाही. अशा वेळी राज्यातील साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीसाठी घेतलेला पुढाकार आदर्शवतच म्हणावा लागेल. साखर कारखाने तांत्रिकदृष्ट्या ऑक्सिजन उत्पादन करू शकतात. यांत काही अडचणी येणार आहेत. त्यावर मात करीत कारखान्यांना पुढे जावे लागेल. साखर कारखान्यांचे जाळे ग्रामीण भागात पसरलेले असल्यामुळे विभागवार ऑक्सिजनची वाहतूक आणि पुरवठा करता येईल. संकट काळात मदत करण्याचे साखर उद्योगाने उचललेले पाऊल सामूहिक क्षेत्रातील इतर उद्योगांसाठी दिशादर्शकच म्हणावे लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com