पटकथेचा ॲण्टी-क्लायमॅक्स

खरे तर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे अडीच वर्षांसाठी केलेली मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य झाली असती, तर शिंदे तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

शिवसेनेच्या इतिहासातील आजवरच्या या सर्वांत मोठ्या उठावाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हाती महाराष्ट्राची धुरा सोपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा निर्णय हा जितका धक्कादायक आहे, तितकाच तो भाजपच्या रणनीतीचे दर्शनही घडवणारा आहे. ही रणनीती अर्थातच उद्धव यांचे शिवसेनेचे नेतृत्व खालसा करण्याची जशी आहे, त्याचबरोबर या एका मोठ्या प्रादेशिक पक्षाच्या संघटनेवर कब्जा मिळवण्याचीही आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपला २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी या पक्षाचे सारे केडर आपल्या वर्चस्वाखाली काम करायला हवे आहे. राज्यसभा तसेच विधान परिषद निवडणुकीच्या फार आधीपासूनच भाजपच्या चाणक्यांनी रचलेल्या पटकथेचा हा ‘ॲण्टी-क्लायमॅक्स’ आहे. खरे तर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे अडीच वर्षांसाठी केलेली मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य झाली असती, तर शिंदे तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते. तेव्हा भाजप नेत्यांचा अहंकार आडवा आला आणि हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. आता अडीच वर्षांनंतर मात्र नेमके तेच करण्याचा निर्णय मोठ्या धूर्तपणे भाजपने घेतला आहे. त्यामागील एकमेव हेतू हा उद्धव ठाकरे यांना पुरते नामोहरम करणे, यापलीकडे दुसरा कोणताही असू शकत नाही. (Climax In Maharashtra Politics)

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद जाणार, याचे सूतोवाच खरे तर या बंडाच्या पहिल्याच दिवशी झाले होते आणि त्याची जाणीव खुद्द उद्धव ठाकरे यांना झाल्याचे, त्यांच्या पहिल्याच जनसंबोधनातून स्पष्ट झाले होते. त्याच दिवशी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून आपले बिऱ्हाड ‘मातोश्री’वर हलवतानाच, आपण राजीनामा तयार ठेवल्याचे सांगून टाकले होते. बंडाच्या या काळात त्यांनी दोन वेळा जनतेशी केलेला संवाद हा भावनेला हात घालणारा जसा होता, त्याचबरोबर आपल्याच माणसांनी केलेल्या विश्‍वासघातामुळे ते कसे घायाळ झाले आहेत, त्याचेही दर्शन घडवणारा होता. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी ही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत खूपच चांगली होती, हे त्यांचे विरोधकही मनात तरी मान्य करत असतील. सत्ता हाती घेतल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत कोरोनासारखे महाकाय संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले. त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी ते आणि त्यांचे सरकार यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना जागतिक आरोग्य संघनेनेच (डब्ल्यूएचओ) शाबासकी दिली आहे. त्यानंतर त्यांनी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला. खरे तर या महाविकास आघाडीत कमालीचा अंतर्विरोध होता आणि त्याच वेळी हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागल्याने भाजप नेते चौफेर हल्ले चढवत होते. या पार्श्‍वभूमीवर उद्धव हे कारभाराचे गाडे हाकताना दाखवत असलेला शांतपणा तसेच संयम हा वाखाणण्याजोगा होता.

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या असो की आर्यन शाहरूख खान याचे अमली पदार्थ प्रकरण असो; तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेना आणि विशेषतः ‘मातोश्री’ला घेरण्याचे भाजपचे डावपेच सुरूच होते. मात्र सरकारच्या स्थैर्याला त्यामुळे जराही धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जात होतीच. तरीही मग या आमदारांना बंड करावेसे वाटले, त्यामागे आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता कारणीभूत होती.

सरकार महाविकास आघाडीचे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः जयंत पाटील पक्षविस्ताराचे काम जोमाने करत होते आणि त्यामुळेच या आमदारांच्या मनात आपल्या भवितव्याबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले. उद्धव ठाकरे त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. त्यामुळेच या उठावामागे हेच खरे मुख्य कारण असल्याचे दिसत आहे. अर्थात, २०१४ ते १९ या काळात भाजप-सेना युतीचे सरकार असतानाही भाजप तसेच वागत होता. त्याची साक्ष २०१९मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनेक उमेदवारांविरोधात भाजपने उभे केलेले डमी उमेदवार साक्ष आहेत. आताही एकनाथ शिंदे यांना पुढे करून राज्यातील ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जास्तीत जास्त खच्चीकरण कसे करता येईल, हे पाहण्याची रणनीती भाजपने आखलेली दिसते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com