जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळे

जल व्यवस्थापनाची सप्तपदी
जल व्यवस्थापनाची सप्तपदी

निसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने हात पुढे करण्याआधीच तिच्या हातातून ओरबडून घेत आहोत आणि तो परत करण्याचे तर आपण केव्हाच विसरून गेलो आहोत. जल व्यवस्थापन हा शासनावर ढकलून दोषारोप करण्याचा विषय नाही. यामध्ये आपल्या प्रत्येकाचा मनापासून सहभाग हवा. पाणी हे निसर्गदेवतेचे स्फटिकासारखे निर्मळ रूप आहे. ते आपण अतिशय आनंदाने निसर्गहस्ते प्राप्त करून परत ते निसर्गाकडे सुखरूप कसे जाईल याचा सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जल व्यवस्थापन शिकविण्यासाठी निसर्गासारखा उत्कृष्ट शिक्षक नाही.  व्यवस्थापन हा कुठल्याही पाठ्यपुस्तकातील धडा आणि त्यावर आधारित घोकंपट्टी नसून प्रत्यक्ष कृतीमधून अनुभवण्याचा विषय आहे. व्यवस्थापन शिकण्यासाठी फार मोठ्या शिक्षणाची, पदवीच्या भेंडोळ्याची गरज नसते. ते तुमच्या रक्तात असावे लागते आणि त्यासाठी लागतात योग्य आणि पिढ्यान्‌पिढ्यांपासून मिळणारे संस्कार. कुटुंब व्यवस्थापनाचा डोलारा पूर्वी घरातील एक प्रमुख पुरुष व्यक्ती समर्थपणे पेलत असे म्हणूनच त्याला वटवृक्ष म्हणत. हा वटवृक्ष उमळला, त्याच्या पारंब्या तुटू लागल्या की कुटुंब व्यवस्थापन कोसळते. आज आपण अनेक घरात हेच पाहत आहोत. शेती व्यवस्थापनाचेही असेच आहे. प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक सेंद्रिय शेतीमध्ये विविध पिकांचे खरीप रब्बीमध्ये योग्य नियोजन करून बदलत्या काळानुसार त्यात पचेल आणि झेपेल एवढेच नावीन्यपूर्ण बदल करणे आणि ती ही स्वत:ची आर्थिक क्षमता पाहूनच यालाच 'शेती व्यवस्थापन' म्हणतात. यातील एकही गोष्ट आपण करत नाही म्हणूनच आज हे क्षेत्र संपूर्णपणे कोलमडलेले आहे. व्यवसाय व्यवस्थापनसुद्धा असेच आहे. जेवढी मागणी तेवढाच पुरवठा हे याचे सूत्र आहे. व्यवसाय हा सचोटी, विश्वास, तत्परता, वेळेत मागणी पूर्ण करणे आणि सोबत उत्कृष्ट दर्जा यावर अवलंबून असतो. यातील एक जरी धागा उसवला की व्यवसाय जीर्ण होण्यास उशीर लागत नाही.  जल व्यवस्थापन आज आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मात्र हा व्यवसाय होऊ शकत नाही, ती सेवा आहे. मी यास निसर्गदेवतेची सेवा समजतो. पाणी हे निसर्गदेवतेचा सर्व जिवांना दिलेला तीर्थरूप प्रसाद आहे. फरक एवढाच आहे की हा प्रसाद आपणास पुन्हा निर्सगास त्याच अवस्थेत परत करावयाचा असतो आणि यालाच आपण जल व्यवस्थापन म्हणतो. निसर्गदेवतेने दिलेला हा प्रसाद आज आपण तिने हात पुढे करण्याआधीच तिच्या हातातून ओरबडून घेत आहोत आणि तो परत करण्याचे तर आपण केव्हाच विसरून गेलो आहोत. जेव्हा दात्यापेक्षा अतिथी मोठा होतो तेव्हा दात्याचे दान क्षीण होऊ लागते. आज दुष्काळ आणि पाणीटंचाईने भाजला जात असलेला मराठवाडा मला अतिथीच्याच रूपात दिसत आहे, तेथे दात्याचे अस्तित्व कुठे जाणवतच नाही.  जलदानाएवढे पुण्याचे कार्य नाही असे एका पंडिताने अकबर बादशहाला सांगितले. बादशहाने फर्मान सोडून एका मंदिराबाहेर लोकांना भर दुपारी उन्हामध्ये रांगेत उभे केले आणि तो तेथे चांदीच्या सुरयांमधून जलदान करण्यास आला. पंडिताने जलपूजा केली आणि अतिथीच्या ओजंळीमधून जलदानास सुरवात झाली. रांगेतील पाचव्या व्यक्तीने ओंजळ पुढे करून पाणी पिण्यास सुरवात केली. सुरया रिकाम्या होत होत्या, अर्धे पाणी तोंडात, अर्धे अंगावर सांडत होते पण ओंजळ पुढे तशीच होती. पुण्याचे काम म्हणून बादशहा नकार देऊ शकत नव्हता. रांगेमधील लोक तहानेने व्याकूळ झाले होते. जलपूजेचे पाणी संपून गेले आणि बादशहा हताश झाला तेव्हा याचकाच्या वेषामधील बिरबल त्याच्या समोर उभा राहिला. त्या वेळी बिरबलाने बादशहाला सांगितलेले शब्द फार महत्त्वाचे होते. तो म्हणाला, “राजन, जल व्यवस्थापन हे फार महत्त्वाचे आहे. तुमचा उद्देश चांगला होता; पण तुम्ही हे विसरलात की जलपूजा केलेले हे पाणी मर्यादित आहे आणि रांगेमधील प्रत्येक याचक म्हणजेच अतिथी एकच ओंजळ पाणी पिऊ शकतो. शेवटी पाणी कुठून आपणास मिळत आहे या पेक्षाही राजा आपणास स्वहस्ते जलदान करत आहे अशावेळी प्रजेची तहान काही थेंबामध्ये सुद्धा भागू शकते.” अकबराने बिरबलच्या पाठीवर शाबासकी देत त्याचे कौतुक केले आणि हे असेच होणार हे गृहित धरून बिरबलाने पूर्वनियोजीत संचित केलेल्या पाण्यामधून बादशहाकडून रांगेमधील उरलेल्या लोकांना जलदान केले. या बोधप्रद गोष्टीमधून आपणास जल व्यवस्थापनाचा केवढा मोठा अर्थ कळतो. लोकांना तहान लागली असे आपण समजतो पण किती तहान आहे? त्या तहानेवर त्याचे नियंत्रण आहे का? याचा आपण विचार करत नाही. शेतीचाच विचार करायचा म्हटले तर पारंपरिक पिकांची ओंजळ नेहमी लहान आणि समाधानी असते; मात्र उसासारख्या पिकांची ओंजळ कधी रिकामी होतच नाही. आम्ही हे जल व्यवस्थापन केव्हाच विसरून गेलो आहोत. मर्यादित जलसाठा असताना कोणती पीकपद्धती वापरावी, जमिनीत कर्ब कसे वाढवावे यांचा आज आम्हाला विसर पडला आहे. बिरबलाने ओंजळ उघडी ठेऊन अर्धेपाणी अंगावर सांडून घेतले, आज समाजात आपणास असे हजारो वेशांतर केलेले बिरबल पाहावयास मिळतात फक्त ते पाहण्यास अकबर बादशहा तेथे नसतो.  जंगल व्यवस्थापन जल व्यवस्थापनामध्ये जंगल व्यवस्थापनाचा फार मोठा वाटा आहे. एक पूर्ण वाढ झालेला वटवृक्ष त्याच्या शितल छायेखाली मुळांच्या साह्याने हजारो लिटर पाणी साठवत असतो. हे पाणी तेथे ओलाव्याच्या रूपात असते. एक वटवृक्ष तोडणे म्हणजे या हजारो लिटर पाण्याला तिलांजली देणे होय. मराठवाड्यातील आज रोजीची भीषण पाणीटंचाई आणि महामार्गावरील वटवृक्षांची स्मशानयात्रा यांचा जवळचा संबंध आहे. घनदाट जंगलामुळे पावसाचे पाणी जमिनीत धरून ठेवले जाते आणि भूगर्भामधील जलसाठा वाढू लागतो. जंगलामुळे पाऊस पडतो असे नसून त्यामुळे तो टिकून राहतो. मॉन्सूनमुळे हजारो मैलावरून आपल्या देशात पाऊस येतो पण त्या पावसाला धरून टिकवून ठेवण्याचे काम हे जंगल म्हणजेच वृक्ष करत असतात. डोंगर दरीमधील घनदाट वृक्षराजी कायम राहिली तरच नदी वाहती राहील. जनतेचा सहभाग हवा जल व्यवस्थापन हा शासनाचा विषय असू शकत नाही शासनाने तो स्वत: ‘जनसेवा’ या गोंडस रूपाखाली स्वत:च्या खांद्यावर घेतला आहे आणि हे ओझे आता एवढे वाढले आहे की ते त्याच्या पेलण्या पलीकडे गेले आहे. मनुष्य व्यक्ती, कुटुंब हे समाजाचे घटक आहेत आणि जल व्यवस्थापन हे त्यांचे क्षेत्र आहे. पूर्वी घरोघरी आड होते, हवे तेवढेच पाणी आडातून काढले जात होते कारण पोहरा ओढून पाणी काढण्यासाठी कष्ट होते म्हणून पाण्याचा योग्य आणि कमीतकमी वापर होता. ज्यांच्या घरी आड नव्हता तेही पाणी घेण्यास येत असत. त्यांना कुणी अडवत नव्हते कारण त्या वेळी जल व्यवस्थापन या क्षेत्राला सेवेची झालर होती. जनसेवेची जपमाळ घेतलेल्या शासनाने जेथे प्रजेचा असा स्वत:चा असा शाश्वत जलपुरवठा होता तेथे नळयोजना आणली आणि घरामधील आडावर कायमचे झाकण टाकले गेले. फुकटच्या नळाचे पाणी धोधो वाहू लागले आणि कालांतराने आडांच्या कचराकुंड्या झाल्या. जल व्यवस्थापनात शासनाचा संबध हा जल उपलब्धीपर्यंतच असावा. एकदा जल उपलब्ध झाले की त्याच्या व्यवस्थापनात शासनाबरोबर जनतेनेसुद्धा सामिल होणे गरजेचे आहे.  चार दशकांपूर्वी मी नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेत शास्त्रज्ञ पदावर कार्यरत असताना माझ्या टेबलवर एका प्रकाशकाने जल व्यवस्थापनावरचे एक मोठे पुस्तक अभिप्रायासाठी ठेवले होते. प्रगत राष्ट्रांमधील जल व्यवस्थापनाचे उत्कृष्ट ज्ञान भांडार त्यात होते. अमेरिका, जपान, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय राष्ट्रे एवढी प्रगत का झाली? औद्योगिक प्रगतीमुळे? मुळीच नाही. या राष्ट्रांना प्रगतिपथावर घेऊन जाण्यास औद्योगिक क्षेत्राबरोबर निसर्ग संवर्धन आणि जल व्यवस्थापन तेवढेच कारणीभूत ठरले. या राष्ट्रांमधील शेतीचा अभ्यास करताना मला त्यांचे जल व्यवस्थापन पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. यातील अनेक राष्ट्रांमध्ये पावसाळा हा ऋतूच नाही म्हणजे आपल्याकडे जसा तीन-चार महिने पाऊस असतो तसा तिकडे नसतो. परंतु, तरीही तिथे पाण्याची कुठेही कमतरता नाही. यास मुख्य कारण म्हणजे या प्रत्येक राष्ट्राला प्राप्त झालेली जंगल श्रीमंती. उत्कृष्ट जल व्यवस्थापनासाठी या राष्ट्रांबरोबरच विकसनशील चीन आणि इस्त्राइलचा येथे अवश्य उल्लेख हवा.  जल व्यवस्थापनासाठी प्रचंड मोठ्या शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास करण्यापेक्षा या राष्ट्रांनी या क्षेत्रात नेमके काय केले याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. उत्कृष्ट जल व्यवस्थापनासाठी सात मुख्य गोष्टींवर भर देणे ही काळाची गरज आहे. या सप्तपदीमध्ये घनदाट जंगलनिर्मिती, नद्यांचे पुनरूज्जीवन, पीक व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, भूगर्भामधील पाणी संचय वाढविणे, पाणी केंद्रीकरण व विकेंद्रीकरण आणि शालेय अभ्यासक्रमात जल व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय म्हणून अंतर्भूत करणे.  नद्यांचे पुनरुज्जीवन नद्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या उगमापासूनच असावयास हवे आणि हे कार्य नदीच्या अंतिम टोकापर्यंत लोकसहभागामधून व्हावयास हवे. पवित्र गंगा नदी वाराणसीला स्वच्छ मात्र गंगोत्री आणि गंगा सागर येथे अस्वच्छ आहे, याला नदी स्वच्छता मोहीम म्हणता येत नाही.  पीक व्यवस्थापन जल व्यवस्थापनाच्या यशोगाथेसाठी पीक व्यवस्थापन योग्य हवे. ही दोन्ही व्यवस्थापने कोसळल्यामुळेच आजची भयावह परिस्थिती ओढावलेली आहे. जल व्यवस्थापनामधील सर्वात नाजूक भाग म्हणजे यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन. इस्त्राइल या राष्ट्राचे जल व्यवस्थापन हे संपूर्णपणे तेथील सांडपाण्याशी जोडलेले आहे. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करुन त्याचा शेतीला वापर करण्यामध्ये इस्त्राइलबरोबर चीन हा देश आज आघाडीवर आहे. सिंगापूर, द. कोरिया हे देश सांडपाण्याचा अतिशय काटेकोरपणे वापर करतात.  भूगर्भामधील जलसंचय जल व्यवस्थापन शाश्वत करावयाचे असेल तर भूगर्भामधील जलसंचय वाढणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पडणारा पाऊस जमिनित मुरणे हे महत्त्वाचे आहे. कोकणामध्ये पडणारा दक्षिण मॉन्सूनचा प्रचंड पाऊस आहे तसा समुद्राकडे वाहून जातो आणि आम्ही मात्र तेथील माती-खडकाला दोष देऊन मोकळे होतो. विदर्भातही चांगला पाऊस पडतो पण आमच्या रासायनिक जमिनींना तो बरोबर घेऊन नदी-नाल्यांमध्ये जातो. ज्या भौगोलिक पट्ट्यामध्ये भरपूर पाऊस पडतो तेथे सेंद्रिय शेती आणि जंगलनिर्मिती हा जल व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहे. भूगर्भामधील पाणी संचय त्यामुळेच वाढतो. पाण्याचा अनियंत्रित उपसा करण्यासाठी परिसरामधील भूगर्भाला खोल छिद्रे पाडणे हे जल व्यवस्थापनाच्या विरोधात आहे. शासनाने यावर अनेक नियमावली केली मात्र आम्ही पाण्यापेक्षाही त्यास जास्त पुरून उरलो आहोत. जल व्यवस्थापन हा शासनापेक्षाही लोकशिक्षणाचाच जास्त भाग आहे तो याच मुळे.  पाणी केंद्रीकरण व विकेंद्रीकरण पाणी केंद्रीकरण व विकेंद्रीकरण हा शहरी तसेच ग्रामीण भागामधील जल व्यवस्थापनातील कळीचा मुद्दा आहे. देशाच्या विकासासाठी वाहत्या नद्यांना बंदिस्त करून त्यावर मोठमाठी धरणे बांधणे यावर भर देण्यात आला. एका ठिकाणी केंद्रित झालेला हा जलसाठा कसा शाश्वत राहील, त्याचे शेती, औद्योगिक क्षेत्र आणि शहरी भागासाठी कसे योग्य विकेंद्रीकरण होईल याबाबतीत जल व्यवस्थापन आज पूर्ण कोसळलेले आहे. धरणांकाठी रासायनिक शेती करावी का? औद्योगिक क्षेत्रात वापरलेले पाणी कुठे जाते? शहरी भागामधील नळांना ८-१५ दिवसांमधून  एकदाच पाणी येणे हे पाण्याच्या नियोजनाचे गणित चुकल्याचे लक्षण नाही का? धरणाकाठी आणि आजूबाजूच्या डोंगरमाथ्यावर घनदाट वृक्षराजी असणे हा जल व्यवस्थापनामधील महत्त्वाचा धडा आहे. नेमकी या धड्याची पानेच गायब झाल्यामुळे आज महाराष्ट्रामधील शेकडो धरणांनी एप्रिलमध्येच मृत साठ्याला स्पर्श केला आहे. धरणाचा मृत साठा डोळ्यांना दिसणे म्हणजे जल व्यवस्थापन फसल्याचा पुरावा होय. जल विकेंद्रिकरण म्हणजेच केंद्रीय साठ्यामधून त्याचा सुनियोजित पुरवठा हे जल व्यवस्थापनाचे मुख्य अंग आहे.  नायजेरियामधील अनेक शहरांत तीन महिन्यांमधून एकदाच पाणीपुरवठा होतो. हे पाणी मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवले जाते. लोक त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करतात. विशेष म्हणजे पाऊस भरपूर असूनही तेथील गरीब शासनाने जनतेला लावलेली ही सवय आहे. पाणी हे कधीही शिळे नसते. आम्ही मात्र त्यास शिळे, निरोपयोगी म्हणून टाकून देतो. इस्त्राइल, सिंगापूर, दुबई आणि इतर अनेक ठिकाणाच्या शालेय अभ्यासक्रमात बालवाडीपासूनच मुलांना जल व्यवस्थापनाचे धडे शिकवले जातात, दृश्य माध्यमातून गोष्टी रूपाने त्यांना पाण्याचे महत्त्व शिकवले जाते. म्हणूनच जेमतेम पाच इंच पाऊस पडूनही इस्त्राइलमध्ये आपणास कधीही पाणीटंचाई अथवा जलसमस्या निर्माण झालेल्या आढळत नाहीत.  जल व्यवस्थापन हा शासनावर ढकलून दोषारोप करण्याचा विषय नाही. यामध्ये आपल्या प्रत्येकाचा मनापासून सहभाग हवा. पाणी हे निसर्गदेवतेचे स्फटिकासारखे निर्मळ रूप आहे. ते आपण अतिशय आनंदाने निसर्ग हस्ते प्राप्त करून परत ते निसर्गाकडे सुखरूप कसे जाईल याचा सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जल व्यवस्थापन शिकविण्यासाठी निसर्गासारखा उत्कृष्ट शिक्षक नाही.  जल व्यवस्थापनासाठी प्रचंड मोठ्या शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास करण्यापेक्षा या राष्ट्रांनी या क्षेत्रात नेमके काय केले याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. उत्कृष्ट जल व्यवस्थापनासाठी सात मुख्य गोष्टींवर भर देणे ही काळाची गरज आहे. 

  •   घनदाट जंगलनिर्मिती 
  •   नद्यांचे पुनरूज्जीवन 
  •   पीक व्यवस्थापन 
  •   सांडपाणी नियोजन 
  •   भूगर्भामधील पाणी संचय वाढविणे 
  •   पाणी केंद्रीकरण व विकेंद्रीकरण 
  •   शालेय अभ्यासक्रमात जल व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय म्हणून अंतर्भूत करणे.  संपर्क : श्री. टेकाळे -  ९८६९६१२५३१
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com