शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाच्या निमित्ताने

‘अॅग्रोवन’मध्ये नुकतीच ‘शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी कृत्रिम रेतन’ ही पुण्यश्‍लोक अहल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रांवर तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये राज्यभर ३००० ‘शेळी कृत्रिम रेतन’ केंद्रे उघडणार असल्याविषयीची बातमी व त्यानंतर या विषयावर आलेला अग्रलेख वाचला.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

‘अॅग्रोवन’मध्ये नुकतीच ‘शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी कृत्रिम रेतन’ ही पुण्यश्‍लोक अहल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रांवर तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये राज्यभर ३००० ‘शेळी कृत्रिम रेतन’ केंद्रे उघडणार असल्याविषयीची बातमी व त्यानंतर या विषयावर आलेला अग्रलेख वाचला. अग्रलेखात उल्लेख केल्याप्रमाणे बोकडाचे वीर्य गोठवणे व कृत्रिम रेतन तंत्रज्ञान गाव पातळीवर वापरासाठी विकसित करण्यामध्ये ‘नारी’ संस्था अग्रगण्य असल्याने या तंत्राच्या भविष्यात होऊ घातलेल्या विस्ताराबद्दल आनंद वाटतो. ‘नारी’ संस्थेचे संस्थापक दिवंगत बी. व्ही. निंबकर यांनी घेतलेल्या ध्यासाचे हे ३० वर्षांनंतरचे फलित आहे. १९९२-९३ मध्ये आम्ही जेव्हा प्रथम शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतनाला सुरुवात केली तेव्हा ‘हे शक्य नाही’ अशा प्रकारचा अविश्‍वास मोठ्या प्रमाणावर दाखवला गेला होता. त्याआधी काही संस्थांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते, हे त्याचे कारण होते. त्या वेळी कृत्रिम रेतन तंत्रज्ञान वापरून आम्ही ‘बोअर’ या मटणासाठी जगातील सर्वोत्कृष्ट गणल्या जाणाऱ्या, दक्षिण आफ्रिकेतील शेळी पालकांनी मटणासाठी आनुवंशिक सुधारणा केलेल्या जातीचा महाराष्ट्रात व भारतात प्रसार केला. ‘बोअर’ जातीने अनेक सुशिक्षित तरुणांना व्यावसायिक तत्त्वावर शेळीपालनातून उपजीविकेचा व आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला. आजही बोअर जातीची लोकप्रियता अबाधित आहे.

आम्ही मराठी व इंग्रजीतून ‘शेळीमधील कृत्रिम रेतन’ या प्रशिक्षणपुस्तिका तयार केल्या व मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञ प्रशिक्षित केले. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे व पुण्यश्लोक अहल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळाचे साधारण पंचवीस पशुधन विकास अधिकारीही होते. आमच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून आम्हांस वीर्य गोठवण्याची प्रयोगशाळा स्थापण्यासाठी अनुदान मिळाले. त्या तुटपुंज्या अनुदानात आम्ही प्रयोगशाळा चालू केली व अनेक अडचणींचा सामना करत आजही ती चालवीत आहोत. मथुरा येथील दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विद्यापीठातील वीर्य गोठवणे प्रयोगशाळेच्या प्रमुखांनीही प्रयोगशाळा सुरू करण्याआधी ‘नारी’ संस्थेतच प्रशिक्षण घेतले. श्री. निंबकर यांनीच माणदेशी फाउंडेशनच्या शेळी सखींना ‘दारोदार शेळ्यांचे कृत्रिम रेतन’ हा एक रोजगाराचा मार्ग सुचवला व द्रवरूप नत्रपात्र वगैरे साहित्यासाठी देणगी दिली. संस्थेने या शेळीसख्यांना दोन-तीन वेळा प्रशिक्षण दिले. सध्याही ‘निरंतर मूल्यमापन’ या उपक्रमातून दर महिना-दोन महिन्यांनी एक नवी प्रश्‍नपत्रिका सोडवून घेऊन हे प्रशिक्षण चालू आहे.

इथे कळकळीने नमूद करावेसे वाटते की ‘कृत्रिम रेतन’ हे उत्कृष्ट बोकडाचा वापर जास्तीत जास्त शेळ्यांसाठी व्हावा यासाठीचे फक्त एक तंत्रज्ञान आहे. कृत्रिम रेतनासाठी ज्या बोकडांचे वीर्य वापरायचे ते जर उच्च आनुवंशिक गुणवत्तेचे नसतील तर नुसते नैसर्गिक फलनाऐवजी कृत्रिम रेतन केले (किंवा IVF किंवा भृण प्रत्यारोपण इ. उन्नत तंत्रज्ञान) तर पुढच्या पिढीत आनुवंशिक सुधारणा होईल का, हे सांगता येत नाही. निंबकर कृषी संशोधन संस्थेमध्ये ‘उस्मानाबादी’ शेळीचा वजनवाढीचा दर व दूध उत्पादन या गुणधर्मांमध्ये आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी गेली दहा वर्षे ‘भारतीय कृषी संशोधन परिषद’ (ICAR) संचालित अखिल भारतीय शेळी सुधार प्रकल्पांतर्गत कार्य केले जात आहे. सोलापूर, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद इ. जिल्ह्यांमधील शेळीपालकांकडील शेळ्यांचे दूध उत्पादन व त्यांच्या करडांची वजने याच्या काटेकोर नोंदी ठेवून उत्कृष्ट गुणवत्तेच्या शेळ्यांची नर करडे खरेदी करून व त्यांचे संगोपन करून नंतर त्यांचे वीर्य गोठवले जाते व त्याचा प्रसार केला जातो. अशा पद्धतशीर पैदास कार्यक्रमातून उच्च गुणवत्तेचे बोकड मिळू शकतात.

उपरोल्लिखित बातमीमध्ये ज्या ‘दमास्कस’ जातीचा उल्लेख आहे त्या जातीची सायप्रस देशात अशीच दूध उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय पैदास केली गेली आहे. म्हणून तेथून आणल्या गेलेल्या दमास्कस बोकडांमध्ये जास्त दूध उत्पादनाची जनुके असण्याची जास्त शक्यता आहे. परंतु आपल्या पुण्यश्‍लोक अहल्यादेवी महामंडळाने मात्र जमीन, पाणी, निवारे, प्रशिक्षित कर्मचारी अशी सर्व अनुकूलता असूनही अशी पद्धतशीर सुधारणा स्थानिक शेळ्या-मेंढ्यांच्या जातींमध्ये केलेली नाही. शेळी-मेंढीपालकांना शाश्‍वत आनुवंशिक सुधारणेचा लाभ मिळावा असा दृष्टिकोन राज्यकर्ते अथवा त्यांनी राजकीय सोयीसाठी महामंडळावर नेमलेले पदाधिकारी यांनीही कधी दाखवलेला नाही. वास्तविक महामंडळाची प्रक्षेत्रे ही केंद्रे धरून आसपासच्या २० ते २५ किमी त्रिज्येच्या परिसरातील शेळी-मेंढी पालकांना सहभागी करून सर्व शेळ्या-मेंढ्यांच्या काटेकोर नोंदी ठेवून पाळणारांना ज्या गुणधर्मामध्ये सुधारणा पाहिजे आहे. त्यामध्ये कायमची आनुवंशिक सुधारणा शास्त्रोक्तरीत्या करता येईल. अशा प्रकारचा ५०,००० शेळीपालक महिलांबरोबर राबवला जाणारा प्रकल्प ब्लॅक बंगाल या शेळीच्या जातीत आनुवंशिक सुधारणेसाठी गेली चार वर्षे बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात चालू आहे. तो आगाखान प्रतिष्ठानच्या भारतातील शाखेतर्फे चालवला जात आहे व शास्त्रोक्त पैदास कार्यक्रमासाठी ‘नारी’ संस्था व न्यूझीलंडमधील ‘अबॅकसबायो’ ही कंपनी त्यांना सल्ला देत आहेत. प्रकल्पाला ‘गेट्स प्रतिष्ठान’चे अर्थसाह्य आहे. या कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. यात आंतरप्रजनन नियंत्रणात ठेवण्याचाही समावेश आहे. तेथील शेळीपालक महिलांनाही अनुवंशशास्त्राच्या प्राथमिक तत्त्वांची माहिती आता झाली आहे.

‘जातिवंत’ शेळ्या तेवढ्या उत्कृष्ट आणि ‘अवर्गीकृत’ शेळ्या निकृष्ट असा एक गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. वास्तविक गावा-गावांमध्ये उस्मानाबादी शेळीच्या तोडीस तोड किंवा जास्त उत्पन्न देणाऱ्या उत्कृष्ट पण वेगवेगळ्या रंगांच्या व शारीरिक लक्षणांच्या ‘अवर्गीकृत’ शेळ्या भरपूर आहेत. हेसुद्धा आपले जनुक-वैविध्य व संपत्ती आहे. तिचा योग्य शास्त्रीय पद्धतीने व शेळ्या-मेंढ्या पाळणारांच्या सहकार्याने वापर करून घेण्याची गरज आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन सुयोग्य पैदास कार्यक्रम कधी राबवला जाणार व तो सातत्याने दहा-वीस वर्षे चालू ठेवून त्याचे फायदे शेळी-मेंढी पालकांना कधी मिळणार हाच प्रश्‍न आहे. ‘नारी’ संस्थेच्या ‘नारी सुवर्णा’ मेंढीने असे फायदे कर्नाटक व महाराष्ट्रातील मेंढीपालकांना मिळवून दिले आहेत व अजूनही देत आहे.

(लेखिका निंबकर कृषी संशोधन संस्था (NARI अथवा ‘नारी’) व महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था, फलटण, जि. साताराच्या संचालिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com