शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपन

शर्यतीचा शौक असणारी मंडळी पैदासकार मंडळीकडून अकरा ते बारा महिन्यांचे खोंड विकत घेतात. त्यांना विशिष्ट खाद्य आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. जी खोंड पळणाऱ्या बैलासारखे गुण दाखवतात, त्याप्रमाणे त्यांच्या शरीराची ठेवणदेखील दिसून येते, त्यांनाच वेगळे काढून पुढे विशिष्ट प्रशिक्षण त्यांना दिले जाते.
agrowon editorial article
agrowon editorial article

शर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान होत असते. खरेदी पावसाळ्यात कमी पण दिवाळीच्या दरम्यान त्यामध्ये वाढ होते. पशू बाजारात या पशुधनासह त्यासाठी लागणारे दोर, दोरखंड, पायातील, गळ्यातील, डोक्यावरील शोभेचे अलंकार, शर्यतीच्या बैलगाड्यांचे सुट्टे भाग विक्रीसाठी उपलब्ध असतात. विशिष्ट समाजातील मंडळी याचे उत्पादन करतात. ते सर्व अशा पशू बाजारातून विक्री करत असतात. आपल्या राज्यातील काही बाजार हे विशिष्ट जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर सोनखेडा, सारंगखेडा (धुळे) अकलूज (सोलापूर) हे घोड्यांच्या व्यापारासाठी, जेजुरी (पुणे) आणि मढी (अहमदनगर) हे गाढवांच्या खरेदी विक्रीसाठी, महूद, सांगोला, पंढरपूर, (सोलापूर) खरसुंडी, कवठेमहांकाळ (सांगली) माळेगाव (नांदेड) हे शर्यतींच्या बैलांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः पंढरपूर आणि खरसुंडी या ठिकाणी पुष्कळ पशुपालक आपल्याकडील दहा ते बारा महिने वयाची खोंड खरेदी विक्रीसाठी घेऊन येतात.

खोंड, बैल विक्री करणारे पैदासकार हे खरं तर गरीब पशुपालक स्थानिक देशी जनावरांचे संगोपन करून त्यांची वासरे स्थानिक बाजारात विकत असतात. त्यातून आपला उदरनिर्वाह चालवत असतात, गुजराण करत असतात. ही मंडळी बाजारातील एकूणच मागणीचा विचार करून त्या पद्धतीच्या गायी, खोंड सांभाळून बाजारातील मागणीप्रमाणे पैदास घेतात व त्याची विक्री करतात. पैदासकारांच्या उत्पादनांची, खोंडांची विक्री जर झाली नाही तर ते पोसत बसण्याचा खर्च या गरीब पशुपालक पैदासकारांना भोगावा लागतो. हे पैदासकार पशुपालक शक्यतो गाईंची विक्री करत नाहीत, पण खोंडांची मात्र विक्री करत असतात. या व्यवसायात महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील पुष्कळ कुटुंबे आहेत, विशेषतः माण, खटाव, (सातारा) आटपाडी, जत, खरसुंडी (सांगली) सांगोला, पंढरपूर (सोलापूर) या भागांत २० ते ३० जनावरांचे कळप सांभाळून हा व्यवसाय करत असतात. आता या मूळ पशुधनाची संख्या ४-५ प्रजातींवर येऊन ठेपली आहे, हे वास्तव आहे. एकूणच नैसर्गिक आपत्तींसह, बैलगाडा शर्यतीवरील बंदी हे मोठे कारण आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदीमुळे ४० ते ७० हजारांत विक्री होणाऱ्या खोंडाची विक्री आता आठ ते दहा हजारांपर्यंत होत आहे. जर कमी दरातही ही खोंडं विकली गेली नाहीत, तर मात्र त्यांचा सांभाळ करणे अवघड होते. आणि मग नाइलाजाने त्यांची विक्री वेगळ्याच कारणासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शर्यतीचा शौक असणारी मंडळी पैदासकार मंडळीकडून अकरा ते बारा महिन्यांचे खोंड विकत घेतात. त्यांना विशिष्ट खाद्य आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. पौष्टिक हिरवी वैरण, वाळलेल्या वैरणीसह, उडीद चुनी, शेंगदाणा पेंड, मका भरड, गहू, मोहरीचे तेल, दूध, अंडी अशा गोष्टीचा आहारात समावेश करतात. त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी नदी व तलावात पोहणे, जंगलातून पळवणे, वाळूतून चालवणे असे व्यायाम प्रकार करून घेतले जातात. संपूर्ण काळजी घेऊन त्यांना चांगल्या वातावरणात ठेवतात. जी खोंडं पळणाऱ्या बैलासारखे गुण दाखवतात, त्याप्रमाणे त्यांच्या शरीराची ठेवण दिसून येते. त्यांनाच वेगळे काढले जाते. आणि त्यांना विशिष्ट प्रशिक्षणासाठी निवडले जाते. खिलार, हल्लीकार, अमृतमहल आणि त्यांच्या उपप्रकारांतून अशा खोंडांची निवड केली जाते. पळण्यासाठी खोंडांची निवड करताना साधारणपणे खालील बाबींचा विचार केला जातो, जो अनुभवावर आधारित आहे.   कपाळावरील आठ्या ः जादा आठ्या असणारा खोंड/बैल हा थोडा रागीट व वेगाने पळणारा असतो. त्यामुळे खरेदी करताना अशा खोंडांना मागणी जास्त राहते.   डोक्याचा आकार ः टोकदार अशा लहान डोक्याचा आकार, शिंगे टोकदार मागे वळलेले असलेला खोंड/बैल वेगाने धावण्यासाठी अनुकूल वायुगतिशास्त्रीय (Aerodynamic) आकार असल्याचे समजले जाते.   खुरांची रचना ः ज्या खोंडाचे/बैलाचे खूर हे कमी फट असणारे, एकत्र असणारे असतात ते धावताना आपले वजन स्थिर राखून चांगले धावू शकतात.   उंदीर नख्या ः यासुद्धा कमी आकाराच्या, जमिनीपासून वर असतील तर बैल किंवा खोंड चांगला धावू शकतो. धावताना जमिनीला त्याची पकड मजबूत राहते.   गुडघे ः एकमेकांपासून ठरावीक लांब असणारे गुडघे हे नीट उभे राहण्यासाठी व पळण्यासाठी उपयुक्त असतात.   छाती ः छातीची फासळी ही रुंद, विस्तारीत व स्नायुयुक्त असावी.   पुठ्ठा ः (Pelvic Region) गोल व स्नायूने भरदार असावा. त्यामुळे धावण्याची शक्‍ती मिळते.   पोट ः सडपातळ असावे, साधारणपणे निमुळत्या नावेसारखा आकार असावा.   लिंग त्वचा ः ही शरीराबरोबर असावी. लोंबकळणारी नसावी.       गळ्याची पोळी ः (Dewlap) शरीराबरोबर न लोंबकळणारी असावी. तसेच एकूण वजन देखील शरीररचनेच्या तुलनेत असावे.

अशा गुणांच्या दोन, तीन वर्षांच्या खोंडाची किंमत ही दोन ते तीन लाखांपर्यंत सहज असते. काही वेळा या सर्व गुणांनी युक्त खोंड, बैल असेल, तर तो १० ते ११ लाखांपर्यंत विकू शकतो.  (संदर्भ : Running ability of bulls 2018)

डॉ. व्यंकटराव घोरपडे  ९४२२०४२१९५ (लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com