इथे फुलांना मरण जन्मता!

युद्धविरोधी जनमानसाचं प्रतीक म्हणून जगाच्या इतिहासातील ॲन फ्रँकचं स्थान कोणाला नाकारता येणार नाही. दुष्टाच्या तावडीतूनही सुष्ट असं काही उरतंच. दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून सापडलेलं हे सुष्ट. तिची अक्षर रोजनिशी जगाला सतत युद्धापासून दूर राहण्याची निकड सांगत राहील.
इथे फुलांना मरण जन्मता!
Book ReviweAgrowon

मला भावलेलं पुस्तक
------------

“I don''t want to have lived in vain like most people. I want to be useful or bring enjoyment to all people, even those I''ve never met. I want to go on living even after my death!”
- Anne Frank, The Diary of A Young Girl

दोन वर्षं एका बंदिस्त पोटमाळ्यावर तुम्हाला स्वतःला कोंडून घ्यावं लागलं, तर तुमची अवस्था काय होईल? कुणी तरी येऊन तुम्हाला वाणसामान देतं आहे. तुम्ही जेवण करू शकता, कुटुंबीयांशी हळूवार आवाजात गप्पा मारू शकता, पण तुम्हाला खिडकीतून बाहेर डोकावता येणार नाही. स्वच्छ सूर्यप्रकाश अनुभवण्यासाठी बाहेर फेरफटका मारता येणार नाही. युद्धकाळातील सायरन आणि लढाऊ विमानांचे कर्णकर्कश आवाज तुमच्या कानठळ्या बसवतील, पण जीव वाचवण्यासाठी तुम्हाला घराबाहेर धाव नाही घेता येणार... असं ठाणबंद राहणं जमेल तुम्हाला? कोरोना काळात झालेली नाकेबंदी आपण सर्वांनी अनुभवली.

जेमतेम एखादा दिवससुद्धा आपल्याला घराच्या उंबरठ्याआड राहता येत नव्हतं. काही ना काही निमित्त काढून लोक रस्त्यावर धाव घेत होते. त्यासाठी पोलिसांचे दंडुके खाण्याचीही त्यांची तयारी होती. स्वातंत्र्य माणसाला किती प्रिय असतं ना! ते असेल तर आपण मुक्त विहार करू शकतो. घरकोंबडेपण ऐकायला बरं वाटत असलं, तरी ते विशिष्ट कालमर्यादेबाहेर अनुभवणं मानवी सहनशक्ती पल्याडचं आहे, याचं रोकडं भान आपल्याला कोरोना टाळेबंदीनं आणून दिलं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नराधम हिटलरच्या नाझी बगलबच्च्यांपासून बचावासाठी एक ज्यू कुटुंब ॲमस्टरडॅममधील एका इमारतीच्या पोटमाळ्यावर तब्बल दोन वर्षं लपून राहतं. या कुटुंबातील चौदा वर्षांची छोकरी आपल्या बंदिवासातील अनुभवाची रोजनिशी लिहिते. तिच्या अकाली मृत्यूनंतर ती पुस्तकरूपात प्रसिद्ध होते आणि वैश्‍विक युद्ध वाङ्‍मयात अव्वल स्थान प्राप्त करते. ही कथा आहे ॲन फ्रँक या चिमुरडीची आणि तिनं निरागस मनानं लिहिलेल्या रोजनिशीची, जी पुढं ‘दि डायरी आॅफ ए यंग गर्ल’ या नावानं जगप्रसिद्ध झाली. हिटलरसारख्या क्रूरकर्म्याचा हिडीस चेहरा तिनं प्रकाशात आणला, युद्धातला फोलपणाही उघड केला. युद्धविरोधी साहित्यातलं शांततेचं हत्यार म्हणून आजही हे पुस्तक लखलखतं आहे.

ज्यूद्वेष्ट्या नाझींपासून बचाव करण्यासाठी आई, वडील, मोठी बहीण आणि अन्य एका कुटुंबासह ॲन पोटमाळ्यावर लपून राहत होती. तिच्या वाढदिनी वडिलांनी भेट दिलेल्या नव्याकोऱ्या रोजनिशीलाच (डायरी) ती जीवश्‍चकंठश्‍च मैत्रीण मानायची. तिनं रोजनिशीचं नामकरणही ‘किटी’ असं केलं होतं. गुप्त निवासातील (Secret Annex) लोकांच्या सवयी, वागणं, बोलणं, संघर्षाचे प्रसंग, हिटलरचा ज्यू विरोध आणि त्यातून मानवतेचं होत असलेलं नुकसान याचा लेखाजोखा ती खुल्या मनानं आपल्या या प्रिय मैत्रिणीला, किटीला सांगत राहते. ॲन १२ जून, १९४२ पासून १ ऑगस्ट, १९४४ पर्यंत रोजनिशी लिहीत होती. सुरुवातीस ती केवळ स्वतःसाठीच लिहीत होती. नेदरलँड्‍सवर जर्मनांनी ताबा मिळवला होता आणि त्यामुळंच फ्रँक कुटुंबावर लपूनछपून दिवस काढायची पाळी आली होती. तिथल्या सरकारमधील लंडन येथे राजकीय आश्रय घेतलेल्या गेरिट बोल्केस्टीन यांनी लंडनच्या रेडिओवरून एक घोषणा केली, “युद्धसमाप्तीनंतर डच् लोकांना जर्मनांकडून जो छळ सोसावा लागला, त्याचा वृत्तांत जमवून तो जनतेला उपलब्ध करून दिला जाईल.” या भाषणानं प्रभावित होऊन अॅननं ठरवलं, की युद्ध संपल्यावर आपल्या या रोजनिशीच्या आधारे पुस्तक तयार करायचं. म्हणून तिनं या रोजनिशीचं संकलन आणि पुनर्लेखन सुरू केलं. तसं तिला पत्रकार, लेखक व्हायचंच होतं.

जर्मनांनी चालवलेल्या ज्यूंच्या छळाचं, गुप्त निवासाच्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांचं वर्णन करताना १९ नोव्हेंबर १९४२ च्या नोंदीत ॲन म्हणते...

‘आमच्या अनेक स्नेही आणि नातेवाईक मंडळींना ओढून नेले आहे. रोज रात्री लष्करी गाड्या रस्त्यावरून फिरताना दिसतात. वाटेल त्या घरात शिरून तिथे कोणी ज्यू राहतात का याची चौकशी करतात. राहत असतील त्यांना सहकुटुंब, सहपरिवार लॉरीत कोंबून छळगृहात नेले जाते. कधी कधी ते ज्यूंच्या नावाची यादी घेऊनच हिंडतात. त्यांच्या पकडीतून, आमच्याप्रमाणे लपून राहीलं तरच सुटका. एरवी नाही. जिथे त्यांना पैसा मिळेल किंवा हात मारता येईल तिथे जरूर जातात. दरडोई काही रक्कम मिळाली तर माणसांना सोडतातही, पण ते काही खरे नाही. रात्री अंधार पडल्यावर पुष्कळ वेळा मृत्यूची वाट चालत निघालेली लहान मुले, तरुण, म्हातारेकोतारे, अपंग, आजारी यांची मिरवणूक मला दिसते. मुले केविलवाणी रडत असतात, स्त्रिया डोळे पुसत असतात. मोठी माणसे गळा काढून रडत नाहीत एवढेच! खाटिकखान्याकडे निघालेल्या या लोकांना रस्त्यात सुद्धा जर्मन पोलिस धक्के मारतात, फरपटत नेतात, मारहाण करतात. बाहेर असे हाल चालले आहेत आणि आम्ही मात्र इथे सुखरूप आहोत. उबदार बिछान्यात झोपतो आहोत. बाहेर आमची स्नेहमंडळी, नातेवाईक अटकेत, छळगृहात हाल सोसताहेत आणि आम्ही त्यांना काडीचीही मदत करू शकत नाही. काय त्या बिचाऱ्यांचे हाल होत असतील या विचाराने शरम वाटते. त्यांचा गुन्हा कोणता तर ते ज्यू आहेत!’

कोणी तरी नतद्रष्टानं माहिती दिली आणि जर्मन पोलिसांनी गुप्त निवासावर धाड टाकून ॲनसह तिचे कुटुंबीय आणि अन्य ज्यूंना पकडलं. या साऱ्यांची रवानगी छळछावणीत केली गेली. तिथं ॲन आणि तिची बहीण मार्गोट यांचा टाइफॉइडनं मृत्यू झाला. नेमकी तारीख उपलब्ध नाही, पण मार्च १९४५ मध्ये ॲन मरण पावल्याचं मानलं जातं. तिचं दफन कुठं केलं गेलं याचा थांगपत्ता लागला नाही. हजारो ज्यूंचं सामूहिक दफन केलं गेलं. ॲन त्यातच कुठं तरी चिरनिद्रा घेत असावी. मृत्यूपूर्वी मंगळवार १ आॅगस्ट १९४४ रोजी तिनं रोजनिशीत केलेली शेवटची नोंद या षोडषेची परिपक्वता दाखवून देते. ती म्हणते...

प्रियतम किटी,
विसंगती म्हणजे काय? मला वाटते या शब्दाची फोड दोन तऱ्हेने करता येईल. एक विसंगती आतून आलेली म्हणजे मनातली. आणि दुसरी बाहेरून लादलेली. पहिली विसंगती म्हणजे लोकांच्या मतांना न जुमानणारी, स्वत:चेच म्हणणे योग्य, बरोबर असे मानणारी, स्वत:ला सर्व काही समजतं असे धरून चालणारी, थोडक्यात माझ्यासारखी. दुसरा अर्थ आहे, तशीही मी आहे. पण लोकांना ती मी माहीतच नाही आहे. लोक मला ओळखतात ती बंडखोर अॅन म्हणून. मी तुला मागेच सांगितले आहे, की माझे व्यक्तिमत्त्व दुहेरी आहे. एक म्हणजे खूप आनंदी, हसरी, सर्व गोष्टींची चेष्टा करणारी, उत्साही, सर्व गोष्टींकडे खिलाडू वृत्तीने पाहाणारी मी. म्हणूनच कुणी कुणाशी प्रेमाचे चाळे केले, चुंबन, अलिंगन घेतले, दिले, चावट विनोद केले, तर मला फार मोठा उत्पात घडल्यासारखे नाही वाटत. हे माझे व्यक्तिमत्त्व माझ्या दुसऱ्या शांत, पवित्र गंभीर व्यक्तिमत्त्वाला नेहमी मागे सारायला पाहते. इतर लोकांना माझी शांत, सुशील, सुवृत बाजू माहीतच नाही. म्हणून तर ते मला उथळ समजतात. ‘घटकाभर करमणूक’ म्हणून लोकांना मी आवडते. अतिविद्वान, गंभीर प्रवृत्तीच्या माणसांना घटकाभर विरंगुळा म्हणून हलक्या फुलक्या प्रेमकथा, रोमँटिक सिनेमे आवडतात, तरी हे विद्वान लोक त्या प्रेमकथा, सिनेमे थोड्या वेळाने विसरून जातात, तसेच लोकही मला विसरतात, असे तुला सांगायची माझ्यावर पाळी यावी याची मला खरंच लाज वाटते. पण ते सत्य आहे. माझ्यातली आनंदी, खोडकर वृत्ती नेहमीच माझ्या सुशील स्वभावावर जय मिळवते.

माझ्या स्वभावातला कोमलपणा, हळवेपणा, निसर्ग सौंदर्याची आवड लोकांना कळली तर ते माझी टिंगल करतील अशी मला भीती वाटते. मनातून मी फार भावनाप्रधान आहे. ती माझी बाजू प्रकाशात आली की लगेच लाजाळूच्या झाडाप्रमाणे पाने मिटून घेते. म्हणूनच ती गुणी ॲन कधी कुणाला दिसतच नाही. मी एकटी असताना ती प्रकट होते. तुला मागे सांगितल्याप्रमाणे मी जे बोलते ते माझ्या मनात नसतंच मुळी. म्हणून तर लोकांना वाटतं की मी प्रेमकथा वाचणारी, मुलांच्या मागे लागणारी उल्लू मुलगी आहे. असे कुणी मला तोंडावर सांगितलं की मी हसते, खांदे उडवते आणि गंमतीचे उत्तर देते. त्यांचे बोलणे माझ्या मनाला लागले आहे असे दाखवून देत नाही. पण खरीखुरी आतली छुपी अॅन याच्या विरुद्ध प्रतिक्रिया दाखवते. कारण लोकांच्या बोलण्याने मला खरंच वाईट वाटलेले असते.

तुझी, ॲन एम फ्रँक

गुप्त ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांपैकी एकटे ओट्टो फ्रँक कुख्यात आॅश्‍वित्झ छळछावणीतून जून १९४५ मध्ये ॲमस्टरडॅमला जिवंत परतले. त्यांनीच ॲनची रोजनिशी प्रसिद्ध पुस्तकरूपात प्रसिद्ध केली. ते ज्या गुप्त निवासात राहत होते त्या इमारतीची दुरवस्था झाली होती. युद्धानंतर एका कंपनीनं कारखाना उभारण्यासाठी ती विकत घेतली. ओट्टो फ्रँक यांना मात्र ॲन आणि त्यांच्या कुटुबीयांच्या स्मृती जिवंत ठेवायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. शेवटी शहरातील प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले. त्यांनी वर्गणी काढून ही इमारत त्या कंपनीकडून परत विकत घेतली. विश्‍वस्त संस्थेच्या माध्यमातून या इमारतीत ॲन फ्रँक संग्रहालाय स्थापन केलं गेलं. वरच्या मजल्यावरील गोपनीय जागा मात्र आहे तशी जुन्या फर्निचरसह कायम ठेवली. तेव्हाचं वातावरण लोकांना अनुभवता यावं हा त्यामागचा उद्देश. दरवर्षी जगभरातले सुमारे १२ लाख शांतताप्रेमी लोक ॲमस्टरडॅममधील अँन फ्रँकच्या या स्मृतिस्थळाला भेट देऊन अश्रू ढाळतात. आपण मात्र दळभद्री. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्यानं सुरू केलेली देशातील पहिली मुलींची शाळा विद्येच्या माहेरघरात मोडकळीस आली आहे. या महात्म्याच्या मृत्यूला दीडशे वर्षं उलटून गेली तरी तिचा उद्धार होऊ शकलेला नाही. त्यांच्या पुण्याईमुळं पुढारलेल्या महाराष्ट्राची ही ‘कृतज्ञता!’ स्मृती गोड असोत की कटू... सांभाळता आल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत. त्या आपल्याला भल्या-बुऱ्याची जाणीव करून देतात. आपली पावलं नेकीच्या मार्गावर राहण्यासाठी स्मृतींची जपणूक महत्वाची. आपल्याला हे भान येईल तो सुदिन!

ॲनची रोजनिशी मराठीसह जगभरातील ७० भाषांत अनुवादित झाली. तिच्या तीन कोटींहून अधिक प्रति विकल्या गेल्या. ‘टाइम’ नियतकालिकानं विसाव्या शतकातील शंभर प्रभावी व्यक्तींमध्ये ॲनचा समावेश केला. छोटी ॲन आणि तिची रोजनिशी जगभरातील वाचनप्रेमींना भावली. कोवळ्या वयातील एखादी छोकरी इतकी प्रगल्भ असू शकते यावर तसा विश्‍वास ठेवणं कठीणच. लोकांना हे तिचं थोरपण आवडलं. तिचा करुण अंत लक्षावधी सहृदयींच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. या रोजनिशीवर आधारित नाट्य रूपांतरं, चित्रपट, ॲनिमेशनपट यांचं अक्षरशः भांडार उपलब्ध आहे. यू-ट्यूबवर त्याची पडताळणी तुम्हाला करता येईल. काहींनी रोजनिशीच्या आणि ॲनच्याही अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं. हे सारं खोटं आहे, असं त्यांचं म्हणणं. हा विषय युरोपातील न्यायालयांपर्यंत पोहोचला. अगदी अलीकडं म्हणजे सन १९८६ मध्ये नेदरलँड्‍सच्या न्याय मंत्रालयानं रोजनिशीची पडताळणी केली. तिचा कागद, शाई, डिंक हा त्या काळातील असल्याचं छाननीत स्पष्ट झालं. शिवाय हस्ताक्षर तपासणीतही तिचा खरेपणा आढळून आला. १९९० मध्ये हॅम्बुर्ग न्यायालयानंही रोजनिशी अस्सल असल्याचा आणि ती ॲनचीच असल्याचा निर्वाळा दिला. रोजनिशीला आणि ॲनलाही न्याय मिळाला.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या वरवंट्याखाली १५ लाख ज्यू मुलांचा बळी गेला. छळछावण्यांमध्ये काही मुलांचा थेट खून केला गेला, काहींचा वैद्यकीय प्रयोगांमध्ये गिनिपीगसारखा वापर केला गेला. हजारो मुलं उपवास, अतिकष्ट, आजारपण यामुळं खंगून खंगून गतप्राण झाली. निष्पाप जिवांचा हा नरसंहार माणुसकीला काळिमा फासणारा ठरला. बालपण संपवून स्वप्नांच्या दुनियेत पदार्पण करणाऱ्या कोवळ्या जिवांचा असा अंत म्हणजे विश्‍वउन्नतीच्या अनंत शक्यतांचा शेवटच जणू!

आज १२ जून. ॲनचा वाढदिवस. हिटलरच्या तडाख्यातून जगली, वाचली असती, तर आज ती ९३ वर्षांची असती. शरीरानं ती या जगात नसली तरी तिच्या स्मृती चिरंतन आहेत. युद्धविरोधी जनमानसाचं प्रतीक म्हणून जगाच्या इतिहासातील ॲनचं स्थान कोणाला नाकारता येणार नाही. दुष्टाच्या तावडीतूनही सुष्ट असं काही उरतंच. दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून सापडलेलं हे सुष्ट. तिची अक्षर रोजनिशी जगाला सतत युद्धापासून दूर राहण्याची निकड सांगत राहील. लोकहो, तिच्यासाठी दोन अश्रू ढाळा! उमलण्याआधीच कोमजलेल्या या गोड कळीला भावपूर्ण श्रद्धांजली.
---------
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com