संपादकीय
संपादकीय

शेतकऱ्यांचा असाही एक पंथ असावा

माझ्या शेतकऱ्यांचा असा एक आगळावेगळा पंथ असावा. त्यामध्ये सेंद्रिय शेती, जंगल, वन्य पशुपक्ष्यांचा आदर, पारंपरिक पीकपद्धती, मातीचा सन्मान व आहे त्यात समाधान ही पाच तत्त्वे असावीत.

शांतता आणि आनंदाच्या शोधात भटकणे, या भटकंतीमध्येच आनंदी, सुखी शेतकरी शोधत राहणे हा माझा छंद आहे. त्यासाठी राज्यांच्या सीमा ओलांडून अनेकवेळा मी परदेशवारीसुद्धा केली आहे. आजही हा प्रवास न थकता अव्याहतपणे चालू आहे. या वेळी मी शोधयात्रेसाठी पंजाब, हिमालच प्रदेश, हरियाना आणि दिल्लीची निवड केली. मात्र शांतता आणि आनंदाचा डोह मला हिमाचल प्रदेशात एका ठिकाणी मिळाला आणि त्याचे नाव होते ‘धर्मशाळा’. 

हिमाचल प्रदेशातील हे एक सुंदर थंड हवेचे ठिकाण दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे जगात सर्वांत उंच ठिकाणी असलेले अद्ययावत क्रिकेट स्टेडियम आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे निवासस्थान. दलाई लामांच्या निवासस्थानाच्या भव्य संकुलात भगवान बुद्धाचे अप्रतिम मंदिर आहे. निशब्द शांतता आणि पवित्र वातावरण असलेले हे मंदिर आणि त्यामधील ध्यानस्त बुद्धाची मूर्ती पाहताना देहभान हरवते. दोन दिवसांच्या मुक्कामात माझा बराच वेळ या मूर्तीच्या सान्निध्यात गेला. निरीक्षण करताना त्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूस असलेले दोन सुविचार मंत्रमुग्ध करणारे होते.  कभी भी बुरा काम मत करो सचरित्रता का धन इकट्टा करो अपने मन को पूर्णतम वश मे रखो यह ही भगवान बुद्ध की शिक्षा है हे वाचत असताना मला बुद्धाची एक गोष्ट आठवली. निबीड अरण्यातून आपल्या मोजक्‍या शिष्यासह प्रवास करत असताना, गौतम बुद्ध रात्रीचा निवास एखाद्या मोठ्या वटवृक्षाखाली करत. आजूबाजूच्या परिसरामधील अनेक शेतकरी त्यांच्या दर्शनास आणि उपदेश ऐकण्यास येत असत. असेच एका मुक्कामी प्रवचन सुरू होण्यापूर्वी एका शेतकऱ्याने त्यांना फलहार अर्पण केला आणि उपदेशाचे दोन शब्द ऐकण्यात तो आतूर झाला.

गौतम बुद्धांनी त्या फळाचे निरीक्षण केले. काही फळावर चोच उमटलेली होती तर कुठे ओरखाडे होते. बुद्धांनी प्रसन्न चित्ताने त्यास विचारले ‘‘ही सुंदर गोड फळे तू कुठून आणलीस?’’ ‘‘अर्थात जंगलामधून’’ शेतकऱ्याने उत्तर दिले. ही मधुर फळे प्राप्त करण्यासाठी केवढा वेळ लागला हेही त्याने आग्रहाने सांगितले. बुद्धांनी सुहास्य मुद्रेने त्या फळाच्या टोपलीस प्रेमाने स्पर्श केला आणि उपदेश रूपाने सर्वांना सांगू लागले.  ‘‘जंगलावर सर्वांत प्रथम अधिकार हा तेथे राहणाऱ्या वन्यप्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आहे. चोच लागलेले हे फळ निश्‍चितच मधुर असणार; पण त्याच्यावर त्या पक्ष्यांचा प्रथम अधिकार होता, माझा नाही. दुसऱ्याच्या हातामधील भरलेले ताट काढून घेणे हे वाईट काम आहे. झाडावरील पक्षी, वानरांना पिटाळून तू ही फळे प्रेमाने माझ्यासाठी आणलीस, हस्तस्पर्श करून मीही ती मनापासून स्वीकारली; पण तो कुणाच्यातरी मुखामधील घास होता, तो माझ्या मुखी जाऊ शकत नाही.’’ हे ऐकून शेतकरी खजील झाला, पण त्याने केलेले हे प्रेमापोटी केले होते. गौतम बुद्धांची शिकवण त्यास मनोमन पटली. 

आज २१ व्या शतकात हे कुणास पटेल का? वाईट काम करू नका, असे सांगितले जात असतानाही दररोज किती वाईट कामे होतात. आम्ही काळ्या आईच्या मुखात अमर्यादित रासायनिक खते घालतो. तिच्या पोटात आनंदाने निवास करणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे मित्र असणाऱ्या लाखो, कोट्यवधी जीव जिवाणूंना नष्ट करतो. शेतामधील दाण्यावर पक्ष्यांचासुद्धा अधिकार आहे, हे आम्ही विसरून गेलो. पक्ष्यांचा त्रास नको म्हणून बांधच मोकळा करतो. संत गाडगेबाबा शेतमजूर असताना ज्वारीच्या पिकाची गोफण घेऊन राखण करीत. त्यांना भेटलेल्या एका बैराग्याने त्यांना या ज्वारीच्या दाण्यावर चिमण्यांचा अधिकार आहे, हे समजावून सांगितले. तेव्हा त्यांनी हातामधील गोफण फेकून दिली आणि ते महान संत झाले.

आम्ही रासायनिक कीटकनाशके वापरतो. कीड मरत नाही. उलट ती अधिक क्षमतेने पिकाचा नाश करत आहेत; आणि फवारणी करणारे मात्र मृत्यूस सामोरे जात आहेत.   निसर्गाने प्रत्येक पिकास नैसर्गिक प्रतिकारशक्ती दिली आहे. पण आम्ही रसायनांचा मारा करून ती नाश करत आहोत. पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खते, कीडनाशके गरजेची आहेत; परंतु त्यांच्या वापर मर्यादित हवा. मला कल्पना आहे की नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती ताबडतोब कृतीत आणणे कठीण आहे, मात्र अशक्‍य नाही. हव्यास सोडला तर हे सहज शक्‍य आहे. 

रासायनिक शेती आणि कीडनाशकांचा अमर्यादित वापर करून आज एकही शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी नाही. महाराष्ट्रात मी जे पाहिले तेच मला पंजाब आणि हरियानात दिसले. मात्र हिमाचल प्रदेश त्यास अपवाद होता. गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘लहान नदी नेहमीच मोठा आवाज करते. मात्र, समुद्र शांत असतो.’’  आज आपण आपल्या लागवडीखालील शेताची मर्यादा आणि त्या भागामधील भौगोलिक परिस्थिती पूर्ण विसरलो आहोत. नको त्या गोष्टींचे आणि पिकांचे अनुकरण चालू आहे.

गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘पायास आपण पाय आहोत हे तेव्हा जाणवते, जेव्हा तो जमिनीस स्पर्श करतो.’’ आज आपणास अशाच स्पर्शाची गरज आहे. ध्यानस्त बुद्धाच्या मूर्तीकडे एकटक पाहताना, त्यांच्या शिकवणीच्या पंचशील तत्त्वांची मनात उजळणी करताना माझ्या मनात उगीचच एक विचार आला, माझ्या शेतकऱ्यांचा असाच आगळावेगळा पंथ असावा. त्यामध्ये सेंद्रिय शेती, जंगल, वन्यपशू-पक्ष्यांचा आदर, पारंपरिक पीक पद्धती, मातीचा सन्मान व आहे त्यात समाधान ही पाच तत्त्वे असावीत. किती सुंदर कल्पना. आनंद आणि शांततेचा शोध अशाच ठिकाणी तर थांबतो.  डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१  (लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com