एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ठरेल प्रभावी

भविष्यात अनुदान कमी होऊन रासायनिक खते महागण्याची जी सुरुवात झाली आहे, ती प्रचंड वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन स्वीकारणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
integrated nutrient management
integrated nutrient management

आपल्या देशातील रासायनिक खतांचे उत्पादन मागणीपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे स्फुरद, पालाशसह इतर रासायनिक खते परदेशातून मोठया प्रमाणात आयात करावी लागतात. त्यांच्या किमती थेट शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे शासनाला त्यावर अनुदान द्यावे लागते. हा अनुदानाचा भारसुद्धा प्रचंड वाढत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यात अनुदान कमी होऊन रासायनिक खते महागण्याची जी सुरुवात झाली आहे, ती प्रचंड वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन स्वीकारणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

रासायनिक खतांचा वापर या गोष्टीचा विचार केला असता, फर्टीलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FAI) माहिती नुसार २००१ ते २००२ मध्ये रासायनिक खतांचा वापर १७ हजार ३५९.७ लाख मेट्रिक टन एवढा होता. २०१९-२० मध्ये २८ हजार ९६९ लाख मेट्रिक टन एवढा झाला. त्याचबरोबर सरकारने नुकताच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून, असे दिसते की, २०१५-१६ आणि २०२०-२१ च्या दरम्यान रासायनिक खतांच्या वापरामध्ये जवळ जवळ १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये युरिया हे सर्वात जास्त वापरली जाणारे रासायनिक खत आहे. त्या पाठोपाठ डी.ए.पी आणि एम.ओ.पी खते आहेत. आकडेवारीवरून असे लक्षात येते की, आपण कुठेतरी थांबायला हवे आणि रासायनिक खतांचा वापर म्हणजेच जास्त उत्पादन, असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे, तो काढायला हवा. रासायनिक खतांचा कोणत्याही शास्त्राचा आधार न घेता जास्त प्रमाणात वापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर विपरीत परिणाम सुद्धा दिसून येत आहे. त्यासाठी वाढणाऱ्या खतांच्या खर्चाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एकमेव सर्वोत्तम पर्याय आहे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन   भारतात पीक पद्धती आणि खत वापराविषयी विविध विचारप्रवाह आहेत. देशात वाढत्या लोकसंख्येला पुरून उरण्यासाठी जास्तीत जास्त धान्य उत्पादनाची आवश्यकता आहे. यासाठी रासायनिक खतांचा वापर अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले जाते. तर दुसरीकडे महागड्या खतांना पूर्ण पर्याय म्हणून नैसर्गिक समजली जाणारी सेंद्रिय शेती पुरस्कृत केली जाते. संकरित आणि सुधारित पिकांच्या वाणांबरोबरच रासायनिक खताच्या वापराने देशात पिकाच्या उत्पादनात उच्चांक गाठले आहेत. वाढत्या उत्पादनात रासायनिक खतांचा सहभाग ५० टक्क्यांपर्यंत गेला आहे. रासायनिक खतांची शिफारस केलेली मात्रा पिकास पोषक ठरते. शिफारशीपेक्षा अधिक किंवा कमी खतांची मात्रा जमिनीत किंवा पिकात असमतोल निर्माण करते. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर आणि उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. जमिनीमध्ये खत घातल्यानंतर रासायनिक प्रक्रिया घडतात आणि त्याद्वारे उपलब्ध अवस्थेतील अन्नद्रव्ये बऱ्याच वेळेस उपलब्ध नसलेल्या अवस्थेत जातात, तर नत्र खताचा वाफेद्वारे आणि निचऱ्याद्वारे ऱ्हास होतो. काही परिस्थितीत अन्नद्रव्याचा कमी-अधिक प्रमाणात त्रास होतो आणि पिकाला लागू होण्याची कार्यक्षमता घटते.

सेंद्रिय पदार्थ ही नैसर्गिक स्वरूपाचे असून त्यात नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण अतिशय कमी असते. परंतु कमी-अधिक प्रमाणात विविध अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरूपात अस्तित्वात असतात. ही अन्नद्रव्ये पिकाला ताबडतोब लागू पडत नाहीत. परंतु जैविक विघटनानंतर उपलब्ध होतात. सेंद्रिय खते जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक स्थिती सुधारण्यास मदत करतात. मात्र सेंद्रिय खतांच्या देखील अनेक मर्यादा आहेत. कमी प्रमाणात अन्नद्रव्य असल्यामुळे पिकांना लागणारी पूर्ण मात्रा सेंद्रीय खताद्वारे पुरवली जाऊ शकत नाही. म्हणून रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे चांगले परिणाम आणि मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही घटकांच्या समन्वयातून आणि परीक्षण निरीक्षणातून योग्य अन्नद्रव्य पुरवठा पद्धत विकसित करता येणे शक्य आहे. एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा पद्धत ही पिकांना योग्य अन्नद्रव्ये पुरवून चांगल्या शेती पद्धतीचा सुवर्णमध्य ठरत आहे.

एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा म्हणजे काय?

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या स्रोतापासून अन्नद्रव्ये उपलब्ध होतात (उदा. रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीचे पीक पद्धत व द्विदल पिकांचा अंतर्भाव इत्यादी) यांचा अवलंब करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून व जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनात वाढ करणे होय. सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा एकत्रित वापर सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण आणि योग्य पीक पद्धतीचा अवलंब करून पिकास अन्नद्रव्य पुरवण्याच्या पद्धतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात.

एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खताच्या वापराबरोबरच सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, जिवाणू खते, वनस्पतीची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा व काडीकचरा इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून मिळणाऱ्या खतांचा समतोल साधला जातो. या पद्धतीत द्विदल धान्य पिकाचा फेरपालटित तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपीकता टिकवण्याचा प्रयत्न केला जातो.

जमिनीतील अन्नद्रव्यांचा मुख्य स्रोत हा जमीन ज्या खडकापासून बनलेली आहे, त्यामधील अन्नद्रव्य तसेच सेंद्रिय खते, रासायनिक खते आणि जैविक खते ही होत. यापैकी आपण कोणत्याही एकाच स्रोतांचा वापर केला, तर तो पिकास अन्नद्रव्ये पुरवण्यास पुरेसा होणार नाही. यापैकी रासायनिक खताचा वापर केल्यास कदाचित तो पुरेसा होईल. परंतु संतुलित असेलच असे नाही. अपेक्षित उत्पादन ही मिळेल. परंतु मालाची प्रत मिळेलच असे नाही. आज देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रामुख्याने मालाच्या प्रतिकडे पाहिले जाते. उत्पादनाची प्रत केवळ कोणताही एक अन्नद्रव्य पुरवणारा स्रोत वापरून मिळणार नाही, यासाठी पिकाच्या जोमदार वाढीसाठी लागणारी अत्यावश्यक अन्नद्रव्य पुरवणाऱ्या सर्व स्रोतांचा एकत्रित वापर करून घ्यावा लागेल. एकत्रित वापरातून पिकास संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पनाही जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकाची उत्पादकता कायम स्वरूपी टिकवणे ही आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवून ती शाश्वत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याकरिता आपणाकडे उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्यांचे नियोजन विविध स्त्रोतातून करणे अतिशय महत्त्वाचे आहे. 

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज का?

१. सध्याचे देशातील खतांचे उत्पादन गरजेपेक्षा फारच कमी आहे. तसेच स्फुरद, पालाशसारखी रासायनिक खते परदेशातून आयात करावी लागतात. पर्यायाने त्यावर सरकारला अनुदान द्यावे लागते. हा अनुदानाचा भार ही प्रचंड वाढत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यात अनुदान कमी होऊन रासायनिक खते महागण्याची शक्यता वाढत जाणार आहे. त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी करून त्या खतांची कार्य करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. २. जमिनीची सुपीकता आणि पिकाची उत्पादकता व रासायनिक सेंद्रिय व जैविक खतांचे एकत्री वापरणेच वाढवून ती टिकवता येईल. ३. हरितक्रांती मध्ये पीक उत्पादकता वाढविताना जमिनीच्या सुपीकतेकडे विशेष लक्ष दिले गेले नाही, ते आता देणे अत्यंत गरजेचे आहे. ४. संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी. ५. जमिनीच्या जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मात सुधारणा करण्यासाठी. ६. जमिनीतील व पिकांमधील जैवरासायनिक प्रक्रिया यांचा समतोल राखण्यासाठी. ७. अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करण्यासाठी. ८. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी. ९. जमिनीतील सर्व पीक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी. १०. एकंदरीत जमिनीची जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक कोणते?

१. कंपोस्ट व गांडूळ खत प्रक्रियेद्वारे वनस्पतीचा पालापाचोळा व टाकाऊ पदार्थांचा अन्नद्रव्यासाठी पुनरुपयोग करणे. २. नत्र स्फुरद व पालाश उपलब्धता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर करणे उदा. नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद, जस्त, गंधक विरघळविणारे जीवाणू, पालाश ची हालचाल करणारे जीवाणू इ. ३. पिकाला पिकाच्या वाढीनुसार व गरजेनुसार संतुलित रासायनिक खतमात्रा पुरवणे. ४. शहरातील सांडपाणी व कंपनीतील टाकाऊ पदार्थांचा द्वारे सेंद्रिय खते तयार करून शेतीसाठी उपयोग करणे. ५. हिरवळीची खते निळे-हिरवे शेवाळ आणि अझोलाचा पिकासाठी उपयोग करणे. ६. पीक फेरपालट व अंतर पिकांमध्ये द्विदल वनस्पतीचा समावेश करणे. ७. माती, पाणी व पण देठ परीक्षणानुसार शिफारशीत खत मात्रा देणे. ८. शेतातील टाकाऊ काडी कचऱ्यापासून कंपोस्ट करून त्याचा वापर करणे. ९. पीक अवशेषांचा उदा. उसाचे पाचट, गव्हाची काडं, सोयाबीन तूस  इ. शेतीमध्ये वापर करणे. १०. साखर कारखान्यातील टाकाऊ पदार्थ प्रेसमड केक इत्यादींचा खत म्हणून वापर करणे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे फायदे? १. पिकांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो. २. संतुलित खतांमुळे पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक उत्पादनात वाढ होते. ३. सेंद्रिय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते. ४. पीक पद्धतीत पहिल्या पिकास वापरलेल्या सेंद्रिय खताचा वापर पुढील पिकास ही उपयुक्त ठरतो. ५. जमिनीच्या भौतिक गुणधर्मात उदा. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे, पाणी मुरविणे, जमीन भुसभुशीत ठेवणे इत्यादीमध्ये सुधारणा होऊन जमिनीस फुल येण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होते. ६. रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते, परिणामी त्यांचा वापर कमी होतो परिणामी जमिनीची सुपीकता वाढवता येते. ७. अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते तसेच स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविता येते तर नत्राची उपलब्धता आवश्‍यक तेवढी ठेवता येते. ८. जमिनीची जलधारणाशक्ती जैवरासायनिक प्रक्रिया यांचा समतोल राखता येतो. ९. उपयुक्त जिवाणूंची संख्या मध्ये वाढ करता येते. १०. जमिनीतील कर्ब:नत्र गुणोत्तर समतोल प्रमाणात राखायला मदत होते. ११. योग्य पीक फेरपालटीचा व आंतरपीक पद्धतीचा पुढील पिकास अन्नद्रव्याची उपलब्धता विशेषतः नत्राची उपलब्धता वाढविण्यास मदत होते. १२. पीक अवशेषांचा जमिनीत प्रथम अच्छादन आणि नंतर सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास जल व मृद संधारण तसेच अन्नद्रव्य संधारणही करता येते. १३. एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्याने म्हणजे सेंद्रिय स्वरूपातून पुरवणाऱ्या अन्नद्रव्यांचा सहभाग ३० ते ३५ टक्के, जैविक स्वरूपातील २० ते २५ टक्के आणि रासायनिक स्वरूपातील ४० ते ५० टक्के वापर केल्यास रासायनिक खतांचा वापर कमी होऊन वाढत्या रासायनिक खतांच्या किमतींमुळे वाढणाऱ्या खर्चामध्ये बचत होईल व जमिनीची सुपीकता टिकवण्यास किंवा वाढवण्यास मदत होईल.

- डॉ. ओमप्रकाश हिरे ७५८८०१५४९१ (लेखक एक खाजगी कंपनीत मृदा शास्रज्ञ आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com