बदलती जीवनशैली अन् वाढते आजार

शरीराला आरामाची लागलेली सवय, लवकर न उठण्याची सवय, व्यायाम नाही, कसदार अन्नाची उणीव, मनोरंजनाच्या नावाखाली मनावर चढणारी नकारात्मक भावना, थोडक्यात काय तर आपण कितीही गावच्या मोकळ्या वातावरणात राहात असा, पण तुम्ही तुमच्या जगण्याला लावलेल्या सवयींमुळे आपलं आरोग्य आज धोक्यात आलंय.
agrowon editorial article
agrowon editorial article

जगात एकच गोष्ट शाश्वत आहे अन् तो म्हणजे बदल. हा बदल कधी आपल्यामुळे होतो तर काही परिस्थितीने घडतो. आपलं जगणं हेसुद्धा याच बदलाचा भाग आहे. बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून आपली जीवनपद्धती बदलत जाते. त्याचे परिणाम नेमके कसे, चांगले की वाईट हे येणारा काळच ठरवत असतो. पण म्हणून काय बदल व्हायचा थांबत नाही. मागील ६०-७० वर्षांचा काळ जरी बघितला तर आपल्या जीवनशैलीत झालेले बदल लक्षात येतील. हे बदल आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, नैसर्गिक, भौगोलिक, व्यावहारिक, राजकीय आणि अशा बऱ्याच दृष्टिकोनातून झालेले आहेत. या सर्वांचा आपल्या जगण्यावर कळत नकळत परिणाम झालाच आहे. जवळपास अर्धा भारत देश रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या आपल्या देशातील ७० टक्के लोकं ग्रामीण भागात राहतात. जगाच्या दृष्टीने ही फार मोठी बाजारपेठ आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यामुळे अनेक औद्योगिक संस्था आपला माल, सेवा या ग्रामीण भारतात विकू पाहतात. आणि मग पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत, जिभेचे चोचले वाढवणारे आणि नंतर पुरवणारे भरमसाठ पदार्थ, इंटरनेट सुविधा, मनोरंजन, आपलं जगणं सुसह्य, आरामदायी व कमी कष्टाचं होण्यासाठी म्हणून जे काही गरजेचं आहे ते सर्व सुरुवातीला दुकानात आणि आता आपल्या दारात, अगदी सहज उपलब्ध होऊ लागलंय. 

आधीच आपल्याकडे ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुतांश लोकांना शहरी जीवनशैलीचं आकर्षण असतं. मग तिथं आहे तसं आपलंही जगणं असावं म्हणून आटापिटा सुरू असतो. माझ्यासाठी नेमकं काय योग्य आहे ही भूमिका असायला हवी. पण प्रत्यक्षात शहरी जीवनशैलीचे अनुकरण करण्याच्या नादात अनेक अशा गोष्टी केल्या जातात की ज्या पुढं जाऊन तनामनाच्या आरोग्याला घातक ठरतात. याचा परिणाम म्हणून अनेक आजार आपल्याला सोबत करू लागतात. शहरी प्रदूषणापासून तुम्ही मोकळ्या हवेत जरी असला तरी तुमची जीवनशैली तुम्हाला आजारी बनवते. हे इतकं नकळत घडलंय की हा बदल कधी अंगवळणी पडला हे कळलंही नाही. जुनी लोकं सकाळी लवकर उठून, शेताला जाताना जेवण करून जायची, अधेमधे काही खायचं नाही. काही खाल्लच तर शेतातला रानमेवा असायचा. संध्याकाळी घरी आल्यावर, जेवायचं अन् दिवसभराच्या थकव्याने पाठ टेकवताच झोप लागायची. आधीचा हा दिनक्रम नैसर्गिक होता. आता त्यात बदल काय अन् कसा झाला ते पाहुया. 

रात्री उशिरा जागल्याने अपुरी झोप घेऊन लवकर उठायचे किवा उशिरा उठायचे. खूप गोड असा चहा प्यायचा, मग नाष्टा करायचा, शेताला जायचं असेल तर ते पण मोटारसायकलवर जायचं, तिथं काही काम करत असेल तर मधेमधे मोबाईल बघत राहायचा, कोणीतरी काहीतरी पाठवतं ते बघायचं, ऐकायचं, तेही नकळत डोक्यात साठत जातं. दुपारी जेवायचं, संध्याकाळी घरी आलं की चहा प्यायचा, गावात चक्कर मारायची, राजकारणावर गप्पा मारायच्या, टीव्हीच्या मालिका बघायच्या, रात्री उशिरा जेवायचं आणि मोबाईल बघत उशिरानेच झोपायचं. कमी अधिक स्वरूपात ग्रामीण भागातील लोकांची जीवनशैली ही अशीच बनलीय. आधीचं खाणं कसदार होतं म्हणताना, शेतीतलं अर्थकारण साधायच्या नादात, पिकाला भरमसाट रासायनिक खतं, कीडनाशकं वापरायची. आपणही घरी त्याच शेतातील शेतमाल खायचा अन् वर म्हणायचं, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. घरी गायी म्हशींनी गोठा भरलेला, रोजचं १०० लिटर दूध जातंय, पण घरी कोणी ग्लासभर दूध पीत नाही, घरी दही नाही की ताक नाही. ५० एकरांचा बागाईतदार शेतकरी घरी लागणारा भाजीपाला, वर्षभर लागणारे अन्नधान्य जेव्हा विकत आणायला लागतो, तेव्हाच आपण आपल्या आरोग्याचा सौदा केलेला असतो. घरात दर तीन-चार दिवसांनी एखादा तरी हॉटेलचा पदार्थ बनवला जातो, महिन्यातून दोन-तीन वेळा, बाहेर जेवायला जायचं कारण सापडतंच. शरीराला आरामाची लागलेली सवय, लवकर न उठण्याची सवय, व्यायाम नाही, कसदार अन्नाची उणीव, मनोरंजनाच्या नावाखाली मनावर चढणारी नकारात्मक भावना थोडक्यात काय तर आपण कितीही गावच्या मोकळ्या वातावरणात रहात असा, पण तुम्ही तुमच्या जगण्याला लावलेल्या सवयींमुळे आपलं आरोग्य आज धोक्यात आलंय. 

कर्करोग, अर्धांगवायू, हृदयविकार हे आपल्या घराघरांत येऊन पोचलेत, अन् हे कोणी दुसऱ्याने आणले नाहीत तर आपणच, आपल्या हाताने या आजारांना आपल्या घरचा, आपल्या शरीराचा पत्ता दिलाय. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अन् कधी रात्रीसुद्धा, शेतीची कामे सुरू असतात. अशा धावपळीत दोन वेळचं जेवायलाही वेळेत मिळत नाही. मेहनत करून पडक्या घराच्या ठिकाणी टुमदार बंगला बांधलेला असतो, पण त्यात दोन घटका निवांत आराम करायला फुरसत मिळत नाही. जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत अशीच अवेळी जेवत, अपुरा आराम करत मेहनत करायची आणि वयोमानाने जेव्हा आजार बळावतात तेव्हा मेहनतीने कमावलेले पैसे उपचारांवर खर्च करायचे. हे आजवरच्या असमाधानाचे कारण ठरत आलंय. जर या आयुष्याचा पर्याय शेतीत काम करण्याचा असेल तर ते करत असताना शरीर व मनाचे आरोग्य जपणं ही आजची गरज बनलीय. स्वप्न, काम, आरोग्य, आहार या सर्वांचा समतोल साधण्याची वेळ येऊन ठेपलीय. प्रत्येक शेतकऱ्याने, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने, स्वतःसाठी वेळ काढायलाच हवा. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचा भाजीपाला, दूध दुभतं हे स्वतःच्या शेतावर तयार करावं. हे करायला जर कोणी म्हणत असेल की टाईम नाही. तर खरंच तुमच्याकडे आता ‘टाईम’ नाही. आपली दैनंदिन जीवनशैली, मग त्यात आपण काय खातोय, काय पितोय, मनोरंजनासाठी आपण काय बघतोय, काय ऐकतोय, काय वाचतोय, कशावर किती खर्च करतोय या सर्वांचा एकवेळ विचार करणं गरजेचं आहे.

मनोज हाडवळे ः  ९९७०५१५४३८ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com