Avkali Pauas : अवकाळीने केला शेतकऱ्यांचा घात

मुख्यमंत्र्यांनी केवळ आदेश देऊन भागणार नाही, तर जिल्हानिहाय आढावा घेत राहून मदत तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल हे पाहावे.
Avkali
AvkaliAgrowon

Crop Damage : या वर्षीचा फेब्रुवारी महिना हा १२३ वर्षांतील सर्वांत उष्ण महिना ठरला. फेब्रुवारी महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे गहू, मोहरी, हरभऱ्याला चांगलाच फटका बसला. या पिकांच्या उत्पादकतेतही घटीची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानुसार राज्यात परिणामही दिसत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत गहू, हरभऱ्याचे कमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे एकीकडे पीक उत्पादकतेत घट तर दुसरीकडे मानवनिर्मित आपत्तींमुळे कांदा, तूर, हरभरा, कापूस यासह इतरही शेतीमालाचे दर पडले आहेत.

कमी दरामुळे कोणी कांद्याची होळी करतेय, तर काही शेतकरी भाजीपाला चक्क फुकट वाटत आहेत.

गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजीपाला, कडधान्य तसेच कांद्यासह इतरही नगदी पिकाला फुटी कवडीही दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, खासगी सावकारी तसेच बॅंक कर्ज चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने देवळा तालुक्यातील (जि. नाशिक) माळवाडी हे गावच ग्रामस्थांनी विक्रीला काढले आहे.

Avkali
Pauas : अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले

आमचे गाव सरकारनेच विकत घ्यावे, अशीही ग्रामस्थांची मागणी आहे. राज्यातील इतरही अनेक गावांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. राज्याच्या गावशिवाराची अशी भीषण परिस्थिती असतानाच रब्बी-उन्हाळी हंगामावर निसर्गाने घाला घातला आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मागील तीन दिवसांपासून कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट सुरू आहे. गुजरातमध्ये तयार झालेल्या चक्राकार वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात सध्या वादळी पाऊस सुरू आहे. या पावसाने आणि गारपिटीने गहू, हरभरा, मका, भाजीपाला याबरोबरच द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्रा, केळी अशा फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांना हवामान विभागाकडून मिळाला होता. परंतु गारपीट आणि वादळी पाऊस नेमक्या कोणत्या क्षेत्रात होणार, हे स्पष्ट नव्हते. अचानकच वातावरण बदलल्याने एक-दोन दिवसांत रानचा पसारा अनेकांना आवरता आला नाही.

शिवाय हरभरा असो की द्राक्ष ती काढणीला आल्याशिवाय काढता येत नाहीत. काही ठिकाणी पीक काढणीला आले तरी मजूर तसेच यंत्रांच्या अभावामुळे पिकांची काढणी वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे नुकसान वाढले आहे.

खरिपात अतिवृष्टीच्या मारानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी हा हंगाम उभा केला होता. बहुतांश शेतकऱ्यांना यासाठी पदरमोड करावी लागली, तर इतरांनी खासगी सावकारांकडून नाहीतर बॅंकेचे कर्ज घेऊन पिके उभे केली आहेत.

महत्त्वाचे म्हणजे काढणीला येईपर्यंत ही पिके शेतकऱ्यांनी जोपासली. महागाईच्या काळात पीक व्यवस्थापन खर्चसुद्धा अधिक झाला. आणि पीक आता हाती येणार म्हणताना निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविण्याचे काम केले आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन उभे करावे लागणार आहे.

Avkali
Mobile Agriculture: मोबाईलमुळे शेतकरी चौथ्या लाटेवर स्वार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मदतीसंबंधी निर्णय घेणार आहेत. नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून पाहणी-पंचनाम्याचे आदेश दिले जातात.

प्रशासन पातळीवर याबाबत कोणीही गंभीर दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पंचनामे होत नाहीत. शेतकऱ्यांना मदतही मिळत नाही. मदत किती, कधी, कशी द्यायची यावरून पण राजकारण चालते. यात अनेक नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहतात.

तसे यावेळी होता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी केवळ आदेश देऊन भागणार नाही, तर जिल्हानिहाय आढावा घेत राहून मदत तत्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल हे पाहावे. खरे तर या हंगामावर घर कुटुंबातील लग्नकार्यासह शेतकऱ्यांचे आगामी खरिपाचे नियोजन असते. त्यामुळे नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, ही काळजी शासन-प्रशासनाने घ्यायला हवी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com