
प्रारंभी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) ‘भारत जोडो पदयात्रे’वर (Bharat Jodo Yatra) टीका करणारा भाजप (BJP) आणि समांतर विचारांच्या अराजकीय संस्थांही आता गप्प झाल्या आहेत. ही यात्रा इतक्या जिद्दीने लाखोंची गर्दी करीत पुढे सरकेल, याचा अंदाज त्यांना आला नसावा. गेल्या पाऊणशे दिवसांमध्ये राहुल गांधी आणि सहकाऱ्यांनी २२०० कि.मी. अंतर कापले आहे. दररोज २५ कि.मी. पायी चालणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. विविध संकटांवर मात करीत, वाटेत येणाऱ्या अडचणींचा सामना करीत आणि आपल्यातील ऊर्जेला, इच्छाशक्तीला सर्वसामान्यांच्या सेवेला जुंपत राहुल गांधी निघाले आहेत.
सात सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेतून आश्चर्यकारक बदल राहुल गांधी यांच्यात दिसून येतो. ते लोकांना आश्वासक वाटायला लागले आहेत. भारत जोडो यात्रेतून ज्या मूल्यांची पखरण होत आहे. तेच सर्व धर्मांनी सांगितलेलं सार आणि माणुसकीचा गाभा आहे. केंद्रीय राजवटीतील त्रस्त एकाधिकारशाहीला थोपविण्यासाठी ‘निर्भय व्हा’ म्हणून बळ देणारी ही यात्रा आता उत्तर भारतात प्रवेश करेल. दक्षिण भारतानंतर महाराष्ट्रात यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला.
शेगावमध्ये स्वयंस्फूर्तीने लाखो लोक सभेसाठी आलेत. मध्य प्रदेशात थंडीतही गर्दी आणि उत्साह आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे पाठ फिरवत आणि त्याच्या परिणामाची जराही पर्वा न करता राहुल गांधींनी २६ जानेवारीला श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवण्याचे ध्येय ठेवले आहे. श्रीनगरमध्ये यात्रेस अद्याप परवानगी मिळाली नाही. ती मिळणार नसेल तर राजकीय वादाला तोंड फुटेल. सध्या राहुल गांधी यांच्यात केशवसुत यांचा संचार दिसतो.
‘नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा...’ हेच त्यांच्या यात्रेचे सार आहे. ‘हिंमत असेल तर अडवा’ अशी घोषणा देत राहुल गांधींनी केंद्रीय राजवटीसमोर धडक आव्हान उभे केले आहे. कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी या यात्रेमागील उद्देश कॉँग्रेसच्या पक्षीय राजकारणाचा नसल्याचा खुलासा केला आहे. परंतु कॉँग्रेसला पुनरुज्जीवित करणे, हाही या यात्रेचा एक उद्देश आहे, हे लपून राहिलेले नाही.
मोदींपेक्षा राहुल गांधी परवडले म्हणून या यात्रेसोबत सामाजिक चळवळींतील दीडशे संघटना जोडल्या गेल्या आहेत. ज्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना विरोध केला तेही लोक या यात्रेत सहभागी होताहेत. कॉँग्रेसचे तक्रारवादी नेतेही राहुल गांधी यांच्यासोबत चालताना आणि सभेच्या ठिकाणी व्यासपीठावरही दिसत आहेत. ‘मी यात्रेत सहभागी होणार नाही’ असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शेगावच्या सभेत व्यासपीठावर होते. राहुल गांधींनी प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले. त्यामुळे चव्हाण यांच्यात हत्तीचे बळ संचारले आहे.
कॉँग्रेसच्या अंतर्गत कलहातही सकारात्मक बदल या यात्रेने घडवून आणला आहे. यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी प्रत्येक प्रदेश पाहत आहेत. गावागावांत जाऊन तेथील प्रश्नांची माहिती घेतात. तेथील माणसे आणि समूहात वावरतात. वेगवेगळ्या समाजघटकांतील लोक त्यांना भेटतात. ते सगळ्यांचे ऐकून घेतात. सफाई कामगार असो, शेतमजूर, कष्टकरी असो की लेखक, साहित्यिक किंवा विचारवंत असो, सगळेच राहुल गांधींसोबत दिसतात. देशाला एकाधिकारशाहीतून बाहेर काढा म्हणून नागपूरच्या ९४ वर्षांच्या सर्वोदयी नेत्या लीलाताई चितळे नागपूरहून ३०० कि.मी. लांब असलेल्या पातूर येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होतात.
विचारवंत गणेश देवी असोत किंवा ‘नर्मदा बचाओ आंदोलना’च्या नेत्या मेधा पाटकर हे सर्व जण यात्रेत सहभागी होतात. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ‘हम साथ साथ है’चा नारा देतात. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील पहिल्या दिवसापासूनच राहुल गांधीच्या वेगाने यात्रेत सहभागी झाले आहेत. मोदींच्या कारकिर्दीवर त्यांची नाराजी आहे. मला मरण आले तर या यात्रेत यावे; देशासाठी जीवन सार्थकी लागल्याच्या त्यांच्या भावना यात्रेत सहभागी तरुणांना बळ देऊन जातात.
महाराष्ट्रात कॉँग्रेस सरकारने केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यामागची सामाजिक भूमिका आणि सनातनवाद्यांकडून होणारा विरोध याबाबत राहुल गांधी प्रा. मानव यांच्याकडून तब्बल अर्धा तास ऐकून घेतात. त्यावर राहुल गांधी यांची सर्वव्यापक विषयांवरील मांडणी ही त्यांच्यातील चिंतनाची, अभ्यासाची आणि प्रगल्भतेची ओळख करून देते. हे सगळे विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते राहुल गांधींना का भेटतात? यांचा हेतू कॉँग्रेसला बळ देणे किंवा राहुल गांधींना मोठे करणे नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आलेले संकट व लोकशाहीत निर्माण झालेले भय याला आव्हान देणारे राहुल गांधीच आहेत यावर सगळ्यांचा विश्वास दिसतो. त्यामुळेच लोकशाहीचे समर्थक असलेल्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळतोय.
महिलांचे प्रतिनिधित्व लक्षवेधी
यात्रेत होणाऱ्या गर्दीचे विविध स्तरावर विभाजन करावे लागेल. राहुल गांधींना बघणारा आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेणारा एक वर्ग आहे. रोहित वेमुलाची आई राहुलला आपल्या मुलाप्रमाणे छातीशी धरते आणि या वेळी अनेकांचे डोळे अश्रूंना वाट मोकळी करून देतात. असे शेकडो भावपूर्ण प्रसंग या यात्रेने अनुभवले आहेत. माणसं जोडण्याचे काम या यात्रेने केले आहे. क्रीडापटू, रुपेरी पडद्यावरील कलाकार या यात्रेत सहभागी होत आहेत. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचे लोंढे भारत जोडोत आहेत.
अशीच तरुणांची गर्दी मोदींच्या सोबत असते. म्हणजे तरुणांचे विभाजन होत आहे का? असे होत असेल तर मोदींच्या लोकप्रियतेची घसरण असल्याचे संकेत म्हणावे लागेल. गेल्या अडीच महिन्यांतील या यात्रेवरून नजर टाका. एक लक्षात येईल. यात्रेत महिलांचे प्रतिनिधित्व लक्षवेधी आहे. विविध चळवळीतील आणि राजकीय क्षेत्रातील तरुणी राहुल गांधींसोबत सहभागी होत आहेत. मनमोकळेपणे संवाद साधताना दिसतात. प्रत्येक हाताला काम मिळावे, महागाईपासून बचाव व्हावा याबाबत तरुण रोखठोक मते व्यक्त करतात.
यात्रेतील प्रत्येकासच वाटते राहुल गांधी आपल्यासोबत आहेत. या वाटण्यावर राहुल गांधी किती खरे उतरतात, ते येणारा काळच सांगेल. परंतु भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांचे एकत्र येणे यामागे ‘ किमान समान कार्यक्रम’ आहे तो मोदींविरोधाचा. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रामधारी सिंह ‘दिनकर’ यांनी संस्कृतीचे चार अध्याय लिहिले आहेत. राहुल गांधी यांची ही यात्रा देशाच्या संस्कृतीचा पाचवा अध्याय असू शकतो. ही यात्रा म्हणजे एकीकडे भारतातील विविधता, समृद्धी, संस्कृती आणि दुसरीकडे अक्राळविक्राळ समस्या नि प्रश्न या सगळ्याचे प्रतिबिंब आहे. यातून एक जाणवते ते म्हणजे ‘गांधी’ होणे खरेच सोपे नाही!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.