अनावश्यक खर्च टाळा

विवाह, दशक्रिया, बारसे, हळद, प्री-वेडिंग, वर्षश्राद्ध, वाढदिवस या सर्वच कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या आणि चुकीच्या प्रथा पाडल्या गेल्या आहे. त्यातून मिळणारा आनंद कमी होऊन ते इव्हेंट करण्यासाठीचा आर्थिक ताण मात्र वाढला आहे.
Expenses
ExpensesAgrowon

कुठलाही समारंभ, कार्यक्रम, विधी हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. प्राचीन काळापासून हे सर्व प्रकार सुरू आहेत. मात्र त्यात कालानुरूप काही बदल करण्यात आले. मात्र त्यात जे बदल करणे आवश्यक होते ते झाले नाहीत. सण, समारंभ, विधी, कार्यक्रम याशिवाय मानवी जीवन निरस वाटू लागते. मात्र आजकाल जवळपास सर्वच कार्यक्रमांमधून चुकीच्या, कालबाह्य आणि अनावश्यक खर्च वाढवणाऱ्या परंपरा सुरू झाल्या आहेत. अनेक परंपरांचा अर्थ न लावता त्या पूर्वापार जशाच्या तशा पाळणे सुरू आहे. या सर्व परंपरांचा श्रीमंत वर्गावर फारसा परिणाम होत नाही. परंतु मध्यमवर्गीय शेतकरी आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या परिवारांवर त्याचा प्रभाव आणि ताण पडत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांचा फेरविचार करून त्यात बदल करणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या परिवारावर या सर्व प्रकारचा आर्थिक ताण निर्माण झाल्याने त्यांच्या कर्जात देखील वाढ झाली आहे. उच्चभ्रू कुटुंबांनी देखील या परंपरांऐवजी त्यात काही परिवर्तन केल्यास मोठे सामाजिक कार्य उभे राहू शकते.

Expenses
Fertilizer Adulteration : भेसळयुक्त खते शोधण्यासाठी कृषी केंद्रे तपासणीचे आदेश

विवाह हा प्रत्येकाच्या घरातील एक आनंदाचा सोहळा असतो पूर्वीच्या काळी हुंडा मागण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. अलीकडे सामाजिक जनजागृतीमुळे काही प्रमाणात ही प्रथा कमी झाली आहे. मुला आणि मुलींचे गुणोत्तर बिघडल्याने मुली मिळणे अवघड झाले आहे. काही समाजात आता मुलीला हुंडा देण्याची प्रथा आहे त्यात देखील आता वाढ होत आहे हे चिंताजनक आहे. हुंडा पद्धत काही प्रमाणात कमी झाली असली तरी लग्न सोहळ्याचा खर्च कमी होताना दिसत नाही. कोविडच्या काळात छोटे -छोटे लग्न सोहळे झाले तरी आता मात्र पूर्वीप्रमाणे किंवा पूर्वीपेक्षाही मोठे सोहळे परत एकदा सुरू झाले, त्यातच कमी की काय अनेक लग्नांमध्ये प्री-वेडिंग नावाचा अत्यंत चुकीचा, खर्चीक प्रकार सध्या सुरू झाला आहे. अलीकडे काही गावांनी, काही धर्मांनी तो बंद केला असला तरी त्याचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

प्री-वेडिंगचा खर्च हजारो -लाखो रुपयात असतो शिवाय चित्रविचित्र कपड्यात, चित्रविचित्र हावभावांचे, अंगप्रदर्शन करणारे लग्नाच्या अगोदरचे फोटो उपस्थितांना पाहणेदेखील गैरसोयीचे आणि अवघडल्यासारखे वाटतात. काही जोडप्यांचे विवाह या प्री-वेडिंगनंतर मोडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. एकीकडे आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगतो आणि दुसरीकडे प्री-वेडिंगसारख्या प्रकारांसाठी आपल्या मुला-मुलींना लग्न होण्याअगोदर पाठवतो हे देखील योग्य नाही. उच्चभ्रू आणि अतिश्रीमंत लोकांना बघून इतरांनी हे प्रकार करणे आवश्यक नाही. अनेकांच्या प्री-वेडिंगच्या खर्चात दोन-चार जोडप्यांचे विवाह होतील, त्यांनी तो पैसा तिकडे दिल्यास उत्तम सामाजिक कार्य उभे राहू शकेल.

Expenses
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

विवाह सोहळ्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती असण्याची गरज नसते त्यापेक्षा आपले जवळचे, प्रेमाचे माणसं बोलून त्यांचा चांगल्या प्रकारे पाहुणचार करणे आवश्यक आहे. अनेक विवाह सोहळ्यात हजारोंची उपस्थिती असते, लाखोंची रोशणाई असते मात्र जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अन्नाचा दर्जा चांगला असल्यास अन्न वाया जाणार नाही आणि चांगले अन्नदान केल्याचे समाधान देखील मिळेल. समारंभातील अन्न खाऊन अनेकांना आजारपण येते तर काही ठिकाणी विषबाधेसारखे प्रकार देखील होतात.

विवाहासाठी भेटवस्तू, कपडे आणण्याची प्रथा बदलणे आवश्यक आहे. कारण दिलेली भेटवस्तू खरंच वापरात येते का किंवा ती वापरण्याजोगी असते का हा खरा प्रश्‍न आहे. विवाहात फेटे बांधणे, टोप्या घालणे इत्यादी प्रकार खूप खर्चीक असतात आणि वायफळ देखील त्यामुळे त्याला बंधने घातली पाहिजे. देण्याची खूप इच्छा असल्यास फुल किंवा पुस्तके भेट दिल्यास त्यातून निश्‍चित फायदा होईल. घराघरांतील वाचन संस्कृती परत वाढीस लागेल आणि प्रकाशन संस्थांना आलेली मरगळदेखील दूर होण्यास मदत होईल. फटाक्यांची आतषबाजी आणि विवाह मंडपात लावला जाणारा दारूगोळा खूप त्रासदायक आहे मात्र तो का लावतात हे अद्याप समजले नाही.

ते लावल्याने प्रचंड प्रमाणात हवेचे प्रदूषण होतं अक्षरशः श्‍वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो त्या ऐवजी लोबान, चंदन, अगरबत्ती यांचा वापर केल्यास त्यातून निश्चित फायदा होईल. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी साध्या बँड चा वापर करावा. सरकारने डीजे या प्रकारावर कायदेशीर बंदी घातली पाहिजे. व्हॉट्सअप आल्यापासून लग्नपत्रिका आणि आमंत्रण पत्रिका त्यावरच पाठवल्या जातात, मात्र आजही काही महाभाग हजारो पत्रिका छापून प्रत्यक्ष जाऊन वाटत असतात त्यातून त्यांचा इंधनाचा खर्च, वाटणाऱ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, छोटे-मोठे अपघात नेहमीच घडतात त्या ऐवजी मेसेज, कॉल, व्हॉट्सॲपचा वापर वाढला पाहिजे. साखरपुडा, हळद, मेहंदी, वैदिक, रिसेप्शन, वरात, फुलके हे प्रकार कमी करून एका दिवसात विवाह सोहळा करण्याचा प्रस्ताव ठेवला पाहिजे किंवा शक्य तेवढा खर्च कमी करणे आवश्यक झाले आहे. कर्ज काढून विवाह सोहळा करण्यापेक्षा आनंदात सोहळा कसा होईल हे पाहिले पाहिजे. वृक्षारोपण वाढवण्यासाठी वृक्षांची रोपे, बियाणे यांचे वाटप विवाह सोहळ्यात झाल्यास उत्तम सामाजिक कार्य उभे राहील. आहेर स्वरूपात कपडे, गिफ्ट देण्यापेक्षा रोख पैसे दिल्यास विवाहाच्या खर्चात थोडाफार हातभार लागू शकेल.

बारसे किंवा बाळ पाहण्याच्या कार्यक्रमात सोन्या-चांदीच्या पत्र्याचे दागिने देण्याचा प्रकार केला जातो. दिलेला दागिना हा अत्यंत कमी वजनाचा असल्याने तो फक्त मोडण्यासाठीच वापरला जातो. मात्र तो दागिना आणणारा आणि घेणारा हे दोघेही नुकसानीतच असतात. म्हणून ही प्रथा बंद करून त्या ऐवजी रोख पैसे देण्याची पद्धत अवलंबली पाहिजे. बाळाला देण्यात येणारे कपडेसुद्धा शक्यतो वापरात येत नाहीत कारण ते खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि बाळाचं वय वाढल्यावर त्याला ते कपडे येत नाही त्याऐवजी देखील पैसे दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. वर्षश्राद्ध सारख्या किंवा दहाव्या, तेराव्या सारख्या कार्यक्रमात देखील कपडे, टोप्या, उपरणे, टावेल, शाल दिल्या जातात ज्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही.

या खर्चांना फाटा देऊन त्या ऐवजी दुसरे काहीतरी समाजकार्य करणे आवश्यक आहे. वाढदिवस मोठे-मोठे साजरे करण्यापेक्षा वृक्षारोपण, पाणपोई आणि इतर काही प्रकारे आपण समाजकार्य करू शकतो आणि त्यातून आनंद घेऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटायला जाताना रुग्ण गरीब असल्यास रोख स्वरूपात मदत करणे आवश्यक आहे त्यातून त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. समारंभातील विविध चुकीच्या प्रथांमुळे समाजातील काही घटकांना फायदा होतो मात्र बहुसंख्य जनतेचे नुकसान होते. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि विशेषतः शेतकरी वर्गाने याकडे लक्ष देऊन सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे, असे बदल करण्यासाठी गावांनी, समाजाने, धर्माने, जातीने समूहाने एकत्र येऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा रोज येणाऱ्या नवनवीन प्रथांसाठी बँकांना नवीन काहीतरी कर्ज योजना आणाव्या लागतील याचं नवल वाटू नये.

(लेखक सामाजिक प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com