एक उपेक्षित  फ्रंटलाइन योद्धा! 

कोरोना संसर्गाचा धोका पत्करून सेवा करत असलेल्य‍ा घटकांचे ‘कोरोना योद्धा’ असे बिरुद लावून मनोबल वाढवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. परंतु देशाचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका फ्रंटलाइन कोरोना योद्ध्याचा, शेतकऱ्‍यांचा, साधा उल्लेख एकदाही केला नाही.
agrowon editorial article
agrowon editorial article

कोरोनाची दुसरी लाट आली. वर्षभर गढूळ झालेले वातावरण निवळत आहे, असे वाटत असतानाच पुन्ह‍ा कोरोना महामारीने रौद्र स्वरूप धारण केले. त्यात पुन्हा घुसमट करणारे लॉकडाउन, काळजाचा ठोका चुकवणारे रुग्णवाहिकांचे सायरन, स्वास्थ्य कर्मचाऱ्‍यांचे अहोरात्र तणावाखाली जगणे, पोलिसांचा खडा पहारा व भेदरलेली जनता! सरकारचे आरोग्य नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. लहान- मोठ्य‍ा देशांकडून मदत स्वीकारण्याची नामुष्की आपल्य‍ा देशावर ओढवली आहे. या महासंकटात संसर्गाचा धोका पत्करून सेवा करत असलेल्य‍ा घटकांचे ‘कोरोना योद्धा’ असे बिरुद लावून मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. विम्या‍चे कवच प्रदान केले आहे. समाजातील काही घटकांना आर्थिक मदत करण्या‍ची घोषणाही करण्यात आली आहे. हे समर्थनीय आहे, यात वादच नाही. परंतु देशाचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या रटाळ भाषणात एकदासुद्धा एका फ्रंटलाइन कोरोना योद्ध्याचा, शेतकऱ्‍यांचा, साधा उल्लेखही होऊ नये याचा खेद वाटतो. 

मधल्या काही महिन्यांचा काळ वगळता देशात सतत लॉकडाउन सुरू आहे. अनलॉक झाले तरी शेतीमालाचा प्रमुख ग्राहक असलेला हॉटेल व्यवसाय पुन्हा नीटनेटका सुरू होण्यापूर्वीच पुन्हा कडक लॉकडाउन झाले. अशा परिस्थितीत सर्व देशाला पोटभर खाऊ घालण्यासाठी शेतकरी मात्र ऊन, वारा, पावसात शेतात राबत आहे. पिकलेला माल मातीमोल भावाने विकत आहे. खते, कीडनाशके घेताना, बाजार समितीत माल विकताना, डेअरीवर दूध घालताना व पशुखाद्य खरेदी करताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका पत्करून शेती करतच आहे. शहरातील फ्लॅटमध्ये कोंडून घेतलेल्य‍ांना सकाळी चहाला व लेकरांना दूध मिळत आहे. धान्य, भाजी, फळे, तांदूळ, आटा सर्व उपलब्ध होत आहे. कारण लाखो शेतकरी तरुण जिवाची पर्वा न करता लॉकडाउन लागू नसलेल्या शेतांमध्ये रात्रंदिवस राबत आहेत.  शेती हा व्यवसाय निरंतर सुरू ठेवावा लागतो. इतर व्यवसायांसारखे शटर खाली ओढले किंवा कारखान्यांचे गेट बंद केल्यासारखा हा व्यवसाय बंद करता येत नाही. खर्चही सुरूच असतो. आवक मात्र बंद होते किंवा अगदीच तुटपुंजी असते. खरे मरण तर दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्‍यांचे आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी तरुणांनी कर्ज काढून संकरित गायी घेतल्या आहेत. ३० रुपयांपेक्षा जास्त दुधाचा उत्पादन खर्च असताना आज २० ते २१ रुपये लिटर दराने दूध विकावे लागत आहे. लॉकडाउन वाढले, तर आणखी दर घसरण्याची शक्यता आहे. पशुखाद्याचे भाव मात्र वाढत आहेत. कर्जाच्या व्याजाला झोप नाही. मागील वर्षी तोटा सहन करत कसाबसा धंदा टिकवला तर पुन्हा लॉकडाउन लागले. धंदा परवडत नाही म्हणून खर्च बंद करत‍ येत नाही. गायी म्हशींना खाऊ घालावे लागते, वेळेवर पाणी पाजावे लागते, रोज शेण उचलावे लागते, दोन वेळ दूध पिळावेच लागते. काहीच टाळता येत नाही. राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे जनावरे विकून मोकळे होण्याचीही सोय राहिली नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत, हे शेतकरी तरुण! सरकारने यांना आर्थिक मदत करायचे सोडा, कोरोना काळात यांनी केलेल्या कामगिरीची दखल सुद्धा सरकारला गरज वाटू नये, याची चीड येते. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या ‘डेबू’ या कादंबरीतील या दोन ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.  वेदनांचं घर दार, कोणाच्या गायी म्हशी, मरणाच्या दिशी, आत्मा चालला उपाशी 

अनेक दूध उत्पादकांनी काहीतरी मदत मिळवून देण्याची गळ घातल्यामुळे राज्य सरकारला शेतकरी संघटनेने निवेदन पाठवले आहे. महामारीत सरकारची जबाबदारी म्हणून १० रुपये प्रतिलिटर अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत सत्तेवर आलेले सरकार या निवेदनाला किती महत्त्व देते सांगता येत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असते, तर त्यांनी काय निर्णय घेतला असता, हा मला पडलेला प्रश्‍न आहे. महाराजांच्या काळात पडलेल्या चार वर्षाच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात महाराजांनी शेतकऱ्‍यांचे कर्ज व शेतसारा माफ केल्याच्या नोंदी आहेत. मग ठाकरे सरकार या उपेक्षित कोरोना योद्धांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करेल काय, याची वाट पाहूया. 

कोरोना काळात या फ्रंटलाइन योद्धांना साह्य करण्याऐवजी, राज्य सरकारने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव पुकारले होते व वीजबिल वसुलीसाठी वीज खंडित करून उभी पिके जाळली होती. आता केंद्र शासनाने कडधान्याच्या आयातीला परवानगी देऊन जखमेवर मीठ चोळले आहे. काय मदतीची अपेक्षा करावी? सरकारने या श्रमखोर फ्रंटलाइन योद्धांना जरा सवलतीच्या सावलीत घ्यावे, ही अपेक्षा आहे. नाहीच सरकारला पाझर फुटला तर शेतकऱ्‍यांच्या पोरांनी दूध पिऊन जोर बैठका काढाव्यात व सरकारचे/बॅंकेचे कर्ज बुडवायची तयारी ठेवावी. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 

उत्तर भारतात महामारीने हाहाकार माजवला आहे. हजारो लोक रोज मरत आहेत. गंगा किनारी दहन करण्यापुरते सरपण खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून मृतदेह अग्नी संस्कार न करता गंगेच्या पात्रात गाडले जात आहेत. गंगेच्या विस्तीर्ण पात्रात नजर पुरते तेथपर्यंत गाडलेल्या शवांच्या ‘भगव्या दफनखुणा’ फडकताना दिसतात. ज्यांच्या अंगी मुडदा गाडण्यासाठी खड्डा खोदण्याचेही त्राण नाही, ते आपल्या मृत कुटुंबीयांना गंगेच्या वाहत्या धारेला अर्पण करत आहेत. अखेरचे गंगा स्नान करून व्यवस्थेचे बळी जिवनमुक्त होत आहेत. कोण आहेत हे ‘दफन’ होणारे हिंदू? कारखानदार? व्यापारी, अधिकारी? की कर्मचारी? हे सर्व गरीब शेतकरी, शेतीत पराभूत होऊन शहरांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी पोहोचलेले भूमिपुत्र आहेत. आपल्या अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांची लाकडे घेण्याची ऐपत नाही ते दवाखान्यात उपचार काय घेणार? आपल्या झोपडीत हातपाय खोरत यांनी ‘राम’ म्हटले असणार! हे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचून, दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्‍या गोदावरीच्या तीरापर्यंत पोहोचू नये, हीच विधात्या चरणी वेदनाचिंब प्रार्थना! 

- अनिल घनवट  ९९२३७०७६४६ 

(लेखक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत.)   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com