मागासलेपणाचे मर्म

विदर्भ, मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर तेथे पिकणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करून ते जगभर पोहोचतील, याची काळजी स्थानिक नेत्यांनी घ्यायला हवी.
farmer
farmer Agrowon

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भ-मराठवाड्यातील नेत्यांना चांगलेच सुनावले. पवार यांनी विदर्भ-मराठवाड्यातील शेतीसह एकंदरीतच या भागाच्या मागासलेपणाच्या मर्मावर बोट ठेवले आहे. विदर्भ-मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेसह नेतेही पश्चिम महाराष्ट्रातील विकासावर कायमच टीकात्मक बोलत असतात. परंतु या नेत्यांना आपापल्या भागांचा विकास करण्यास कोणी रोखले, हा खरा प्रश्न आहे. मागील ६० वर्षांतील निम्मा काळ राज्याचे मुख्यमंत्रिपद हे विदर्भ-मराठवाड्याकडे राहिले आहे. तसेच या भागातील मतदार संघनिहाय आमदार, खासदारही वेळोवेळी निवडून जात असतातच. यातील काही लोकप्रतिनिधी सोडले तर उर्वरित लोकप्रतिनिधींनी काय केले, असाही प्रश्न उपस्थित होतो.

farmer
हे जीवन सुंदर आहे

विदर्भ-मराठवाड्याचा विचार केला तर कापूस, सोयाबीन, ज्वारी, भात, संत्रा, मोसंबी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही नगदी पिके औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. कापूस तसेच सोयाबीन जागतिक स्तरावरून मागणी असणारी ही पिके आहेत. विदर्भातील संत्रा आणि मराठवाड्यातील मोसंबी या फळपिकांचे व्यवस्थित मार्केटिंग झाले तर ही पिके देखील जगभर पोहोचू शकतात. पूर्व विदर्भातील भात हे पीक देशाच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून यापासून इथेनॉल करता येत असल्याने इंधनाच्या दृष्टीनेही या पिकाचे महत्त्व वाढले आहे. प्रक्रियेच्या दृष्टीने देखील ही सर्व पिके फारच महत्त्वाची आहेत. असे असताना कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी, संत्रा, मोसंबी या पिकांचे उत्पादक प्रचंड अडचणीत आहेत.

या पिकांस रास्त दर तर सोडाच, अनेक वेळा खरेदीचे पण वांदे होतात. विभागनिहाय बाजारपेठा तसेच प्रक्रिया उद्योगांचे जाळे विकसित न झाल्यामुळे या सर्व शेतीमालास मागणी नसते, दरही कमी राहतात आणि उत्पादक वर्षानुवर्षे या पिकांची तोट्याची शेती करीत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर सातत्याने टीकेची झोड उठविली जाते. परंतु शेतीमालावर परिपूर्ण प्रक्रियेचे साखर कारखाने आदर्शवत मॉडेल आहेत. परिसरातील उसाला कारखान्यांच्या माध्यमातून जवळच बाजारपेठ आणि उत्पादक शेतकऱ्यांना हमीदरासह एकरकमी पैसा मिळतो. साखर कारखान्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊन परिसराचा कायापालट झाल्याचे आपण पाहतोय.

farmer
हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांनी आपापल्या भागात साखर कारखाने उभारून ते यशस्वीपणे (काही अपवाद वगळता) चालवत आहेत. तुलनात्मकदृष्ट्या बघितले तर उसाप्रमाणे कापूस विदर्भ-मराठवाड्यात घेतला जातो. या पिकावरही कापूस ते कापड अशी प्रक्रिया करण्याची चांगली संधी या भागातील नेते-उद्योजकांना होती. परंतु ही संधी त्यांनी गमावली आहे. आज विदर्भ-मराठवाड्यातील कापसावर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तसेच गुजरात आणि तमिळनाडूमध्ये प्रक्रिया होते. साखर कारखान्यांप्रमाणे विदर्भ-मराठवाड्यात सूत-कापड गिरण्यांचे जाळे उभे राहिले असते तर कापसाला मागणी वाढून दर अधिक मिळाला असता.

सोयाबीनवरही प्रक्रिया करून खाद्यतेल, सोयापेंडसह अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. असे असताना या भागात सोयाबीनवर देखील प्रक्रिया होताना दिसत नाही. विदर्भ, मराठवाड्यात दुग्धव्यवसायालाही मोठा वाव आहे. स्थानिक नेत्यांनी दूध संघ उभारले तर दुधाला चांगला दर मिळेल, दुधावर प्रक्रिया करून दूध भुकटीसह इतरही अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले तर त्यांना जगभरातून मागणी आहे. रेशीम शेतीत मराठवाड्याने आघाडी घेतली असून त्याची फळे शेतकऱ्यांसह प्रक्रिया उद्योजकांनाही मिळत आहेत. विदर्भ, मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर तेथे पिकणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करून ते जगभर पोहोचतील, याची काळजी स्थानिक नेत्यांनी घ्यायला हवी. तसेच शेतीपूरक जोडधंद्यांना या भागात चालना मिळाली पाहिजे. कोणावर टिका करण्याऐवजी आपल्या भागात शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग कसे उभे राहतील, हे विदर्भ-मराठवाड्यातील स्थानिक नेत्यांनी पाहायला हवे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com