भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल अयोग्य इंधन

मोटारगाडी हे अतिशय अकार्यक्षम असे गतिशीलतेचे साधन आहे. त्याची कार्यक्षमता ही केवळ १ ते २ टक्केच आहे. तरीही इथेनॉल आणि बायोडिझेलसारखी जैवभारापासून मिळालेली उच्च गुणवत्तेची रसायने या उपयोगासाठी वापरणे आपण चालू ठेवतो.
भारतातील मोटार गाड्यांसाठी  इथेनॉल अयोग्य इंधन
agrowon editorial article

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम भारत सरकार गतिमान करत आहे. २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे आयात तेलावरचे आपले अवलंबित्व आणि पर्यावरणाचे प्रदूषण दोन्ही कमी होतील, असेही सांगितले जातेय. पण भारतातल्या गोदामांमध्ये साठवलेले साखरेचे डोंगर कमी करणे गरजेचे आहे हे खरे कारण आहे. आपल्या साखरेला निर्यात बाजारात कमी मागणी आहे. कारण तिचा दर्जा निकृष्ट आणि किंमत चढी आहे, तेव्हा इथेनॉल तयार करणे हा राजकीयदृष्ट्या सर्वांत चांगला पर्याय आहे. अनेक देशांमध्ये मोटार गाड्यांसाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले गेले आहे, पण मोटारगाड्या चालवण्यासाठी इथेनॉल वापरणे हा या उच्च प्रतीच्या इंधनाचा पूर्ण अपव्यय आहे. जगभर जैवइंधने अन्न उत्पादनाशी स्पर्धा करतात आणि शाश्‍वत तर नाहीतच, पण आर्थिकदृष्ट्या काटकसरीचीही नाहीत म्हणून सगळे देश त्यांच्यापासून दूर चालले आहेत. पिकाऊ जमीन ही अन्नोत्पादनासाठी तरी वापरली पाहिजे किंवा प्राण्यांच्या चाऱ्यासाठी असे आम्हाला वाटते. पिकांचे अवशेष आणि शेतातील इतर काडीकचरा त्यांची प्रत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करून किंवा तसाच मातीत मिसळला पाहिजे. अकार्यक्षम मोटारगाड्या चालवण्यासाठी जैवइंधन तयार करून चांगल्या जमिनीचा आणि मौल्यवान पाण्याचा अपव्यय करता कामा नये.नव्या इथेनॉल मिश्रण धोरणानुसार उसाचा रस आणि मका, ज्वारी, बाजरी यांसारखी अन्नधान्ये यांपासूनही थेट इथेनॉलनिर्मिती करायला परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत भारतातले सगळे इथेनॉल हे साखर उद्योगाचे उपउत्पादन असलेल्या मळीपासून तयार होत होते. हे नवे धोरण खरोखर दुर्दैवी आहे.  मोटारगाड्यांसाठी इथेनॉल वापराचे जगातले एकमेव यशस्वी उदाहरण १९७० पासून उसापासून इथेनॉल तयार करणाऱ्या ब्राझीलचे आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही साखरेचा प्रबळ दबाव गट आहे. ब्राझीलमध्ये तयार होणारे इथेनॉल हे कोणत्याही तीव्रतेच्या इथेनॉलवर चालणाऱ्या ‘फ्लेक्स-फ्युएल’ गाड्यांमध्ये केला जातो. या कार्यक्रमातही अडचणी आहेत आणि अलीकडच्या माहितीनुसार तो विशेष सुरळीत चाललेला नाही. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत होणाऱ्या चढउतारानुसार ब्राझीलचा इथेनॉलचा कार्यक्रमही वरखालीच्या आवर्तनातून जातो. यामुळे शेतकऱ्यांना हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते कारण वरखाली होणाऱ्या खनिज तेलाच्या किमतींनुसार त्यांना ऊसपीक लागवडीचे नियोजन करता येत नाही.

रासायनिक कच्चा माल म्हणून उपयोग प्लॅस्टिक आणि विविध श्रेणीतली रसायने बनवण्यासाठी खनिज तेलाचा उपयोग होतो. योग्य किंमत ठरवली तर इथेनॉल हा यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल. सध्या इथेनॉल औषध निर्माण, सुगंधी द्रव्ये आणि जंतुनाशके निर्माण करणाऱ्या उद्योगांमध्ये वापरले जाते. इतर रसायनांमध्ये इथेनॉलचा कच्चा माल म्हणून उपयोग केल्यास आणखी अनेक रसायन उद्योग उभारता येतील. 

 इंधनातले इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी जो रेटा देण्यात येत आहे त्यासाठी मोटारगाड्यांच्या इंजिनांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. इथेनॉल हे अतिशय आर्द्रताशोषक आहे आणि हवेतले बाष्प सहज शोषून घेते. त्यामुळे इंधन साठवणुकीच्या टाकीत पाणी साठते आणि इंजिन आणि गाडीचे इतर भाग गंजून खराब होऊ शकतात. याशिवाय इथेनॉलचे उष्मांक मूल्य पेट्रोलच्या उष्मांक मूल्याच्या ६० टक्के असल्यामुळे मिश्रणांच्या वापरामुळे मोटारगाडीचे मैल-अंतर (milage) कमी होते. शेवटी इथेनॉल हे अतिशय क्षरणकारी रसायन असल्यामुळे इंधननलिका आणि तिचे भाग खराब होतात आणि इंधननलिकेचे इंजिनातले तोंडही बंद होऊ शकते. या समस्या जुन्या मोटारगाड्यांमध्ये जास्त करून आढळतात. या कारणांमुळे अमेरिकेत इंधनमिश्रणामध्ये इथेनॉलच्या प्रमाणाची वरची मर्यादा १० टक्के आहे. जगभरातल्या आकडेवारीवरून असे दिसते, की इथेनॉलच्या वापराने वाहनांमुळे होणारे हवेचं प्रदूषण कमी होते, परंतु भारतीय शहरातल्या रस्त्यांवरची रहदारीची अव्यवस्थित परिस्थिती पाहता इथेनॉल मिश्रणामुळे प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन वाढण्याचीच शक्यता आहे. कारण गाड्या सदैव खालच्या गिअरमध्ये चालवल्या जातात आणि सतत थांबतात व परत सुरू होतात. याचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे.

इंधन म्हणून ग्रामीण घरांमध्ये वापर इथेनॉलवरचे इंधन म्हणून केलेले बहुतेक सर्व काम हे त्याच्या मोटारगाड्यांमधील वापरावर केंद्रित आहे. परंतु इथेनॉलचा जास्त चांगला उपयोग घरगुती वापरासाठी स्वयंपाकाचे इंधन म्हणून करता येईल. ग्रामीण घरांमध्ये चुलींमध्ये वापरल्या जाणाऱ्या जैवइंधनामुळे हवेचे प्रदूषण होते. भारत सरकारने यांपैकी बहुतेक घरांना द्रवरूप खनिज वायू (एलपीजी) पुरवला असला तरी एलपीजीचे वितरण आणि त्याच्या किमतीत सतत होणारी वाढ या अडचणींमुळे हा कार्यक्रम ग्रस्त आहे. स्वदेशी आणि अक्षय अशा इथेनॉल इंधनामुळे प्रदूषण कमी होईल आणि हा तुलनेने स्वस्त असा पर्याय आहे.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेने गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल तयार करून त्याचा स्वयंपाक व उजेडासाठी उपयोग करण्याची प्रणाली विकसित केली. ग्रामीण घरांमध्ये रॉकेलच्या ऐवजी स्वयंपाक व उजेडासाठी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता यावा यासाठी ‘नारी’मध्ये हे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी नारीमध्ये कमी तीव्रतेच्या इथेनॉलवर चालणारे कंदील आणि स्टोव्ह विकसित करण्यात आले. परंतु १९८० आणि ९० च्या दशकांत इथेनॉलचा मोटारगाड्यांमध्ये इंधनासाठी वापर करण्यात कोणाला स्वारस्य नव्हते. त्यामुळे इथेनॉलचा स्वयंपाक व उजेडासाठीही प्रसार होऊ शकला नाही. शिवाय या तंत्रज्ञानाच्या प्रसाराला कडक आणि जुन्यापुराण्या उत्पादनशुल्क कायद्यांमुळे अडथळा आला.

मोटारगाड्यांमध्ये इथेनॉल वापराचा आणखी एक आकर्षक मार्ग हा संमिश्र (हायब्रीड) विद्युत- वाहनांमध्ये त्याचा वापर हा होऊ शकतो. इथेनॉलवर चालणारे एक छोटे आयसी इंजिन विद्युत-वाहन चालवणाऱ्या बॅटरीला जनरेटरच्या (विद्युत जनित्र) माध्यमातून भारीत करू शकेल. यामुळे हवेचे प्रदूषण कमी होईल. संपूर्ण भाराने चालणारी आयसी इंजिने ही अतिशय कार्यक्षमतेने आणि स्वच्छ ज्वलनाने चालतात. यामुळे भारतात विद्युत गतिशीलता अतिशय वेगाने सुरू होईल. संमिश्र इंजिने असलेली वाहनेही विद्युतभारित करावी लागत असल्यामुळे चार्जिंग स्टेशन्स भराभर वाढतील. अशातऱ्हेने इथेनॉलच्या वापराने अशा वाहनांची जास्त अंतर पार करण्याची क्षमता तर वाढेलच पण नेहमीच्या विद्युत-वाहनांप्रमाणेच ती भारीत करता येतील.

अनिल कुमार राजवंशी, नंदिनी निंबकर

(नंदिनी निंबकर ‘नारी’ संस्थेच्या अध्यक्षा, तर अनिल राजवंशी  संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.