विज्ञान-तंत्रज्ञानाला घेऊ द्या मोकळा श्‍वास

आज जागतिक कापूस दिन आहे. या वर्षी जागतिक कापूस दिनाची थीम आहे ‘कॉटन फॉर गुड.’ परंतु आपल्या देशात नवतंत्रज्ञान वापरावरची बंदी आणि ‘बियाणे उत्पादन ते कापडनिर्मिती’ अशा सर्वच पातळ्यांवर कापूस दुर्लक्षित राहिल्यामुळे उत्पादक ते व्यावसायिकांना वाईटच अनुभव येत आहेत.
विज्ञान-तंत्रज्ञानाला घेऊ द्या मोकळा श्‍वास
agrowon editorial article

आज दिनांक ७ ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिवस म्हणून जगामधल्या ८२ कापूस उत्पादक देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने तीन कोटी कापूस उत्पादक, हजारो शास्त्रज्ञ, अनेक जीनर्स, स्पीनर्स, कपडा व्यवसायातील उद्योजक, व्यापारी यांनी या पिकाला बहूमोल महत्त्व प्राप्त करून दिले आहे. तसेच या पिकावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा गौरव केला आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. जागतिक व्यापार संघटनेने इतर जागतिक संघटनाशी संबंध साधून, आफ्रिकेच्या बेनीन, बुरकिना फासो, चाड, माली (सी-४ देश) मार्फत ७ ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये कापसाला महत्त्व प्राप्त व्हावे यासाठी जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव घेतला. त्यानंतर सर्व आफ्रिकन देशांमध्ये कापसाचे महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली आहे. आफ्रिकेतील, केनिया, इथिओपिया, मलावी, नायजेरिया, स्विझर्लंड, इस्वाटिनी, सुदान आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी कापसामध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर केला. बीटी-कापसासोबतच अनेक नवीन तंत्रज्ञान वापरून या देशांनी कापूस उत्पादकतेमध्ये मोठी सुधारणा केली आहे. 

कापूस तंत्रज्ञानाचा इतिहास पाहिला, तर भारतामध्ये प्रथम ‘हायब्रीड’ (संकरित) कापसाचा शोध लावला गेला. त्यामुळे अनेक भारतीय बीज कंपन्या अस्तित्वात आल्या. पुढे यामध्ये बीटी जनुकाचा वापर करून खूप मोठा बदल घडवला गेला. अनेक भारतीय बीज कंपन्या जगामध्ये अग्रेसर आहेत. आफ्रिकन देशांमध्ये सध्या कापसामध्ये जी क्रांती पाहावयास मिळत आहे, त्यामध्ये भारतीय बियाणाच्या कंपन्याचा फार मोठा सहभाग आहे. या वर्षी जागतिक कापूस दिनाची थीम ‘कॉटन फॉर गुड’ ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कापसाच्या फायबर (धागा) सोबतच बियाण्यापासून ते कापड निर्मितीपर्यंत चालणाऱ्या अनेक व्यवसायांना चालना मिळणार आहे. कापूस हे एक बहुआयामी व बहुउद्देशीय पीक आहे. म्हणूनच त्याला पांढरे सोनेदेखील म्हटल्या जाते. कापसाच्या फायबरचा वार्षिक व्यापार हा १८ बिलियन डॉलर्सचा आहे. 

भारत हा जगामध्ये कापूस उत्पादन करणारा एक अग्रेसर देश आहे. कापूस या पिकाचे देशात क्षेत्र १३० लाख हेक्टर असून, ७० ते ७५ लाख कापूस उत्पादकांची उपजीविका यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे यावर चालणाऱ्या उद्दोगांची संख्या देखील भरपूर आहे. सर्वसाधारणपणे ३७० लाख गाठी (१७० किलो रुई प्रति गाठ) सोबत भारतामध्ये १२५ लाख टन कापूस बीज (सरकी) तयार होते. त्यापासून १५ लाख टन खाद्यतेल, ५ लाख टन बियाण्यांचे कवच, ४४ लाख टन पशुखाद्य तसेच ३०० लाख टन कापसाच्या पऱ्हा मिळतात. ज्यावर आज जळाऊ इंधनाचे (ब्रिकेट्स -पेलेरस) तसेच पार्टिकल बोर्डचे कारखाने उभे आहेत. ही किमया २००२ नंतर, ज्या वेळी बीटी कापसाची लागवड सुरू झाली आहे, तेव्हापासून वाढली आहे. गेल्या २० वर्षांत कापसाच्या बाबतीतील एक मोठी घटना म्हणजे तत्कालिन वाजपेयी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि बीटी कापसाला देशांतर्गत लागवडीसाठी परवानगी दिली. त्यामुळे अमरेकिन बोंड अळीमुळे होणारे नुकसान पूर्णपणे टाळता आले. बीटी तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर म्हणजे २००२ पासून कापसाचे उत्पादन १३० लाख गाठीवरून आज ३७० लाख गाठींपर्यंत वाढले आहे. बीटी तंत्रज्ञानामुळे कापसामध्ये जो आमूलाग्र बदल झाला त्या तंत्रज्ञानाला बीटी वांग्याच्या २०१० च्या स्थगितीमुळे खीळ बसली. जीएम तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन बदलला. कापसाचे जगामध्ये चालू असलेले नवीन तंत्रज्ञान भारतात आणायला बंदी आली तसेच भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना देखील खीळ बसली. भारतातील कापसाचे अव्वल स्थान टिकेल काय, याची भीती निर्माण झाली आणि पुन्हा आपल्याला कापूस आयात करावा लागेल काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. 

या वर्षी देशात कापसाचे क्षेत्र १२० लाख हेक्टरच्याच आसपास आहे. महाराष्ट्र राज्यातही या वर्षी कापसाचे क्षेत्र तीन लाख हेक्टरने घटून ३९ लाख हेक्टरवर आले आहे. कापूस उत्पादनाच्या सुधारित अंदाजानुसार यंदा देशात ३५० लाख गाठींचे उत्पादन होणार आहे. शिल्लक साठाही फारसा नाही. देशांतर्गत कापूस उत्पादनाचा अंदाज, शिल्लक साठा, आयात याबरोबरच आपली एकूण गरज, निर्यात पाहता सध्या तरी तूट आणि टंचाईच दिसते. या वर्षीचे हवामान, पाऊसमान पाहता कापसाचे नुकसान वाढून टंचाईत भर पडू शकते. वस्त्रोद्योगात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही कापूस हे पीक देशात सर्वच पातळ्यांवर दुर्लक्षित आहे. मागील काही वर्षांपासून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाने कापसाने नुकसान वाढले आहे. यांत्रिकीकरणातही कापूस शेती मागे आहे.

केंद्र सरकारचे जीएम पिकांच्या बाबतीत असलेले संभ्रमित धोरण, दोलायमान संनियंत्रण (रेग्यूलेटरी) पद्धत यामुळे नवीन तंत्रज्ञानाला परवानगी दिली जात नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सविनय कायदेभंगाचे हत्यार अवलंबले आहे. महाराष्ट्रात गेल्या ४-५ वर्षांपासून एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांची सर्रास लागवड होत आहे. या वर्षी या अमान्यता प्राप्त कापसाच्या वाणाने १५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र व्यापले आहे. शेतकऱ्यांना निंदणाचा खर्च परवडत नसल्यामुळे तण-विरोधक एचटीबीटी बियाण्यांचा वापर वाढतो आहे. कापूस उत्पादनाकडे लक्ष ठेवून त्यातील धोरणात्मक अडचणी दूर करणे आवश्यक आहेत. जनुकीय तंत्रज्ञानात जगामध्ये भरपूर विज्ञान आधारित बदल होत आहेत. जीएम पिकाच्या निर्मितीसाठी आता अनेक नवीन पद्धती पुढे येत आहेत. जिनोम एडिटिंग या तंत्राने विकसित केलेल्या अनेक पिकांना जगमान्यता मिळाली आहे. भारतात अजूनही आपण वादाच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. अशा तंत्रज्ञानाला चालना देऊन शास्त्रज्ञाचे मनोबल उंचावण्याचे काम केंद्र शासनाने करायला हवे. आपल्या देशात शेती क्षेत्राच्या बाबतीत विज्ञान-तंत्रज्ञानाची वाट मोकळी व्हावी, हीच जागतिक कापूस दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. 

डॉ. चारुदत्त मायी, भगीरथ चौधरी (डॉ. मायी दक्षिण आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्लीचे अध्यक्ष, तर भगीरथ चौधरी संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.