‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेती

शेतीचे बाळकडूविद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळावे, यासाठी राज्य मंत्रिमंडळ पातळीवर नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत कृषी हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शालेय शिक्षणात कृषी विषयाचे महत्त्व पटवून देण्याचा हा प्रयत्न...
agrowon editorial article
agrowon editorial article

देशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. सर्वाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये कृषी क्षेत्राचे फार मोठे योगदान आहे. या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून, त्यानुसार ते उपलब्ध नसल्याने शेती उत्पादनांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त एक हेक्टर एवढे सरासरी जमिनीचे क्षेत्र आहे. चाळीस लाख शेतकरी कुटुंबांकडे एक ते दोन हेक्टर इतकेच ‌जमिनीचे क्षेत्र आहे. दोन ते चार हेक्टर एवढे क्षेत्र असणारे सुमारे २२ लाख शेतकरी आहेत. सात लाख शेतकऱ्यांकडे ४ ते १० हेक्टर क्षेत्र असून, सरासरी १० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे अत्यंत कमी शेतकरी आहेत. यांपैकी बरेचसे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची शाश्‍वती नसते. जागतिक हवामान बदलाचे गंभीर परिणाम शेतीवर दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बदलत्या हवामानाचा सामना करत आहोत. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर, तर काही भागांत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. हवामानावर आधारित पीक पद्धती विकसित होऊन त्यांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

शेती उत्पादन हे शेतीची आवश्यक मशागत, विविध तंत्रज्ञानांचा वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते. कृषी उत्पादनवाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत. कृषी तंत्रज्ञान आदी गोष्टींविषयी देशातील तसेच राज्यातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून, विशेष परिश्रम घेऊन सुधारित कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून करून दिले आहे. तसेच विविध पिके, भाजीपाला, फळशेती, फुलशेती, पशुसंवर्धन, चारा पिके आणि यांत्रिक शेती याबाबत मोठ्या प्रमाणात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान आज उपलब्‍ध आहे. राज्यातील कृषी विद्यापीठात अविरतपणे सुधारित कृषी तंत्रज्ञानाविषयी संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यांनी कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, यासाठी कृषी खात्यामार्फत प्रचार आणि प्रसार केला जातोय. शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी कृषी शिक्षण घेतले तर त्याचा निश्‍चितपणे फायदा होईल.

प्रत्येक व्यवसाय करताना त्या व्यवसायासंबंधी आवश्यक शास्त्रीय ज्ञान गरजेचे असते. शिक्षणाद्वारे मिळविलेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग निश्‍चितपणे यशस्वी होण्यासाठी होतो. आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन या विविध क्षेत्रांत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील मिळविलेल्या ज्ञानाचा तसेच तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे उपयोग होत आहे. प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान हे शास्त्रावर आधारित असते. शास्त्र आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातलेली असते. तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व शास्‍त्रीय माहिती महत्त्वाची असते. शेती व्यवसाय हा शास्त्र आणि कला (कौशल्य) यावर आधारित आहे.  म्हणून शेती शास्त्राची आणि त्यातील कौशल्याची माहिती करून घेणे शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एखाद्या माणसाला काही आजार झाला तर डॉक्टर त्याच्या आजाराचे कारण शोधून उपचार करतात. कृषी व्यवसायात अशा अनेक बाबी आहेत की ज्यावर कारण आणि परिणाम यांची मिमांसा विचार करून उत्पादनात वाढ करता येऊ शकते.

जमिनीत असणारे अन्नघटक यावर उत्पादन अवलंबून असते. खते देताना उपलब्ध घटकाचे प्रमाण लक्षात घेऊन पिकांना आवश्यक ते घटक दिले जातात. जमिनीच्या प्रकाराचा अभ्यास करून पीक नियोजन करणे गरजेचे आहे. पिकांना लागणाऱ्या पाण्याची गरज अभ्यासून पिकांना पाणी देणे गरजेचे असते. पिकावर येणाऱ्या कीड व रोग याची पिकांवर दिसणारी लक्षणे पाहून त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींसाठी कृषी शाखेसंबंधीचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी कृषीविषयी शिक्षण घेण्याची गरज आहे. यासाठी शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेती उत्पादनात निश्‍चितपणे वाढ होईल.

सर्वसाधारणपणे १००० ते १५०० लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने २ ते ३ उच्चशिक्षित डॉक्टरांची गरज असते. तसेच तीन ते चार कृषी पदवीधर स्वतः शेती करीत असतील तर त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतीचे हंगामानुसार नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी कृषिविषयक ज्ञानाची-माहितीची गरज आहे. कृषितज्‍ज्ञ हे ग्रामीण भागात कृषिविषयक मार्गदर्शन व सल्लागार म्हणून कार्यरत असल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच फायदा होईल. राज्य सरकारने आणि विद्यापीठांनी कृषी शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण तरुणांना त्याचा निश्‍चितपणे फायदा होईल. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्का असून, तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याने कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल, शेतकऱ्यांविषयी सामाजिक बांधीलकी निर्माण होईल. ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल. याबरोबर शेतीला क्षेत्राला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश महत्त्वाचा ठरेल. 

भारत हा कृषिप्रधान देश असूनदेखील शालेय व माध्यमिक शिक्षणामध्ये कृषी विषय नाही याची खंत युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने २०१७ च्या अहवालातच व्यक्त केली होती. या अहवालानुसार उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर सर्वांत जास्त ३६ टक्के मुले कला शाखेत, त्यापाठोपाठ विज्ञान शाखेत १९ टक्के, तर वाणिज्य शाखेत १६ टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात. कृषी शाखेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ०.१३ टक्का आहे. राज्यात सूक्ष्म सिंचन, कीटकनाशके, खते-बियाणे, पीक पोषण, सेंद्रिय जैविक उत्पादने या क्षेत्रामध्ये विविध कंपन्या व उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. मात्र या संस्थांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. यासाठी शालेय स्तरापासून कृषी विषयाचा समावेश केल्यास कृषी क्षेत्राशी निगडित कुशल मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यास निश्‍चित मदत होणार आहे.

डॉ. विश्‍वजित कदम (लेखक सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री आहेत.) (शब्दांकन ः दीपक नारनवर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com