
बदलत्या हवामानातील (Chanage Weather) वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे हंगामी तसेच प्रचलित फळपिकांचे वाढलेले नुकसान शिवाय सर्वच शेतीमालास मिळणारा कमी दर यामुळे राज्यातील सर्वच पिकांची शेती तोट्याची ठरत आहे.
त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean) उत्पादकांपासून ते कोकणातील आंबा (mango), काजू (Cashew) उत्पादकांपर्यंत सर्वच शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. कोकणातील शेतकरी रामबुतान, मॅंगोस्टिन अशा विदेशी फळपिकांचा पर्याय आपल्या शेतात तपासून पाहत असून, त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळत आहे.
एवढेच नाही तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात मॅंगोस्टीन, ड्युरियन, स्टारफ्रुट, लोंगन तसेच ॲव्होकॅडो अशा विविध प्रकारच्या विदेशी फळपिकांचे प्रयोग सुरू आहेत.
कोकणातील हवामान प्रामुख्याने ॲव्होकॅडो या फळपिकास पोषक असल्याचे मानले जातेय. तापमानवाढीचा परिणाम जगभरातील सर्वच पिकांवर होत आहे.
कॉफी ॲरेबिका तसेच काजू आणि ॲव्होकॅडो ही फळपिके त्यांच्या मूळ-प्रसिद्ध प्रदेशातून तापमानवाढीने हद्दपार होण्याचा धोका जागतिक पातळीवरील एका अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे.
अशावेळी ॲव्होकॅडोसारखे फळपिक आपल्या मातीत-हवामानात चांगले रुजले तर त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांबरोबर जगभरातील ग्राहकांना होऊ शकतो.
या सर्व पार्श्वभूमीवर बंगळूर येथील आयआयएचआर या संस्थेशी संलग्न चेट्टल्ली येथील केंद्रीय फलोत्पादन प्रायोगिक केंद्राने ‘अर्का कुर्ग रवी’ हा ॲव्होकॅडोचा वाण विकसित केला आहे.
या नवीन वाणामुळे कर्नाटकसह केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम आणि महाराष्ट्रातही ॲव्होकॅडो लागवड क्षेत्रात वाढ होऊ शकते.
ॲव्होकॅडो हे मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील फळपीक आहे. ॲव्होकॅडोचे फळ वरून हिरव्या रंगाचे, साल जाड आणि फळामध्ये एक बी असते.
फळाचा स्वाद लोण्यासारखा असतो. ॲव्होकॅडो ताजे फळ खाण्याबरोबर याचा उपयोग आइस्क्रीम तसेच मिल्क शेकमध्ये देखील केला जातो. या फळाच्या गराची टिकवणक्षमता वाढवून काही विदेशी कंपन्यांनी याचा गर बाजारात आणला आहे.
या गराला अन्नप्रक्रिया तसेच सौंदर्य प्रसाधने उद्योगातून जगभरातून चांगली मागणी आहे. इतर कुठल्याही फळाच्या तुलनेत ॲव्होकॅडोमध्ये पोषकतत्वे अधिक असल्याने जगभरातून मानवी आहारात या फळाचा वापर वाढत आहे.
ॲव्होकॅडो फळामध्ये प्रथिने, मेद, कर्बोदके, जीवनसत्त्वे तसेच क्षार भरपूर असल्यामुळे मानवासाठी ऊर्जेचा चांगला स्रोत हे फळ मानले जाते. ॲव्होकॅडोत आढळणारे फॅटी अॅसिड हृदयासाठी खूप फायदेशीर असते.
भारतात आतापर्यंत मेक्सिको, अमेरिका, गुटेमालन या देशांतून आणलेल्या जातींची लागवड होत होती. परंतु यातील बहुतांश जाती उष्ण कटिबंध भारतीय हवामानास अनुकूल आढळून येत नव्हत्या. आता आपल्या येथील हवामानास अनुकूल अशी जात संशोधित केली गेली आहे.
विभागनिहाय संशोधन संस्थांनी ॲव्होकॅडोचे प्रगत लागवड तंत्र संशोधनातून शेतकऱ्यांना द्यायला हवे. ॲव्होकॅडोत पोषणमूल्ये भरपूर असले तरी याच्या वेगळ्या चवीमुळे हे फळ भारतीय बाजारपेठेत फारसे लोकप्रिय झाले नाही.
आपल्या देशात गोड, पाणीदार फळे खायची सवय आहे शिवाय अशी फळे वर्षभर स्वस्तात उपलब्ध होतात. त्यामुळे देखील ॲव्होकॅडोला ग्राहकांची कमी पसंती दिसते.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याकडील हवामान, बाजारपेठ याचा नीट अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरुवातीला थोड्याफार क्षेत्रावरच ॲव्होकॅडोची लागवड करावी.
ग्राहकांचा प्रतिसाद जसजसा वाढेल तशी आपल्या परिसरातील इतर पिकांना पर्यायी नाहीतर पूरक म्हणून ॲव्होकॅडोच्या लागवड क्षेत्रात वाढ करावी.
सिक्कीम या पूर्वोत्तर राज्यात ॲव्होकॅडोचे क्षेत्र अधिक आहे. तेथील दुर्गम भागातील आदिवासींकडून या फळाचा आहारात वापरही अधिक होतो.
घरगुती पोषण सुरक्षेच्या अंगाने ॲव्होकॅडोचा आहारात वापर वाढायला हवा, अशाप्रकारे स्थानिक लोकांमध्ये प्रबोधन झाले तर ॲव्होकॅडोला देशांतर्गत चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.