वाढीव सेवाशुल्क पशुपालकांच्या मुळावर

अगदी अलीकडे २३ मे २०२२ रोजी पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवा शुल्क दरात वाढ करण्यात आली आहे, ही दरवाढ राज्यात २१ जून २०२२ पासून लागूही करण्यात आली आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

राज्यातील पशुसंवर्धन विभाग (Department Of Animal Husbandry) हा एप्रिल २००० पर्यंत सर्व पशुपालकांना (Dairy Farmer) काही सेवा वगळता निःशुल्क सेवा देत होता. परिणामी, पशुपालकांना मोठा आधार होता. तत्कालीन परिस्थितीनुसार पशुवैद्यकीय दवाखान्यात (Veterinary Clinic) मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. त्यानंतरच्या काळात ६ एप्रिल २००० मध्ये इतर सर्व सेवादेखील सशुल्क करण्यात आल्या. त्याप्रमाणे २४ एप्रिल २००० पासून पशुवैद्यकीय दवाखान्यातील सर्व सेवा सशुल्क करण्यात आल्या.

तथापि, त्याची अंमलबजावणी करताना खूप अडचणी आल्या तेव्हा प्रत्यक्ष क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. ३१ मे २००० च्या परिपत्रकानुसार त्याला मान्यता देण्यात आली, ज्या पशुपालकांच्या दृष्टीने फायदेशीर होत्या. उदाहरणार्थ, केस पेपर फी व्हॅलिडिटी, संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या परिसरातील फी आकारणी, कार्य मोहिमा शिबिरातील फी आकारणी आदी. त्यानंतर ४ जानेवारी २००१ मध्ये पशुधन व पशुजन्य उत्पादने निर्यात करताना ज्या विहित तपासण्या होतात त्याचे सेवाशुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, जो योग्य होता आणि आवश्यक ही आहे. त्यानंतरच्या काळात वेळोवेळी पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना झाल्याने अत्याधुनिक सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात साधनसामग्री खरेदी करण्यात आल्या.

Animal Care
शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका

सदर साधनसामग्रीचे वाढलेले दर, त्यासाठी लागणारी रसायने, औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे यांच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याचे कारण देत वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी म्हणून १२ नोव्हेंबर २००७ मध्ये, १४ सप्टेंबर २०१५ मध्ये आणि अगदी अलीकडे २३ मे २०२२ रोजी सेवा शुल्क दरात वाढ करण्यात आली आहे. ती दरवाढ राज्यात २१ जून २०२२ पासून लागू करण्यात आली आहे.

२३ मे २०२२ रोजी च्या शासन निर्णयानुसार ही दरवाढ जवळजवळ दुप्पट ते काही बाबतीत दहा पट करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत कृत्रिम रेतनासाठी सेवाशुल्क हे रुपये वीस वरून आता नवीन निर्णयानुसार रुपये पन्नास करण्यात आले आहे. त्याचबरोबर कुक्कुट पक्षी लसीकरणाचे सेवाशुल्क दहा पैशांवरून एक रुपया करण्यात आले आहे. सोनोग्राफी, एक्स-रे यामध्ये देखील दुप्पट वाढ झाली आहे. दैनंदिन उपचार शुल्क हे पूर्वी फक्त केसपेपरसाठी एक रुपया आकारण्यात येत होते. आता त्या ऐवजी दहा रुपये करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत परसातील कुक्कुटपालन, कृत्रिम रेतन, दैनंदिन उपचार या बाबींच्या नियमितपणे पशुपालकांना सेवा घ्याव्या लागतात. त्याचे उद्दिष्टदेखील संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यांना देण्यात आलेले असते. त्यामुळे या बाबींना विभागामार्फत चालना दिली जात असताना त्यामध्ये झालेली वाढ ही कुठेतरी विरोधाभास दर्शवते हे नक्की! वाढलेली महागाई, दुधाचे दर, पशुखाद्याचे वाढलेले दर, या पार्श्‍वभूमीवर कमीत कमी पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रत्यक्ष येऊन जे पशुपालक सेवा घेतात, घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तरी कमीत कमी सेवाशुल्क असावे. ज्या सेवा नियमित घेतल्या जातात त्यासाठीच्या सेवा शुल्काबाबत निश्चितच विचार होणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, कुक्कुट पक्षी लसीकरण एक रुपया करावे. त्याचबरोबर व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक जंतुनाशक पाजणे, त्याचे सेवाशुल्क पूर्वीप्रमाणे एक रुपया ठेवावा जो आता रुपये दहा करण्यात आला आहे. तसेच कार्य मोहीम शिबिरे, कृत्रिम रेतन केल्यानंतर ची गर्भधारणा तपासणीदेखील पूर्वीप्रमाणे एक रुपया केल्यास भूमिहीन, अल्प-अत्यल्प भूधारक पशुपालकांना मदत होऊ शकेल. आनुषंगिक चारा छावणी, नैसर्गिक आपत्ती या काळात देखील संबंधित पशुपालकांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com