‘जीआय’ पुढे काय?

एखाद्या शेतीमालास ‘जीआय’ मिळाल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांनी तेथेच न थांबता मान्यताप्राप्त कर्ता तसेच ‘पीजीआय’ नोंद करण्याकरिताही प्रयत्न वाढायला हवेत.
White Onion
White Onion Agrowon

अलिबागचा पांढरा कांदा (White Onion) आणि भंडारा चिन्नोर तांदूळ (Chinnor Rice) यांना नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय) (Geographical Indication) मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जीआय मिळालेल्या शेतीमालाचा (Agriculture Produce) आकडा २८ वर जाऊन पोहोचला आहे. राज्यात लाल आणि पिवळ्या कांद्याचे उत्पादन होत असले, तरी अलिबागचा पांढरा कांदा रंग, आकार, चव, औषधी गुणधर्म, पिकाचा कालावधी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी आपले वेगळेपण टिकवून आहे. या कांद्याला लागवडीचे सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक संदर्भदेखील आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा चिन्नोर हा तांदूळ देखील सुगंध आणि चवीत आपले वेगळेपण टिकवून आहे. अलिबाग आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांत शेतीला फारशी पर्यायी पिके उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशावेळी अलिबागचा पांढरा कांदा आणि भंडारा जिल्ह्यातील भंडारा चिन्नोर ही दोन्ही जीआय प्राप्त उत्पादने शेतकऱ्यांना चांगली अर्थप्राप्ती करून देऊ शकतात. त्याकरिता या भागांतील शेतकऱ्यांनी या दोन्ही शेतीमालांचे पहिल्यांदा उत्पादन वाढवायला पाहिजेत. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून काही उत्पादने बनविता येतील का हे पाहावे. आणि हा ताजा शेतीमाल अथवा प्रक्रियायुक्त उत्पादने ‘लोकल ते ग्लोबल’ मार्केटमध्ये कसे पोहोचतील, यासाठी सुद्धा प्रयत्न वाढवायला पाहिजेत.

White Onion
बिहारच्या ‘खुर्मा’, ‘तीळकूट’, ‘बालूशाही’ला जीआय मानांकनासाठी ‘नाबार्ड’चा पुढाकार

जीआयमुळे त्या उत्पादनास ‘क्वालिटी टॅग’ मिळतो. उत्पादनाचे चांगल्या प्रकारे ब्रॅंडिंग केले जाऊ शकते. विशिष्ट गुणवत्तेमुळे चांगला दर मिळतो. ग्राहकांनाही दर्जाची खात्री पटल्याने तो जादा दर देण्यास पुढे येतो. शेतीमाल निर्यातवृद्धीस हातभार लागतो. जीआय टॅगद्वारे त्या उत्पादनाचे संरक्षण होते. देशांतर्गत अथवा जागतिक बाजारपेठेत त्याच नावाने बोगस माल विक्रीला आळा बसू शकतो. असे फायदे असतानाही ‘जीआय’ मानांकनाच्या बाबतीत आपण जागतिक पातळीवर खूप मागे आहोत. आपल्याकडे २८ प्रकारच्या शेतीमालास जीआय मिळाला तरी नाशिकची द्राक्षे, देवगड-रत्नागिरीचा हापूस, सांगलीची हळद अशी काही दोन-तीन उत्पादने सोडली तर इतर जीआय मानांकनप्राप्त उत्पादनांचे योग्य प्रकारे ब्रॅंडिंग, मार्केटिंग झालेले नाही. जीआय हा कोण्या एका व्यक्तीच्या नावावर मिळत नाही; तर त्या शेतीमालाचे उत्पादन घेणाऱ्या संबंधित शेतकरी समूहाला प्रदान केला जातो. उत्पादक शेतकऱ्यांना हा टॅग वापरायचा असेल, तर त्याला ‘मान्यताप्राप्त कर्ता’ म्हणून स्वतःची नोंद केंद्र सरकारकडे ‘भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री’कडे करणे आवश्यक आहे. अशी नोंद केल्यावरच त्या शेतकऱ्याला स्वतःच्या नावाचे प्रमाणपत्र मिळते. असे प्रमाणपत्र मिळाल्यावरच तो आपल्या उत्पादनास जीआय क्वालिटी टॅग लावून अधिक दर पदरात पाडून घेऊ शकतो.

शेतीमालास जीआय मिळाला तरी त्या भागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी ‘मान्यताप्राप्त कर्ता’ म्हणून नोंदणीसाठी पुढे यायला पाहिजेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात भौगोलिक मानांकन नोंदणीचा उपक्रम कृषी विभागाने २०१४ मध्ये हाती घेतला होता. यात नोंदणीसाठी तत्कालीन १३ जीआय मानांकनप्राप्त पिके घेतली होती. त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. जीआयमुळे शेतकरी आणि ग्राहक दोहोंचा फायदा होत असल्याने कृषी विभागाने मान्यताप्राप्त कर्ता म्हणून नोंदणी उपक्रमाची व्याप्ती आणि गती वाढवायला हवी. राज्य शासनाने जीआय उत्पादनांचे वेगळे ब्रॅंडिंग अन् मार्केटिंग करू, अशीही घोषणा केली होती. त्याला अपेक्षित यश आले नाही.

देशपातळीवर जीआयची नोंद झाल्यावर शेतीमाल परदेशात पाठविण्यासाठी त्याची ‘पीजीआय’ (प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशन) नोंद करणेही आवश्यक आहे. पीजीआयद्वारे जगभर पसरलेले एकमेव उत्पादन म्हणजे दार्जिलिंग चहा हे होय. त्यामुळे एखाद्या शेतीमालास जीआय मिळाल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांनी तेथेच न थांबता मान्यताप्राप्त कर्ता तसेच पीजीआय नोंद करण्याकरताही प्रयत्न वाढायला हवेत. शेतकरी, शेतीमाल उत्पादक संस्था-संघ-कंपन्या, केंद्र-राज्य सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे शक्य आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com