गो-पीयूष वाढविते  रोगप्रतिकार शक्ती 

आयुर्वेदामध्ये गाईच्या कोलेस्ट्रमला गो-पीयूष असे म्हणतात. गाय व्याल्यानंतरचे ७२ तासांतील हे दूध पातळ, पिवळसर असते. गो-पीयूषचा उपयोग खाण्यासाठी केल्यास रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होते.
agrowon editorial article
agrowon editorial article

  आज जगभरात कोरोना या विषाणूजन्य संसर्गजन्य आजाराने मृत्यूचे थैमान घातले आहे. या संसर्गजन्य आजाराची लागण ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना होण्याचे प्रमाण अधिक आहे. किंबहुना, असेच लोक या आजारास बळी पडतात असे तज्ज्ञ डॉक्टरांचे अनुमान आहे. वास्तविक पाहता लोक विविध आजारांना का बळी पडतात? यांचे साधे, सोपे उत्तर म्हणजे क्षीण झालेली रोगप्रतिकारक शक्ती होय. कोणत्याही आजारास सहजासहजी बळी पडावयाचे नसेल तर त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे क्रमप्राप्त आहे. चांगली रोगप्रतिकारक शक्ती ही दीर्घ आयुष्य, उत्तम प्रकृतीचा पाया आहे. प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती ही समतोल संतुलित आहार, प्रदूषण विरहित पाणी, वातावरण आणि तणावमुक्त जीवनपद्धती यावर अवलंबून आहे. परंतु आज आपण विरुद्ध वातावरणात जगत आहोत. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी कमी होत आहे. आजचे चित्र काय आहे तर मधुमेह, हृदयविकार, संधिवात, स्पाँडिलायटिस, टीबी, कॅन्सर अशा अनेक जीवघेण्या आजाराने मानवजात त्रस्त आहे. त्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. आज परिस्थिती अशी आहे की घरात माणसे कमी दवाखान्यात जास्त आहेत. 

नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आणि त्यामध्ये सातत्य राहण्यासाठी गो-पीयूष म्हणजे कोलेस्ट्रमचा चांगला उपयोग होतो. त्यासाठी कोलेस्ट्रम म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. सस्तन प्राणी ज्या वेळेस नवीन बाळास जन्म देतात त्या वेळेस त्यांना बाह्य वातावरणाशी समरस होण्यासाठी त्याच्या आरोग्य रक्षणासाठी आणि योग्य वाढीसाठी, पहिल्या ७२ तासांत जे दूध त्या आईच्या स्तनामध्ये तयार होते, त्यास कोलेस्ट्रम असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये गाईच्या कोलेस्ट्रमला गो-पीयूष असे म्हणतात. हे ७२ तासांतील दूध हे पातळ, पिवळसर असते. गो-पीयूषचा उपयोग केल्यास रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होते. कारण गो-पीयूष (कोलेस्ट्रम) मध्ये पोषणमूल्य तत्त्वे असून, मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असणारे प्रथिने असतात. जे कोणत्याही प्रकारच्या जिवाणू, विषाणूपासून शरीराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. सर्वच सस्तन प्राणी, त्याच्या बाळासाठी कोलेस्ट्रमची निर्मिती करतात. तरीही पण गाईचे कोलेस्ट्रम सर्वांत चांगले मानले जाते. मानव जातीमधील आईचे पहिले दूध आणि गाईचे पहिले दूध यांचे केमिकल स्ट्रक्चर सारखे आहे. आईच्या आणि गाईच्या कोलेस्ट्रममध्ये उच्च प्रतीचे प्रथिने, ग्रोथ फॅक्टर, भरपूर प्रमाणात पोषणमूल्य ज्यात सायटोकायनस आणि इम्युनोग्लोबीन्स यांचा समावेश आहे. मानवाच्या कोलेस्ट्रमपेक्षा गाईचे कोलेस्ट्रम जास्त ताकदवान आहे. कारण ज्या वेळेस बाळाचा जन्म होतो, त्या वेळेस आईच्या नाळ अथवा वार यामधून ॲन्टीबॉडीज, वेगवेगळे प्रोटिन्स, पेपटाइड्‍स बाळाकडे स्थानांतर होतात. पण ही प्रक्रिया चार कप्प्याचे पोट असलेल्या सस्तन प्राण्याबाबत होत नाही. वासरांच्या जन्मानंतर त्यांना हे सर्व महत्त्वाचे घटक जसे ॲन्टीबॉडीज, प्रोटीन्स, पेपटाईड, जीवनसत्त्वे, खनिज मिश्रणे, ग्रोथ हार्मोन्स, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून त्याच्या कोलेस्ट्रममध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. 

गो-पीयूषचे घटक आणि कार्य ः गो-पीयूषमध्ये असणारे विविध घटक हे मज्जासंस्था, पचनसंस्था रोगप्रतिकार वाढविणाऱ्या पेशी, रक्तातील वेगवेगळ्या पेशी, स्नायू, अस्थी, त्वचा या सर्व संस्थेचे कार्य सकारात्मक पद्धतीने चालावे म्हणून मदत करतात. प्रकृती स्वास्थ्याची ट्रेन योग्य दिशेने योग्य गतीने विनाअडखळता चालावी म्हणून गो-पीयूषमधील घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात. हे यातील विविध घटकांची कार्यप्रणाली पाहता लक्षात येईल. 

इम्युनोग्लोबीन ः गो-पीयूषमध्ये ग्लोबीन प्रकारचे इम्युनोग्लोबीन प्रोटिन आढळतात. जसे IgG, IgM, IgA, IgD हे सर्व ॲन्टिबॉडीज असून, ज्या वेळेस रोगकारक जंतूंचा हल्ला होतो, तो हल्ला इम्युनोग्लोबीनमुळे निष्प्रबळ होतो. रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळून रोगप्रतिकारशक्ती प्रबळ होते. 

लॅक्टोफेरिन ः लॅक्टोफेरिन हे प्रोटिन असून लोहाचे रेणू लालरक्त पेशीकडे वाहून नेण्यास मदत करते. त्याचप्रमाणे रोगकारक जिवाणू, विषाणूंचा हल्ला परतवण्यास अत्यंत दक्ष असतात. लॅक्टोफेरिनमुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रबळ होते. 

लेप्टीन ः लेप्टीन हे हार्मोन आहे. लेप्टीनचा पूर्ण उपयोग होण्यासाठी मानवी शरीराला इन्सुलीनची आणि IGF1 ची मोठ्या प्रमाणात गरज लागते. गो-पीयूषमध्ये इन्सुलीन आणि IGF1 मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. लेप्टीनमुळे मेदाचे चयपचन व्यवस्थित होते. थायरॉईड ग्रंथींचे कार्य व्यवस्थित होते. लेप्टीनमुळे भूक आणि अन्न घेण्याची मात्रा नियंत्रित राहते. 

हायड्रोजन पेरॉक्साइड ः हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे पेशी निर्माण होतात. हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे जंतूंचा नाश होतो. त्यामुळे रोगकारक जंतूंच्या आजारापासून संरक्षण मिळते. 

फायटिक ॲसिड ः फायटिक ॲसिड हे प्रभावी ॲन्टिऑक्सिडेन्ट (Antioxidant) आहे. फायटिक ॲसिड हे गो-पीयूषमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. फायटिक ॲसिडमुळे कॅन्सर पेशींना लोह उपलब्ध होत नाही. त्यामुळे कॅन्सर पेशींचे पोषण कमी होऊन कॅन्सरवर नियंत्रण ठेवले जाते. 

जीवनसत्त्वे ः गो-पीयूषमध्ये मानवास अत्यंत उपयुक्त असणारे जीवनसत्त्वे असतात. जसे Vit A, Vit E थायमिन, रिबोफ्लेविन, निकोटेनिक ॲसिड, पॅन्थोथेनिक ॲसिड यांच्यामुळे मानवी आरोग्य चांगले राहते. 

खनिजे ः गो-पीयूषमध्य पोटॅशिअम, सोडिअम, कॅल्शिअम, मँगेनीज, क्लोरीन, फॉस्फरस अशी महत्त्वाची खनिज असतात. मानवी शरीरास या सर्व खनिजद्रव्याची गरज असते. या सर्व खनिजद्रव्याचा मानवी शरीरात एक विशिष्ट असा कार्यभाग आहे.  एच. एस लॉरेन्स या शास्त्रज्ञाने गो-पीयूषमधील ट्रान्स्फर फॅक्टर्सचा शोध लावला. ट्रान्स्फर फॅक्टर्स हे जीवनसत्त्वे नाहीत ना खनिजद्रव्ये तर ट्रान्स्फर फॅक्टर्स हे पेप्टाइडस असून त्यात ४४ अमायनो ॲसिड्स आहेत. ट्रान्स्फर फॅक्टर्स हे अतिशय छोट्या आकाराचे असून, हे दुबळ्या झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीला जागे करतात. ट्रान्स्फर फॅक्टर्स हे विषाणू, जिवाणू, कृमी यांचा संसर्ग तर बुरशीजन्य रोग, कॅन्सर, मज्जातंतूंचे रोग, प्रतिकारशक्तीचे रोग यावर नियंत्रण ठेवतात. ट्रान्स्फर फॅक्टर्समुळे पेशींना जिवाणू, विषाणू, फंगस, कॅन्सरपेशी यांच्याशी लढण्याची प्रेरणा मिळते. ट्रान्स्फर फॅक्टर्समुळे नवजात बालकापासून ते वृद्धापर्यंत ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असेल तर ती वाढण्यास, उत्तम होण्यास मदत होते. 

गो-पीयूषमध्ये असणाऱ्या प्रोलिन रिच पॉलिपेप्टाइड्स (PRP) मुळे रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते. पांढऱ्या पेशीत वाढ होते. नॅचरल किलर सेल्स यांना रोगकारक जंतूवर हल्ला करण्यास कार्यप्रवृत्त करतात. त्याचप्रमाणे कॅन्सर पेशीवर हल्ला करून कॅन्सर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. गो-पीयूषमध्ये अनेक प्रकारचे ग्रोथ फॅक्टर आढळतात. ग्रोथ फॅक्टर हे हार्मोन आहेत. यांच्यामुळे वाढीस चालना मिळते. त्याचप्रमाणे प्लेटलेट डिऱ्हाइव्हड ग्रोथ फॅक्टर (PDGF) मुळे शरीराची योग्य वाढ होते. शारीरिक जखमा चटकन भरून येतात. 

डॉ. श्रीकांत सरदेशपांडे  ९६५७२५७८०४ 

(लेखक निवृत्त पशुधन विकास अधिकारी आहेत.)   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com