Orange
Orange Agrowon

Orange Rate : संत्र्याचा गोडवा जगभर पोहोचवा

आपल्या दुखऱ्या नसेवर बांगलादेश वारंवार बोट ठेवत असताना त्यापासून आपण काहीही धडा घेताना दिसत नाही.

मागील तीन वर्षांत बांगलादेशने संत्रा आयातशुल्कात (Orange Import Duty) प्रतिकिलो तब्बल ४३ रुपये वाढ केली आहे. २०१९ मध्ये प्रतिकिलो २० रुपये असलेले आयातशुल्क आता ६३ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे राज्यातील संत्रा उत्पादकांना (Orange Producer) २० रुपये प्रतिकिलो दर मिळाला तर बांगलादेशमध्ये त्या संत्र्याचा दर ८३ रुपये प्रतिकिलो होतो. वाढत्या आयातशुल्कामुळे बांगलादेशला होणारी संत्रा निर्यात (Orange Export) घटली आहे. बांगलादेशला संत्र्याची २५ ते ३० टक्के होणारी निर्यात पाच टक्क्यांवर आली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारातही संत्र्याचे दर पडून उत्पादक जेरीस आले आहेत.

Orange
Orange Growers : संत्रा रस्त्यावर फेकत शासनाचा निषेध

यावरून संत्रा या फळपिकाची देशांतर्गत विक्री तसेच निर्यातीत आपण किती मागे आहोत, हे स्पष्ट होते. आकर्षक नारंगी रंग, आंबट गोड चवीच्या नागपुरी संत्र्याने संपूर्ण जगाला भूरळ घातलेली आहे. असे असताना आपली संत्रा निर्यात मात्र बांगलादेश पुरतीच मर्यादित राहिली आहे.

Orange
Orange : बांगलादेशच्या धोरणामुळे संत्रा उत्पादक जेरीस

या आपल्या दुखऱ्या नसेवर बांगलादेश वारंवार बोट ठेवत असते. परंतु त्यातून आपण काहीही धडा घेताना दिसत नाही. मुळात संत्रा हे फळपीक अधिक उत्पादनाच्या अनुषंगाने संशोधन तसेच विक्री-प्रक्रिया-निर्यात अशा सर्वच पातळ्यांवर कमालीचे दुर्लक्षित राहिले आहे. संत्रा पट्ट्यातील स्थानिक नेत्यांचे हे खरे तर अपयश म्हणावे लागेल. केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी सोडले, तर संत्रा असो की विदर्भातील इतर पिके, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणीही बोलत नाही.

लिंबूवर्गीय फळपिकांचे राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र (एनआरसीसी) नागपूर येथे आहे. परंतु पुरातन काळापासून चालत आलेल्या ‘नागपुरी संत्रा’ या वाणाला सक्षम असा पर्याय आजतागायत उत्पादकांना उपलब्ध होऊ शकला नाही. या संशोधन केंद्राने एक सिडलेस संत्र्याचे वाण काढले असले, तरी त्यात तीन-चार बिया आहेत. त्यामुळे ते वाण फार काही चालले नाही. काही खासगी संस्था बाहेरून संत्र्यांचे नवीन वाण आणून त्यावर संशोधन करीत असताना एनआरसीसी नेमके काय करीत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. नागपुरी संत्र्याची चव चांगली असली, तरी साल पातळ आहे. त्यात बियांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या फळाची टिकाऊक्षमता कमी असून, प्रक्रियेसाठीसुद्धा हा वाण चांगला समजला जात नाही.

संत्र्यापासून ज्यूस, पल्प, पावडर, बर्फी असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. संत्र्याच्या चोथ्यापासून ‘कॅटल फीड’ बनविता येते. सालीपासून आयुर्वेदिक गुणधर्म असलेले तेल मिळते. परंतु ज्यूस, बर्फीचे दोन-तीन छोटे प्रकल्प सोडले तर यावर प्रक्रियाच होत नाही. पतंजली ‘मिहान’मध्ये संत्र्यावर प्रक्रियेसाठीचा मोठा प्रकल्प उभा करेल, अशा घोषणा झाल्या. तेथे प्रकल्पावर थोडेफार कामही झाले, तरी अजून हा प्रकल्प का सुरू झाला नाही, याचे उत्तर मिळत नाही.

अगोदर नांदगावपेठ अमरावती येथे होणारा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नंतर नांदेडला गेला कसा, हेही उत्पादकांना पडलेले एक कोडेच आहे. हा बंद पडलेला प्रकल्प नुकताच नाशिकच्या ‘सह्याद्री फार्म’ने घेऊन तो चालविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. संत्रा हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असून, ते प्रामुख्याने खाण्यासाठी वापरले जाते. असे असताना हे फळ जगभरातील तर सोडाच देशातील ग्राहकांपर्यंत पण पोहोचले नाही.

सद्यपरिस्थितीत संत्रा उत्पादकांना तत्काळ दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात अनुदान द्यायला हवे बांगलादेशला वठणीवर आणण्यासाठी आपण तेथून आयात करीत असलेल्या कापडासह इतर उत्पादनांवर आयातशुल्क आकारावे. संत्रा निर्यातीसाठी इतर पर्यायी देश शोधायला हवेत. आपण श्रीलंका, चीन यासह आखाती अन् युरोपीय देशांत संत्रा पाठवू शकलो तर अधिक चांगल्या दराने निर्यात वाढेल. संत्र्याचा उठाव होऊन देशांतर्गत बाजारपेठेतही उत्पादकांना चांगला दर मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com