Cyclone Update : मॉन्सूनचे आगमन सुरु असतानाच चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत

Monsoon Update : राज्यात चक्रीवादळांची संख्या वाढत असताना मॉन्सूनचे आगमन, प्रवास तसेच पडणारा पाऊस, पेरणी, पिकांची वाढ यावर होणारा परिणाम याचा नीट अभ्यास करावा लागणार आहे.
Cyclone
CycloneAgrowon

Monsoon Rain : महाराष्ट्र राज्यात या वर्षी जूनमध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) आठवड्याभरापूर्वी अरबी समुद्रात येऊन दाखल झाले असले, तरी शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे सल्ले हवामानतज्ज्ञांकडून दिले जात आहेत.

त्यातच मॉन्सूनची आगेकूच चालू असताना अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत मिळाले आहेत. या वादळामुळे मॉन्सूनची वाटचाल थबकली असून पुढे पोषक अशी स्थितीही दिसत नाही.

त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी उत्साहाने कामाला लागलेल्या शेतकऱ्यांची यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच थोडी निराशा झाली आहे.

पूर्वीपासूनच जगभरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे प्रमाण अधिक असले तरी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात वर्षभरात केवळ चार ते सहा चक्रीवादळे एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निर्माण होत होती. त्यापैकी एक-दोन वादळेच अरबी समुद्रात निर्माण होत होती, तीही भारतीय किनारपट्टीच्या दिशेने आगेकूच न करता पश्‍चिमेकडचा मार्ग पत्करून निघून जात होती.

मागील चार-पाच वर्षांत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण आणि तीव्रताही वाढली आहे. वैश्‍विक तापमानवाढीने समुद्राचे वाढत असलेले तापमान आणि हवेतील वाढते धूलिकण (एरोसोल) ही त्याची दोन मुख्य कारणे आहेत.

चक्रीवादळे मॉन्सूनपूर्वी (मे-जून सुरुवात) निर्माण होवोत की मॉन्सूननंतर (ऑक्टोबर-नोव्हेंबर) ते शेतीच्या अनुषंगाने भयंकर विनाशकारी असतात. या चक्रीवादळाने पाऊस लांबला तर पेरण्या खोळंबतील, त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होऊ शकतो.

Cyclone
Monsoon Update 2023: माॅन्सून दोन दिवसांत केरळला धडकणार; आयएमडीचा अंदाज

पावसाळ्याच्या सुरुवातीस उत्तर भारतावर मॉन्सून ट्रफ नावाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि पावसाळा संपेपर्यंत तो तसाच टिकून राहतो. तो थोडा दक्षिणेकडे सरकला तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशात खूप पाऊस पडतो. पण तो पट्टा जेव्हा उत्तरेकडे जाऊन बसतो, तेव्हा पावसाचा जोर सगळीकडेच मंदावतो.

या परिस्थितीला ‘मॉन्सून ब्रेक’ म्हणतात. मॉन्सून जर असा दीर्घकाळ खंडित राहिला, तर देशभर पावसाचे प्रमाण कमी होते आणि त्यातून दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अतिवृष्टी तसेच अनावृष्टीला हा स्थानिक पातळीवरील कमी दाबाचा पट्टाही जबाबदार असून, याची फारशी चर्चा होत नाही. पाऊस कमी-अधिक पडण्यासाठी चर्चा होते ती ‘एल निनो’ आणि ‘ला-निना’चीच!

मॉन्सूनचे दीर्घ अवधी पूर्वानुमान करता येते, तसे चक्रीवादळांचे करता येत नाही. कारण चक्रीवादळांचे आयुष्य अवघ्या चार-सहा दिवसांचेच असते. त्यामुळे चक्रीवादळांचे पूर्वानुमान फार तर चार-पाच दिवस आधी करता येते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक चक्रीवादळ वेगळे असते.

त्याचे उगमस्थान, त्याचा मार्ग, त्याची तीव्रता आणि किनारा ओलांडण्याचे त्याचे ठिकाण हे सर्व वेगळे असते. तरीपण हवामानशास्त्रात आणि तंत्रज्ञानात अलीकडे झालेल्या प्रगतीमुळे या सर्व घटकांचे निदान करता येणे आता शक्य झाले आहे. चक्रीवादळांबाबत बिनचूक अंदाज देणारी रडार यंत्रणा, उपग्रह छायाचित्रे याखेरीज भूपृष्ठांवरील निरीक्षणे अशी अद्ययावत यंत्रणा जोडीला आहे.

परंतु यात अजून अचूकता येणे गरजेचे आहे. राज्यात चक्रीवादळांची संख्या वाढत असताना त्याचा मॉन्सूनचे आगमन, प्रवास तसेच प्रत्यक्ष पडणाऱ्या पावसावर, पेरणी, पिकांची वाढ यावर होणारा परिणाम याचा नीट अभ्यास करावा लागणार आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करावे लागेल. विनाशकारी तीव्र चक्रीवादळांची अचूक माहिती त्यांचा तडाखा बसणाऱ्या लोकांपर्यंत तत्काळ पोहोचवून मदत आणि बचाव कार्यातही सुधारणा करावी लागेल. असे झाले तरच चक्रीवादळाने होणारे शेतीचे नुकसान आणि इतरही जीवित-वित्तहानी कमी होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com