ग्रामविकासाचं घोडं, नेमकं कुठं अडलं

गावातल्या सामान्य माणसाची ग्रामविकासाची संकल्पना म्हणजे रस्ता, पाणी, वीज व स्वच्छता एवढेच आहे. मात्र याच्या पुढे जाऊन देखील गावांचा विकास करता येतो हे जनतेसह बहुतांश लोकप्रतिनिधींना देखील ज्ञातच नाही.
agrowon editorial article
agrowon editorial article

महात्मा गांधी तसेच संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांनी जनतेला ग्रामविकासाचे धडे दिले. राष्ट्राचा विकास हा गावाच्या विकासावर अवलंबून आहे असं त्यांनी सांगितलं होतं. ग्रामविकासासाठी दरवर्षी हजारो करोड रुपयांचा निधी विविध मार्गांनी मिळतो. मात्र या संत महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी आणि त्यातील भाषणांशिवाय गावांमध्ये ग्रामविकास झालेला आढळत नाही. काही मोजके गाव सोडले तर आजही अनेक गाव मूलभूत समस्यांमध्ये अटकले असून त्यातून देखील ती गावे बाहेर पडताना दिसत नाहीत. राज्यातील अनेक गावांची परिस्थिती खूप वाईट आहे. ग्रामविकासाच्या झारीतील शुक्राचार्य नेमके कोण आहेत आणि ही परिस्थिती कशी बदलता येईल? याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गावातल्या सामान्य माणसाची ग्रामविकासाची संकल्पना म्हणजे रस्ता, पाणी, वीज व स्वच्छता एवढेच आहे. मात्र याच्या पुढे जाऊन देखील गावांचा विकास करता येतो हे जनतेसह बहुतांश लोकप्रतिनिधींना देखील ज्ञातच नाही. यासाठी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.

गावातील शौचालयाची दुरवस्था असेल गटारीचा प्रश्‍न, कचऱ्याचा प्रश्‍न हा फक्त राज्यकर्ते आणि ग्रामपंचायत कर्मचारी सोडवतील ही अपेक्षा मुळात चुकीची आहे. आपलं गाव स्वच्छ राहावं ही गावातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. योग्य ठिकाणी कचराकुंड्या ठेवणे ही जबाबदारी प्रशासनाची असली तरी त्यातच कचरा टाकला पाहिजे ही नागरिकांची जबाबदारी आहे. शौचालयासाठी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची असली तरी त्याचा वापर करून तिथे स्वच्छता ठेवणे हे जनतेच्या हातात आहे. या प्रकारची जबाबदारी ओळखून काम केल्यास काही समस्या आपोआप सुटू लागतील. ग्रामपंचायत निवडणुकांत जेवढा रस घेतला जातो तेवढा ग्रामविकासात घेतला जात नाही हे खरं दुर्दैव आहे.

प्लॅस्टिकबंदी शासनाने घातली असली तरी आजही गावांमध्ये सर्रास अवैध असणाऱ्या पिशव्या मिळतात. याच पिशव्या काम झाल्यावर गटारीत अथवा रस्त्याच्या कडेला किंवा ओपन स्पेसमध्ये टाकल्या जातात. त्यामुळे ड्रेनेज आणि अस्वच्छतेची समस्या उद्‌भवली जाते. त्यासाठी परत प्रशासनाला दोषी धरणे योग्य नाही. बाहेरच्या देशात ज्या गावातून नद्या वाहत आहेत तिथे पर्यटन स्थळ विकसित झाले आहेत. मात्र आपल्याकडे नद्यांना देवीदेवता म्हणून सुद्धा त्यांच्यात निर्माल्य आणि कचरा टाकून घाण करण्याचा उपक्रम सुरू आहे. राज्यातील नद्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक नद्यांचे रूपांतर मोठ्या गटारीत झाले आहे. नदीच्या काठी आणि नदीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. फक्त दैवतीकरण करून काय साध्य झाले, हा खरा प्रश्‍न आहे.

गावातील पथदिवे फक्त शोभेचे नसून उपयुक्त घटक आहे. अनेक गावातील पथदिव्यांची अवस्था मोडकळीस आली आहे. ग्रामपंचायत आणि नगर पंचायत स्तरावर पथदिवे हे सोलर सिस्टिम तसेच आपोआप कार्यान्वित होणारे असले पाहिजे. कारण विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे गावातील कचऱ्याचे विलगीकरण करून ‘डीकंपोजर’च्या मदतीने कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. यातून त्यांना उत्पन्न मिळेल तसेच कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न मार्गी लागू शकतो. ग्रामविकासाचे घोडं अडण्यात भ्रष्टाचारी यंत्रणा देखील कारणीभूत आहे. गावातील जनतेने मतांचे पैसे घेऊन भ्रष्ट माणसाला निवडून द्यायचे, तो सत्येत आला की भ्रष्ट कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून सर्व योजनांमध्ये फक्त भ्रष्टाचार करेल आणि विकास झाला नाही म्हणून जनता पुन्हा बोंबा मारेल, हे दुष्टचक्र आहे. गावाविषयी प्रेम असणाऱ्या आणि ज्याच्याकडे विकासाच्या संकल्पना आहेत अशा चांगल्या व्यक्तीलाच पैशाची अपेक्षा न ठेवता निवडून दिले पाहिजे. 

गावातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता गावातून शहराकडे जाण्याचा तरुणांचा कल दिसत आहे. गावात आशादायक चित्र त्यांच्यासमोर दिसत नाही. नवीन काही प्रकल्प नवनवीन व्यवसाय उद्योग गावात विकसित होत नसल्याने खेड्याकडे चला ऐवजी शहराकडे चला, अशी अवस्था सध्या सुरू आहे. ग्रामपंचायत, नगर पंचायत स्तरावर गावातील विविध क्षेत्रांतील शिक्षित तरुणांचा डेटा अर्थात माहिती उपलब्ध असायला हवी. गावातील वकील, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक तसेच सर्वच क्षेत्रांतील पदवीधर आणि सद्यःस्थितीत त्यांचे रोजगार नोकरी या विषयीची सविस्तर माहिती प्रशासनाकडे असली पाहिजे. गावातील शेत जमीन, प्रमुख पिके, विविध दुकानदारी, लघुउद्योग शाळा-कॉलेज त्यात उपलब्ध असणारा रोजगार याविषयी देखील माहिती प्रशासनाने ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यातूनच नवीन उद्योग आणि प्रकल्प उभारणीसाठी दिशा मिळू शकते. कोणत्या उद्योगासाठी गाव अनुकूल आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो.

प्रत्येक गावात दक्षता समिती, तंटामुक्ती समिती, पोलिस पाटील या पदांवर कार्यक्षम लोक असावेत. याशिवाय गावातील होतकरू तरुणांना एकत्र करून ग्रामविकास परिषद किंवा ग्रामविकास समितीसारखी संस्था उभी करायला पाहिजे. अशा समितीत देखील तरुणांना काही जबाबदाऱ्या वाटून दिल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेस सरपंच किंवा सदस्य यांनी येण्याची गरज नाही. या समितीच्या माध्यमातून देखील खूप कामे होऊ शकतात. युवाशक्ती जर विधायक कामाला वापरली तर ग्रामविकास होणे सुलभ होईल. गावातील पोलिस प्रशासन, पोलिस पाटील यांच्या संख्येला मर्यादा आहेत. पोलिसांच्या संख्येचा आणि त्यांच्यावरील कामाच्या ताणाचा विचार केल्यास तिथे सुद्धा पोलिस मित्र आणि ग्रामरक्षक दल मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असण्याची गरज आहे.

पाणीपुरवठा हा गावातील सर्वांत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र अनेक गावांतील पाणीपुरवठा यंत्रणा खराब झाली आहे. पाण्याचे शुद्धीकरण तसेच पुरवठा सेवा विस्कळीत झाली असल्याने गावागावांत ट्रँकर आणि हंडे दिसणे सुरू झाले आहे. खेडे गावापेक्षा निमशहरी गावांतही पाणीटंचाई एक गंभीर समस्या म्हणून पुढे येत आहे, याकडे अधिकाअधिक लक्ष देण्याची गरज आहे. अनधिकृत नळ कनेक्शन, पाण्याची चोरी, पाण्याची गळती यावर कारवाई करावी लागेल. गावाचा विकास हा राष्ट्राचा विकास असल्याने गावाची संपत्ती ही राष्ट्राची संपत्ती आहे, हे धोरण राबवावे लागेल. राष्ट्राचा विकास करायचा असल्यास गावाचा विकास होणे आवश्यक आहे. गावाचा विकास होण्यासाठी गावातील शेतीचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील शेतीमाल विक्री व्यवस्था सुलभ असणे आवश्यक आहे. भाजीपाला तसेच इतर शेतीमाल विक्रीसाठी गावात विशेष व्यवस्था असणे आवश्यक आहे. ज्यातून प्रशासनाला उत्पन्न मिळेल तसेच शेतकऱ्यांना विक्रीची चांगली व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल. एकंदरच ग्रामविकास फक्त कागदावर किंवा भाषणापुरता किंवा पुरस्कार मिळवण्याकरिता नसून हा राष्ट्र विकासाचा पाया आहे. त्यामुळे गावाचा विकास झाल्यास खऱ्या अर्थाने संत महापुरुषांना ही श्रद्धांजली असेल.

सचिन होळकर  ९८२३५९७९६०

(लेखक शेती, ग्रामविकासाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com