Book Review
Book ReviewAgrowon

वो सुबह कभी तो आएगी...

जगाचा इतिहास शोषणाचा आहे. बळवंतांनी कमजोरांचं केलेलं शोषण आणि त्याआधारे केलेली संपत्तीची निर्मिती आजवर कोणी रोखू शकलेलं नाही. वेगवेगळ्या शाही आल्या, इझम आले. सुरुवातीला त्यांविषयी लोकांच्या मनात भाबडा आशावादही अंकुरला. पण यथावकाश सगळ्या नव्या व्यवस्थांमध्ये शोषक आणि शोषणकर्ते तयार झालेच, अगदी लोकशाहीतही!

मला भावलेलं पुस्तक

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे,
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे.
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे,
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे!
- कविवर्य नारायण सुर्व

आपल्याला अमेरिकेचं मोठं आकर्षण असतं. कला, साहित्य, संगीताबरोबरच निसर्गाचा वरदहस्त असलेल्या रशियाबाबत मात्र आपण थोडं बिचकूनच असतो. हुकूमशाहीकडं झुकलेली तिथली साम्यवादी राजवट आणि ‘पेरेस्त्रोईका’सारख्या सुधारणांनंतरही कायम असलेला पोलादी पडदा आपल्या आक्रसण्यामागचं एक कारण. अशानं जगातील एका समृद्ध वारशाकडं, संस्कृतीकडं दुर्लक्ष होतंय, हे मात्र आपल्या ध्यानात येत नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना भाषांतरीत रशियन साहित्यानं मला भुरळ घातली होती. कोल्हापुरातील बिंदू चौकातील लोकवाङ्‍मयगृहातून परवडत नसतानाही काही पुस्तकं खरेदी केल्याचं आजही आठवतं. अर्थात, ल्येव तोलस्तोय, फ्योदोर दोस्तोयेवस्की आदी दिग्गजांचं साहित्य तेव्हा हाताला लागलं नव्हतं. अन्तोन चेकॉव्हचे काही भाषांतरीत कथासंग्रह, शिवाय अन्य रशियन लेखकांची ‘दोन कादंबरीका’ आणि ‘शांत इथे पहाटवेळा’ ही सुरेख पुस्तकं वाचल्याचं आणि त्यांनी माझ्यावर गारूड केल्याचं आजही स्मरतं. या पुस्तकांतून डोकावणारा रशियातील निसर्ग, तिथली मैलोन् मैल पसरलेली गवताळ कुरणं, तिथलं लोकजीवन आजही कधीमधी आठवात साद घालीत राहतं. ही पुस्तकं आज कुठं उपलब्ध आहेत की नाहीत कोणास ठाऊक!

कार्ल मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’चे खंडही तेव्हा चाळून पाहिले होते, ते खरिदण्याची ऐपत मात्र नव्हती. रशियामध्ये सन १९१७ मध्ये झालेल्या क्रांतीचा वृत्तांत कथन करणारं अमेरिकी पत्रकार जॉन रीड यांचं ‘जगाला हादरवून सोडणारे ते दहा दिवस’ हे पुस्तक माझ्या संग्रही होतं, अर्थात त्यातले तितकेसे तपशील आता आठवत नाहीत. विशेष म्हणजे तत्कालीन रशियन सरकारचं आर्थिक पाठबळ असल्यामुळं म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळं म्हणा या पुस्तकांची निर्मितिमूल्यं अत्युत्तम असायची. किंमत मात्र एकदम किफायतशीर. त्यामुळं खरेदीचा मोह टाळता यायचा नाही.

याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय. तिथं बऱ्याचदा कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं दर्शन व्हायचं. त्यांच्याशी संवाद करण्याइतपत धाडस तेव्हा नव्हतं. पुढं पत्रकारितेत आल्यावर त्यांच्या अनेक मोर्चांचं भर उन्हात फिरत वार्तांकन केलं, तेव्हा थोडी अण्णांशी जवळिक साधता आली. पक्षावरची आणि मूल्यांवरची निष्ठा म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अण्णा. शेतकरी आणि कामगार यांच्यासारख्या फाटक्या माणसांचं नेतृत्व करीत त्यांना न्याय मिळवून देताना त्यांना काय मिळत असेल, हा प्रश्‍न तेव्हाही पडायचा आणि आताही पडतो. या निर्मळ माणसाची काही भ्याड लोकांनी गोळ्या घालून का म्हणून हत्या केली असेल, हा सवाल आजही जीव जाळत राहतो. कम्युनिस्टांना ‘पोथीनिष्ठ’ म्हणून कितीही नावं ठेवली तरी त्यांची पक्षावरची आणि कामावरची अविचल निष्ठा वाखाणण्यासारखीच.

विशेषतः आज आपल्या भवतालात राजकारणाच्या नावावर जे काही हिडीस, ओंगळ प्रयोग सुरू आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर तर कम्युनिस्टांचं वेगळेपण उठून दिसतंच दिसतं. आजही हे लोक समोर कोणताही तत्कालिक लाभ दिसत नसताना सर्वहारा समाजासाठी संघर्ष करताना दिसतात. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असं सांगणाऱ्या कार्ल मार्क्सचे पाईकच जणू!

याच काळात मॅक्झिम गॉर्की यांची रशियातील क्रांतीच्या पार्श्‍वभूमीवरील ‘आई’ ही कादंबरी वाचली आणि मन हेलावून गेलं. त्या वयात आकलनाच्या मर्यादा होत्या, पण समाजवादाकडं मन झुकत होतं. ‘आई’मुळं कष्टकरी वर्गाविषयीची आस्था अधिक बळकट होत गेली. साम्यवादाचं उगमस्थान असलेल्या रशियात कामगार चळवळीनं क्रांती केली. कामगारांनी शोषणाविरुद्ध केलेल्या बलशाली उठावामुळंच या खंडप्राय देशाची सन २०१७ मध्ये झारशाहीच्या कचाट्यातून मुक्तता झाली. त्याआधी १९०५ मध्ये झालेल्या, पण फसलेल्या क्रांतीत एका मातेनं आपल्या मुलाच्या पावलावर पाऊल टाकत जुलमी राजवटीविरुद्ध केलेल्या संघर्षाचं उत्तम चित्रण गॉर्की यांनी ‘आई’मध्ये केलं आहे. भाषा साधी, पण प्रभावी आहे. त्यामुळं जागतिक वाङ्‍मयात गॉर्की यांच्या या वास्तवाधारित कलाकृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आई या विषयावर जागतिक वाङ्‍मयात लिखाणाची कमतरता नाही. मराठीतही अस्सल साहित्य निर्मिती झाली आहे. कवी यशवंत यांच्या ‘आई’वरील कवितेच्या किमान काही पंक्ती कानावरून गेल्या नाहीत असा मराठी माणूस सापडणं विरळाच. त्यांनी त्रिवार सत्य सांगितलंय...‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी!’ प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे म्हणतात... ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही!’

गिरण्यांमध्ये कष्टणाऱ्या आया फक्त रशियातच होत्या असं काही नाही. भारतातही हजारो महिला कारखान्यांत घाम गाळीत होत्या व आजही त्या श्रमत आहेत. नारायण सुर्वे यांनीच गिरणीत काम करणाऱ्या आईच्या अपघाती मृत्यूवर केलेली कविता आपल्याला भावविभोर करते. ‘माझी आई’ या कवितेत सुर्वे म्हणतात...

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू

आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर

समाजासाठी संघर्ष करणं म्हणजे ‘लष्कराच्या भाकरी भाजणं’ असं मानण्याचा आजचा काळ. अर्थात, राजकारण्यांचं समाजकारण वेगळं, त्याला स्वार्थाची जोड असतेच. फक्त ती दिसत नाही किंवा दाखवली जात नाही इतकंच! काही तरुणांमध्ये समाजकारणाची ऊर्मी जरूर असते, पण तिची धग दीर्घकाळ टिकत नाही. यथावकाश सारे संसारी होऊन जातात. एकविसाव्या शतकाच्या आरंभानंतर आणि विशेषतः आर्थिक उदारीकरणानंतर अप्पलपोट्यांची निपज वाढल्यानं समाजकारण करणं, चळवळीत आयुष्य घालवणं वेडेपणाचं लक्षण ठरलं. त्यामुळंच देशभरातील कामगार चळवळी आता विझल्यासारख्या वाटताहेत. कामगारांचे, श्रमिकांचे प्रश्‍न मात्र सुटलेले नाहीत, उलट भांडवलशाहीचा काच अधिक जाचक बनतो आहे. समाजात विघटन वाढल्यानं संघटन लयाला चाललं आहे. त्याचा ना कोणाला खेद, ना खंत!

‘आई’ समजून घेण्याआधी मॅक्झिम गॉर्कीचा आयुष्यपट उलगडून पाहायला हवा. त्याचा जन्म २८ मार्च १८६८ रोजी रशियातील निझ्निनॉव्हगोरॉड येथे झाला. मूळ नाव अल्यिक्स्येई मक्स्यीमव्ह्यिच प्येश्कॉव्ह. लहानपणीच आईवडील वारल्यामुळं वयाच्या आठव्या वर्षापासून पोट भरण्यासाठी त्याला धडपड करावी लागली. मिळतील ती कष्टाची कामं करीत तो रशियाभर हिंडला. या काळात श्रमिकांचं दुःख, त्यांचं शोषण त्यानं जवळून अनुभवलं. नोकरीत मारपीट आणि मानहानीही सोसली. पूर्ववयातील अशा कडवट अनुभवांमुळंच त्यानं गॉर्की (कटू किंवा दुःखी) हे टोपणनाव धारण केलं. त्याचं शालेय शिक्षण थोडकंच झालं. वाचन मात्र अफाट होतं. किंबहुना, वाचन हेच त्याचं विद्यापीठ होतं. क्रांतीच्या कार्याला त्यानं स्वतःला वाहून घेतलं.

स्वाभाविकपणेच त्याला वेळोवेळी पोलिसांच्या दडपशाहीला तोंड द्यावं लागलं. रशियातील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचं सदस्यत्व त्यानं स्वीकारलं. सन १९०५ मध्ये रशियात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्याला इटलीत काप्रीला राहावं लागलं. या अपयशामुळं तरुणांमध्ये आलेल्या नैराश्यावर फुंकर घालण्यासाठी त्यानं ‘आई’ ही स्फूर्तिदायी कादंबरी लिहायला घेतली. ‘समाजवादी वास्तववाद’ (Socialist Realism) या साहित्य प्रकाराची मुहूर्तमेढच त्यानं या कादंबरीच्या माध्यमातून रोवली. त्यासाठी त्याला साहित्यविश्‍वात ओळखलं जातं. पुढं ‘समाजवादी वास्तववाद’ हे सोव्हिएत साहित्यिकांचं वाङ्‌मयीन तत्त्वज्ञान होऊन बसलं.

ही कथा आहे रशियातील एका मातेची, तिच्या क्रांतिकारी तरुण मुलाची आणि त्याच्या सवंगड्यांची. चळवळीतील मुलाच्या सहभागामुळं सुरुवातीला चिंतित असणारी ही माता नंतर मुलाच्या पावलावर पाऊल टाकीत, सरकारी जुलूम सहन करीत क्रांतिकार्यात कशी सहभागी होते, याचं चित्रण या पुस्तकात येतं. क्रांतिकार्यावरील निष्ठा, तरुण क्रांतिकारकांचा मिळालेला सहवास आणि मान यांमुळे एका भित्र्या, दडपलेल्या स्त्रीचे कोमल, ममताळू आणि निर्भय स्त्रीत कसे रूपांतर होते, हे गॉर्की यांनी प्रत्यकारी लिखाणाद्वारे दाखवून दिलं आहे. त्यामुळंच ही कादंबरी रशियन क्रांतिकारकांसाठी ‘बायबल’ न ठरती तरच नवल! मराठीत प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांनी अनुवादित केलेली ही कादंबरी लोकवाङ्‍मयगृहाने ‘आई’ या नावानं प्रकाशित केली आहे. तिची सन २०१९ मधील तेविसावी आवृत्ती सध्या बाजारात आहे, त्यावरून मराठीतही तिला मोठा वाचकवर्ग लाभल्याचं दिसतं. या कादंबरीवर १९२६ मध्ये मूकपट आला. नंतर या कथानकावर आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. प्रख्यात जर्मन साहित्यिक बर्टोल्ट ब्रेख्त यानं या कादंबरीचं नाट्यरूपांतर केलं. ‘आई’ची कीर्ती दशदिशांमध्ये दुमदुमली. काही टीकाकारांनी प्रचारकी साहित्य म्हणून या कादंबरीची हेटाळणीही केली. अर्थात, त्यामुळं तिच्या लौकिकाला काही बाधा पोहोचली नाही.

या कादंबरीत गॉर्कीनं एका कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रीचं, निलोवनाचं, जीवन चित्रित केलं आहे. ती कठोर शारीरिक श्रम करीत असतानाच गरिबी आणि उपासमारीचा सामना करते. दारुड्या नवऱ्याकडून दररोज होणारी मारहाण सोसत राहते. त्याच्या अनपेक्षित मृत्यूनंतर मुलगा पॉवेल हेच तिचं एकमेव आशास्थान असतो. पण तोही कारखान्यात काम करता करता दारुडा बनतो. यथावकाश त्याच्यात परिवर्तन होतं. तो पुस्तकं वाचायला लागतो. शोषणाविरुद्ध मनात पेटलेली क्रांतीची ज्योत त्याला अस्वस्थ करीत असते. समवयस्क, समविचारी तरुणांचा गट बनवून पोलिस कारवाईचा धोका पत्करत तो क्रांतिकार्य सुरू करतो. मोर्चे काढतो. सुरुवातीला त्याच्या या नव्या अवतारामुळं बावचळलेली आई हळूहळू त्याच्या कार्यात भाग घेऊन प्रसिद्धिपत्रकं वाटणं, लोकांपुढं धिटाईनं भाषणं करणं यात तरबेज होते. पॉवेलची मैत्रिण साशासह त्याचे सारे मित्र निलोवनाला आपलीच आई मानत असतात. त्या साऱ्यांमध्ये एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं असतं. शेवटी एका मोठ्या आंदोलनात पॉवेलला त्याच्या साथीदारासह पकडलं जातं. शिक्षा भोगण्यासाठी त्याला सायबेरियाला पाठवलं जाणार असतं. आईही आंदोलन करताना, पत्रकांसह पोलिसांना सापडते. पण ती हटत नाही. घोषणा देत राहते. गॉर्कीनं सन १९०५ मधील फसलेल्या क्रांतीमधील खऱ्या व्यक्तींवर ही सारी पात्रं बेतली आहेत. त्यानं स्वतःच ही माहिती नंतर दिली होती.

जगाचा इतिहास शोषणाचा आहे. बळवंतांनी कमजोरांचं केलेलं शोषण आणि त्याआधारे केलेली संपत्तीची निर्मिती आजवर कोणी रोखू शकलेलं नाही. वेगवेगळ्या शाही आल्या, इझम आले. सुरुवातीला त्यांविषयी लोकांच्या मनात भाबडा आशावादही अंकुरला. पण यथावकाश सगळ्या नव्या व्यवस्थांमध्ये शोषक आणि शोषणकर्ते तयार झालेच, अगदी लोकशाहीतही! त्यांचा दाखवायचा मुखवटा मात्र ‘कल्याणकारी राज्यव्यवस्था’ असाच राहिला, आजही त्यात काही अंतराय नाही. रशिया, चीनमधील साम्यवादानं सरळसरळ एकाधिकारशाहीचं वळण घेतलं. लोकशाहीची शाईही काही वेगळी अक्षर रेखाटताना दिसत नाही. हे सारं बदलायचं तर अथकपणे लढत राहणं एवढंच सामान्य माणसाच्या हातात राहतं. प्रख्यात शायर साहिर लुधियानवी यांचं ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटातील हे सुरेख गीत खूपच बोलकं आहे...

इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा
जब दुख के बादल पिघलेंगे जब सुख का सागर झलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगा जब धरती नगमे गाएगी
वो सुबह कभी तो आएगी

माना कि अभी तेरे मेरे अरमानों की क़ीमत कुछ भी नहीं
मिट्टी का भी है कुछ मोल मगर इन्सानों की क़ीमत कुछ भी नहीं
इन्सानों की इज्जत जब झूठे सिक्कों में न तोली जाएगी
वो सुबह कभी तो आएगी

खरंच, सगळ्या कपट कारस्थान्यांचा निःपत होऊन मानवजातीच्या आयुष्यात ती निर्मळ सकाळ कधी तरी उगवेल काय?

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com