आपल्यापुरतं सारवता येतं ?

पुढच्याच क्षणी चिंटूने रक्ताची उलटी केली आणि तो बेशुद्ध पडला. घरात पळापळ झाली. त्यांचे फॅमिली डॉक्टर देसाईंना यांना फोन झाला. ऍम्ब्युलन्स आली आणि चिंटूला तात्काळ तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं.
Can it be treated for you?
Can it be treated for you?

ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने 'कुटूर कुटूर' असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते. कातरलेल्या सुपारीची, शार्पनरने पेन्सिलीची निघते तशी नक्षीदार पापडी, कात-चुना लावलेल्या रंगीत पानावर पडत होती. 'काय झालं सुनबाई?' असं ताडकन उठत अप्पानी विचारलं. 'अहो अप्पा' s s बोलतांना त्यांना धाप लागत होती. 'बघा ना चिंटूला काहीतरी होतंय, तो कससंच करतोय' हातातला अडकित्ता फेकत आप्पांनी घरात धाव घेतली. अप्पांचा सात वर्षांचा नातू चिंटू’ बेडरुममधे दोन्ही हात पोटाशी आवळून कळवळत पडला होता. 'काय होतंय चिंटू बाळ?' आप्पांनी घाबरून विचारलं. त्या असह्य वेदनेमुळे त्याच्या तोंडातून शब्द निघू शकले नाही, पण त्याने पोटाकडे केलेल्या इशाऱ्याने पोटात भयंकर दुखतंय हे कळलं. पुढच्याच क्षणी चिंटूने रक्ताची उलटी केली आणि तो बेशुद्ध पडला. घरात पळापळ झाली. त्यांचे फॅमिली डॉक्टर देसाईंना यांना फोन झाला. ऍम्ब्युलन्स आली आणि चिंटूला तात्काळ तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं. डॉक्टरांच्या तपासणीच्या खोलीबाहेर भीषण शांततेत अप्पा आणि त्यांचे कुटुंबीय वाट पाहत होते. थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले. सर्वांनी चिंतायुक्त चेहऱ्याने डॉक्टरांभोवती गर्दी करत कसा आहे चिंटू? काय झालंय त्याला?' अशी चिंतायुक्त विचारणा केली. 'अप्पा, चिंटूच्या पोटात गाठी दिसताहेत. आम्ही त्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवतो आहोत. उद्यापर्यंत निकाल येईल, मग ठरवू काय करायचं ते' असं म्हणत डॉक्टर लगबगीने क्लिनिक मध्ये निघून गेले.

अप्पा देशमुख हे गावातले मोठे प्रस्थ. पिढ्यानपिढ्या चालत आलेली साधन शेतीची परंपरा त्यांनी यशस्वीपणे पुढे चालवली होती. पन्नास एकर बागायती शेती, त्यात तीस एकरची द्राक्षबाग यामुळे तालुक्यातील सधन शेतकऱ्यांच्या यादीत त्यांचं अव्वल स्थान पक्कं होतं. अप्पांच्या मळ्यातील द्राक्षे, भारतभर विकली जायची त्याचबरोबर निर्यातदेखील व्हायची. त्यांच्या शेतातले टम्म फुगलेले, रसरसीत द्राक्षमणी उत्तम गुणवत्तेची हमी द्यायचे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांपेक्षा त्यांना भावदेखील चांगला मिळायचा.

हे हि पहा : 

अप्पा रसिक होते. संगीत, मैफिली, मित्रांबरोबर रंगीत-संगीत पार्ट्या त्यांच्या बंगल्यावर सतत रंगायच्या. तालुक्यातील राजकारणातील वजनदार व्यक्ती, त्यांना अडचणीप्रसंगी 'कायदेशील' सल्ला देणारे त्यांचे वकील मित्र ऍडव्होकेट जोशी, फॅमिली डॉक्टर डॉ. देसाई, बँक मॅनेजर कदम साहेब यासारख्या मित्रांचा मेळा बंगल्यावरच्या पार्टीत महिन्या-दीड महिन्याला जमायचा. त्यांच्या बागेतील द्राक्षांपासून बनवलेली वाईन, हे या पार्ट्यांचं मुख्य आकर्षण असायचं. ``अहो अप्पा, तुमच्या द्राक्षांची गुणवत्ता एवढी उत्तम कशी? काय जादू करता ते आम्हालाही सांगा की राव? '' अप्पांचे मित्र त्यांना विचारायचे. त्यावर ''दोस्ता, एवढी भारीतली रासायनिक शेतीऔषधे आम्ही वापरतो, फुगवण तर येणारच, '' अप्पा उत्तरायचे. ''त्यात काही स्पेशल औषधं तर खास चीनमधून चोरीछिपे आयात होतात,  त्यांचा रिझल्ट तर अगदी स्पेशल असतो. हीच आमची सिक्रेट रेसिपी आहे'' असा डायलॉग डोळे मिचकावत अप्पा मारायचे. ''अहो, पण ही आयात होणारी रसायनं बेकायदेशीर असतात ना?' वकील साहेब 'कायदेशीर' शंका मांडायचे. यावर ''अहो वकील साहेब, कायदा कसा पाळायचा हे तुम्ही सांगताय? तुम्हाला माहित आहे, जसं आम्ही गाय, म्हैस आणि कुत्रा पाळतो, तसाच कायदादेखील पाळतो. या सर्व पाळीव प्राण्यांनी, आपल्या फायद्यासाठी काम करायला हवं,  हो का नाही?'' असं मोठमोठ्याने हसत अप्पा उत्तरायचे. पुढचा प्रश्न डॉक्टर देसाईंचा असायचा 'अप्पा, ही अप्रमाणित रसायनं, घातक असतात हो शरीराला, त्यामुळे कॅन्सर, हृदयरोग यासारखे रोग होतात. त्याचं काय? आणि आत्ता आम्हाला पाजत असलेला द्राक्षासव, रासायनिक द्राक्षांचा आहे की काय?'' यावर ''घाबरू नका डॉक्टरसाहेब, बंगल्यामागच्या एक एकरमध्ये घराच्या लोकांसाठी सेंद्रिय बाग केलीय. फळं, भाजीपाला, समदं जैविक. अगदी खताचा दानाबी टाकत नाही आम्ही इथं. तुम्हाला चंद्रशेखर गोखलेंची चारोळी माहित आहे का? असं म्हणत ती चारोळी अप्पा, शेर मारल्याच्या सुरात म्हणत- 

घराला कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं !

बाहेर कितीही बरबटलेलं असलं तरी आपलं जग ठरवता येतं !

म्हणजे आपलं तेवढं सारवून घ्यावं, कुंपणाबाहेरची चिंता कशाला करायची?'' अप्पांचं तत्वज्ञान अजब होतं. त्यांना शब्दात पकडणं मोठमोठ्या राजकारण्यांनादेखील जमायचं नाही. शेवटी हरून वकीलसाहेब म्हणायचे, ''अप्पा, तुमची सेंद्रिय वाईन पिऊन टुन्न झाल्यावर असं वाटतं की तुमची ही चारोळी जरा वेगळी हवी -

घराला कुंपण हवं म्हणजे नीट आत जात येतं,

नाहीच बायकोने घरात घेतलं तर ओट्यावरच झोपता येतं! ''

वकिलांनी चारोळीचा केलेला चुरगळा पाहून अप्पा मोठ्याने हसायचे. हसताना त्यांच्या ग्लासातील सेंद्रिय द्राक्षांची वाईन आणि घरच्या सेंद्रिय अन्नावर पोसलेली ढेरी एकाच तालात हलायची.

''... अप्पा डॉक्टरसाहेब आलेत, '' या वाक्याने त्यांची तंद्री तुटली. डॉक्टर रिपोर्ट घेऊन आले होते. ''अप्पा, चिंटूच्या पोटातील गाठी कॅन्सरच्या आहेत असं रिपोर्ट म्हणतोय. पण सुदैवाने, आगोदरच निदान झालाय. उपचारांती तो नक्की बरा होईल,'' डॉक्टरांच्या वाक्याने त्यांना भोवळ आली. पुढच्या क्षणी स्वतःला सावरत त्यांनी पुढील उपचाराची माहिती घेतली.

किती जीव होता अप्पांचा त्यांच्या नातवावर. नवसाने झालेलं पोर होतं ते. या गोड पोराने त्यांना लळा लावला होता. त्याच्या जन्माआधी दिवसभर घराबाहेर असणाऱ्या अप्पांचा पाय आता घरात टिकू लागला. सकाळ आणि संध्याकाळ चिंटूबरोबर खेळण्यात जाऊ लागली. त्याचे हट्ट पुरवणं हा अप्पांचा छंदच झाला होता. चिंटुला रत्नागिरी हापूस आंबे फार आवडायचे. दरवर्षी आंब्याच्या मोसमात, न चुकता रत्नागिरीच्या प्रसिद्ध दादा-आंबेकरांच्या रसरशीत, पिवळ्याधम्मक आंब्यांच्या रतीब अप्पांच्या बंगल्यात घातला जायचा. चिंटुचा नाश्ता, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात दादांचा आंबेकरांचा आंबा हमखास असायचा. याव्यतिरिक्त जाताaयेता चोखून, कापून खातांना आंबा, दिवसभर चिंटूच्या हातात असायचा.  चिंटुच्या शर्टवरील आमरसाचे डाग आंब्याचा मोसम सुरु असल्याची पावती देत असायचे. अशा या लाडक्या नातवाची झालेली अवस्था अप्पांना अस्वस्थ करत होती. डॉक्टरांनी चिंटुला काही दिवस ऍडमिट करून घेतले. औषधउपचार झाला. महिन्याभरात परत तपासू असं म्हणत त्याला आरामासाठी घरी सोडलं.

आता अप्पा नातवाची जास्तच काळजी घेऊ लागले. संपूर्ण दिवस त्याला काय, हवं, नको ते पाहण्यात उडून जायचा. त्यांच्या पार्ट्या आटल्या. मीटिंगला दांड्या पडू लागल्या. आंब्यांचा मोसम सुरु झाला होता. या वर्षी आपल्या लाडक्या नातवासाठी, त्याच्या आवडीचे आंबे अप्पांनी स्वतः आणायचे ठरवले. त्यांचे मित्र डॉक्टर देसाई आणि जोशी वकील यांना घेऊन त्यांच्या गाडीने रत्नागिरीच्या दिशेने प्रस्थान केले. दादा आंबेकरांना त्यांनी आगोदरच फोन करून त्यांच्या येण्याची खबर दिली होती.  दादा-आंबेकर अप्पांना ओळखायचे. एवढा मोठा द्राक्ष बागायतदार आपल्या दारी येतोय म्हटल्यावर त्यांनी फक्कड आमरसपुरीचा बेत ठेवला. अप्पांना माहित होतं की दादा आंबेकरांच्या घरी त्यांचे द्राक्षे आवडीने खाल्ली जायची. द्राक्षाचा मोसम आला की आंबेकरांच्या घरातील मुलाबाळांचा अप्पांच्या द्राक्षासाठी हट्ट सुरु व्हायचा. त्यामुळे अप्पांनी त्यांच्या उत्तम प्रतीच्या रसरशीत द्राक्षाच्या पेट्या आणल्या होत्या. जेवण झाल्यावर सुंदर रसरशीत आंब्याच्या पेट्या अप्पांच्या गाडीत ठेवल्या गेल्या. गाडीत पेट्या ठेवणाऱ्या गड्याला अप्पांनी विचारलं, 'काय रे, एवढी रसरशीत आंबे तुमच्याच बागेत कशी? ही जादू दादां आंबेकरांना कशी जमते रे? ''  यावर एका हाताने मळकट टोपी सांभाळत आणि दुसऱ्या हाताने गाडीत ठेवलेली पेटी सरळ करत गडी म्हणाला, ''अहो सायेब चीनमदून मांगवलेल्या लै भारी औषधांचा परिणाम हाय ह्यो. झाडाला एक इंजेक्सन मारलं की फळ कसं टम्म फुगतंय बगा.  पण आमचं दादा बी अजब देवमाणूस हाय बगा, एवड इंपोर्टेड प्रॉडक्ट टोचून बनवलेलं पिवळं धम्मक आंबं तेंच्या घरी कोणीबी खात नाय. तेंच्या घरी पल्याडच्या बागंतली, बिना फवाऱ्याची, बारीकबारीक, हिरवंपिवंळं आंबं खात्यात. आनं भाईरच्या लोकास्नी मोट्टं आंबं इकत्यात. माज्या टक्कूऱ्यात तं कायबी घुसत नाय बगा. ''  

गड्याचं बोलणं ऐकून तिघांना धक्का बसला. गाडीत प्रवासादरम्यान कोणीही बोलत नव्हतं. दादांच्या चेहऱ्यासमोर चिंटूला दरवर्षी खाऊ घातलेले आंबेकरांचे रसरशीत आंबे आणि आजारी चिंटुचा चेहरा तरळत होता. ही निःशब्दता तोडत डॉक्टर देसाई म्हणाले '' अप्पा, अजूनही तुम्हाला वाटतं की, आपल्यापुरतं सारवता येतं?'' 

-----------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com