कौशल्य अन् आत्मविश्‍वास वाढविणारे हवे कृषी शिक्षण

कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढील २५ वर्षांचे नवे धोरण निश्‍चित करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. अशा वेळी नव्या कृषी शिक्षण धोरणाची नेमकी दिशा काय असावी, यावर या लेखाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

सध्या राज्यात चार कृषी विद्यापीठे, एक पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. त्याअंतर्गत २५ शासकीय व १५३ खासगी कृषी व संलग्न महाविद्यालये आहेत. सहा पशू वैद्यकीय, दोन दुग्धशास्त्र व दोन मत्स्यविज्ञान महाविद्यालये आहेत. राज्यातील उच्च शिक्षणाचा विचार केला तर कृषी हे सर्वांत मोठे रोजगारक्षम क्षेत्र असूनही कृषी शिक्षण त्यामानाने अपुरे पडते आहे. राज्यात कृषिविषयक महाविद्यालयाच्या संख्येसोबतच कृषी विद्यापीठांची संख्या सुद्धा वाढवण्याचा भविष्यात विचार व्हावा तरच कृषी शिक्षण व शेती विकास याची सांगड बसेल.

मागील दोन दशकांपासून कृषी क्षेत्राचा घटता आर्थिक आलेख, लहान शेतकऱ्‍यांची वाढलेली संख्या, जागतिकीकरणानंतर शेती क्षेत्रात झालेले बदल, हवामान बदल, कृषी संशोधन, नवीन तंत्रज्ञान, सामाजिक माध्यमे, माहिती तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग, जैव तंत्रज्ञानाचा वापर, कृषिमाल प्रक्रिया, कृषी मूल्यवर्धन साखळी, कृषी व्यवसाय, निर्यात, बाजार, व्यापार, कृषी अर्थ विज्ञान, यांत्रिकीकरण, सिंचन, कृषी ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी अनेक नवीन विषय आता महत्त्वाचे झाले आहेत. भविष्यातील शेती व शेती संलग्न उद्योग-व्यवसाय हेच कृषी विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन मिळवून देऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे ज्ञान व कौशल्य देण्याची गरज तसेच प्रेरणा देणारे कृषी शिक्षण अपेक्षित आहे. शेतीचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. कमी जमीन धारणेत जास्तीत जास्त उत्पादन व उत्पन्न देणारी शेती आता करावी लागेल. काटेकोर शेती, सेंद्रिय शेती, संवर्धित शेती, उच्चतंत्र शेती असे अनेक प्रकार शेतीला ऊर्जा देणारे आहेत. यासोबतच शेतीपूरक विषय जसे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, रेशीम शेती अशा अनेक व्यवसायक्षम बाबी महत्त्वाच्या आहेत. या सर्व विषयाचा अभ्यासक्रमात योग्य पद्धतीने समावेश करावा लागणार आहे. कृषी शिक्षण काळानुरूप बदलणे अपेक्षित आहे, पण तसे फार होताना दिसत नाही. कृषी व संलग्न विषयातील शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी भविष्याविषयी आत्मविश्‍वास घेऊन बाहेर पडतील, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. 

सध्याचे शिक्षण उत्पादन तंत्रज्ञानाचे अवतीभोवती फिरते. त्यात आता पुढे जाऊन व्यावसायभिमुख शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थी त्यांच्या करिअरविषयी पदवी होईपर्यंत अनभिज्ञ असतात. शिक्षणाचा भाग म्हणून त्यांना शिकत असतानाच करिअर निश्‍चित करण्याची क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमातून व्यावसायिक मार्गदर्शनाचा अभाव, कृषी उद्योगाला अपेक्षित असलेले ज्ञान व कौशल्य याचा अभाव हे चित्र बदलून कृषी पदवीधर पुढील आव्हानांना सामोरे जाण्यास समर्थ व्हावेत, या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करायला हवेत.   

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अन्नधान्याचा तुटवडा व विदेशातून निकृष्ट दर्जाचे अन्न आयात करून जनतेची भूक भागवावी लागली. त्यानंतर अन्नधान्य उत्पादन वाढविणे हेच धोरण प्रामुख्याने राहिले व उत्पादन वाढवा हाच संदेश वरिष्ठ पातळीवरूनही बिंबवला गेला. त्याचे प्रतिबिंब कृषीच्या अभ्यासक्रमात इतके दृढ झाले, की आता अनेक नवीन आव्हाने असूनही कृषी शिक्षणात उत्पादन तंत्रज्ञानाचाच तगडा प्रभाव आहे. पीक उत्पादन तंत्रज्ञान महत्त्वाचे आहेच पण त्याव्यतिरिक्त अनेक विषय महत्त्वाचे झाले आहेत, त्याचा समावेश कृषी शिक्षणामध्ये आवश्यक आहे. राज्यातील कृषी शिक्षण आता स्थानिक व जागतिक बदलानुसार बदलणे अभिप्रेत आहे.

राज्यात नऊ कृषी हवामान विभाग आहेत. त्यामुळे शेती पद्धती व पिके यात विविधताही आहे. कोकणात फळे, मसाला पिके, भात, मत्स्य व्यवसाय यावर आधारित व्यवसाय उच्च शिक्षण, पश्‍चिम महाराष्ट्रात फळे, भाजीपाला, ऊस, कडधान्य, तृणधान्य, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यावर आधारित व्यवसाय शिक्षण, विदर्भ व मराठवाड्यात कापूस, सोयाबीन, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, संत्रा, मोसंबी, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, कृषी वन व्यवसाय, रेशीम उद्योग यावरील शिक्षण अभिप्रेत आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ७० टक्के अभ्यासक्रम केंद्रीय अधिष्ठाता समितीनुसार असावा असा भारतीय कृषी संशोधन परिषदेचा दंडक आहे. पण ३० टक्के अभ्यासक्रम प्रत्येक विद्यापीठांनी त्यांचे स्थानिक कृषी व्यवसाय गरजेनुरूप ठरवायचा आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कृषी विद्यापीठांनी ३० टक्के अभ्यासक्रम विभागीय हवामान अनुकूल पीकरचना व कृषी उद्योग यावर आधारित ठरवायला हवा. शेती क्षेत्र हे खूप व्यापक असून त्यात अनेक महत्त्वाचे घटक मोडतात. प्रत्येक घटक हा स्वतंत्र व्यवसाय उभा राहील एवढा मोठा असतो. तेव्हा अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य तसेच त्यांना अनेक पर्याय कृषी शिक्षणात समाविष्ट असावे. 

शेती हा विषय एकात्मिक पद्धतीवर चालतो. त्यात अनेक घटक असतात. त्यातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्वतंत्र एकात्मिक शिक्षण विभाग विद्यापीठात सुरू करावा. कृषी शिक्षणात सध्या कृषी, उद्यानविद्या, वन, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, पशू विज्ञान, मत्स्य विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन इत्यादी शाखा आहेत. त्यात कृषी हवामान, कृषी बाजार व्यवस्था, कृषी व्यापार, कृषी निर्यात, कृषी अर्थशास्त्र, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, कृषी इलेक्ट्रॉनिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव विज्ञान, कृषी व जैव अभियांत्रिकी, कृषी जल व्यवस्थापन, काटेकोर शेती, सेंद्रिय शेती, संवर्धित शेती, डिजिटल शेती असे अनेक नवे विषय समाविष्ट करावे लागणार आहेत. 

अनेक नवीन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होत असल्याने त्यासाठी उपयुक्त शिक्षक वर्ग तयार करण्याची व्यवस्थाही अंगभूत असायला हवी. त्यासाठी कृषी शिक्षकांना सतत प्रशिक्षण देण्यासाठी ‘कृषी शिक्षण व्यवस्थापन प्रशिक्षण अकॅडेमी’ आवश्यक आहे. नवीन शिक्षण तंत्रज्ञान प्रणाली त्यात डिजिटल शिक्षण व्यवस्था, डिजिटल प्रशासकीय व्यवस्था, संपूर्ण स्वायत्तता, गुणवत्ता, डिजिटल परीक्षा पद्धती, शैक्षणिक शिष्यवृती/कर्ज व्यवस्था व तंत्रज्ञानात होणारे नवनवीन बदल समाविष्ट करण्यासाठी वार्षिक आढावा या गोष्टी कृषी शिक्षण धोरणात समाविष्ट असायला हव्यात. एकंदरीत कृषी शिक्षण आता आमूलाग्र बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यात आवश्यक सुधारणा व कार्यवाही होण्यासाठी सक्षम नव्या धोरणासाठी राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. येत्या काळात कृषी शिक्षण सर्व आधुनिक पायाभूत सुविधांसहित भविष्यातील कृषी क्षेत्राच्या गरजेनुरूप, विद्यार्थ्यांना कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे तसेच त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याच्या दृष्टीने नवे कृषी शिक्षण धोरण असावे.

डॉ. व्यंकटराव मायंदे ७७२००४५४९०

(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com