Rice : ‘आसावरी’ चे संशोधन भारी

भाताच्या अनेक स्थानिक जाती लुप्त होत असताना आसावरी यांनी त्यांच्या संवर्धनाबरोबर त्यातून निवड पद्धतीने नवीन जाती विकसित करण्याचे बहुमूल्य असे काम केले आहे.
Rice New Variety
Rice New VarietyAgrowon

गरज ही शोधाची जननी असते, याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येत असतो. आज आपण पाहतोय, प्राप्त परिस्थितीला अनुरूप आणि शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित संशोधन संस्थांकडून होताना दिसत नाही. अशावेळी नवनवीन यंत्रे-अवजारे (Machinery)असो तंत्रज्ञान असो की पिकांनी वाणं असो, यातील संशोधनात शेतकरीच (Agricultural Research) आघाडी घेत आहेत. बदलत्या हवामान काळात शेतीमधील अडचणी वाढल्या आहेत.

यावर मात करण्यासाठी अनेक शेतकरी नवनवे मार्ग शोधत आहेत. शेतकऱ्यांची हीच शोध यात्रा परिसरातील तमाम शेतकऱ्यांना उपयुक्त असल्याचेही अनेक ठिकाणी दिसून येते. आता बहुतांश हंगामी पिकांमध्ये कीड-रोगांना कमी बळी पडणाऱ्या, अधिक उत्पादनक्षम या गुणवैशिष्ट्यांबरोबर कमी कालावधीच्या, निविष्ठांना उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, चवदार-पोषणमूल्ययुक्त तसेच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम जातींची गरज आहे.

Rice New Variety
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

पूर्व विदर्भासारख्या दुर्गम भागात भात पीक अधिक घेतले जात असल्याने उत्पादकांची ही गरज पूर्ण करण्याचे काम आसावरी पोशेट्टीवार या महिला शेतकरी संशोधकाने केले आहे. मुळात आजच्या परिस्थितीत शेती करणे किती कठीण झाले, याची जाणीव सर्वांना आहे. अशावेळी भाताच्या निवड पद्धतीने सहा तर विकिरण तंत्राने तीन (एकाचे नामकरण बाकी) जाती विकसित करण्याचे काम आसावरी यांनी केल्या आहेत. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या संशोधनाचा फायदा होत आहे.

Rice New Variety
Crop Damage : पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित

आसावरी यांचा लग्नापूर्वी शेतीशी फारसा संबंध आलेला नव्हता. सासरी चंद्रपूर जिल्ह्यात आल्यावर मात्र त्या शेतीतच नाही तर शेती संशोधनात चांगल्याच रमल्या. आसावरी यांना त्यांच्या संशोधनात सासरे- अण्णासाहेब पोशेट्टीवार आणि डॉ. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे माजी शास्त्रज्ञ शरद पवार यांचे चांगले मार्गदर्शन लाभले.

शेती संशोधनात संयम, सातत्य अन् चिकाटीला फार महत्त्व आहे. आसावरी यांच्या वीस वर्षांच्या संशोधन प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. भात वाणांमध्ये संशोधन करायचे तर शुद्ध बियाणे त्यांना उपलब्ध होत नव्हते. त्यांचे सासऱ्यांची पारंपरिक राइस मिल आहे. त्यासाठी त्यांना धान खरेदी करावा लागत असे. त्या वेळी त्यांना एकाच गुणवैशिष्ट्यांचा धान मिळत नव्हता. त्याचा परिणाम मिलिंगवर पर्यायाने भाताच्या दर्जावर होत होता.

याचे मूळ कारण बियाणे शुद्ध नसणे हे आहे, हे त्यांनी ताडले. येथूनच त्यांना भात वाणांत संशोधनाची प्रेरणा मिळाली. संशोधनाचा सुरुवातीचा चार-पाच वर्षांचा काळ हा बियाणे शुद्धीकरणात गेला. हे करीत असताना त्यांना स्थानिक जातींमध्ये खूप वैविध्यता आढळून येत गेली. त्यानुसार उत्पादक शेतकरी, ग्राहक अर्थात मार्केटच्या गरजेनुसार संशोधनावर भर दिला. अलीकडच्या काळातील वाढत्या नैसर्गिक आपत्तींचा फटका त्यांच्या संशोधनालाही बसत गेला.

मजूरटंचाईनेही संशोधनात वेळेवर कामे होत नव्हती. परंतु कोणत्याही अडचणीत न डगमगता त्यावर मात करत त्या पुढे जात राहिल्या. भाताच्या अनेक स्थानिक जाती लुप्त होत आहेत. आसावरी यांनी स्थानिक जाती संवर्धनाबरोबर त्यातून निवड पद्धतीने नवीन जाती विकसित केल्या आहेत.

त्यांच्या भात जाती कमी कालावधीच्या असल्याने वाढत्या नैसर्गिक आपत्तींना कमी बळी पडतात. एक जात तर कमी खत मात्रा वापरली तरी चांगले उत्पादन देते. अर्थात, कमी खर्चात ही जात चांगली येते. तळोधा रेड - २५ ही जात उच्च रक्तदाब तसेच मधुमेही लोकांसाठी उत्तम मानली जाते.

त्यांनी संशोधित केलेल्या सर्वच जाती स्थानिक वातावरणात चांगल्या येतात. त्यांच्या संशोधनातून अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया या पिकांमध्ये निवड पद्धतीने वाण विकसित करण्याची प्रेरणा राज्यातील शेतकऱ्यांना मिळते. आपले शेत हेच प्रयोगशाळा मानून त्यात संशोधनाचे काम शेतकऱ्यांनी करीत राहावे. आपल्या राज्यात शेतकरी संशोधकाची फारशी दखल घेतली जात नाही, त्यांच्या संशोधनाला उचित प्रतिष्ठा मिळत नाही. येथून पुढे तरी शेतकऱ्यांच्या संशोधनाला राजमान्यता मिळावी, हीच अपेक्षा!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com