कडधान्यांसाठी हवा कालबद्ध कार्यक्रम

आधीच अत्यंत कमी उत्पादकता, त्यात हमीभावही कमी, त्यामुळे कडधान्ये शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाहीत.
Pulses
PulsesAgrowon

बदलत्या हवामानाचा सर्वाधिक विपरीत परिणाम हा कमी कालावधीच्या कडधान्य पिकांवर होत आहे. गेल्या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने मूग, उडीद अशा कडधान्य पिकांचा पेरा वाढला होता. परंतु जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीने मूग, उडदाच्या शेंगा शेतकऱ्यांना तोडू दिल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या मूग, उडदाचे पीक हाती देखील लागले नाही. या वर्षी जून संपत आला तरी सर्वदूर चांगला पाऊस अजूनही नाही.

आधी थोड्याफार पावसावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर नंतर पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जूनच्या चौथ्या आठवड्यापासून आता राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत असल्याने पेरण्यांना वेग आला आहे. परंतु पेरणीस उशीर झाल्याने मूग, उडदासारखी कमी कालावधीची कडधान्य पिके घेणे बहुतांश शेतकरी टाळत आहेत.

Pulses
मूग, उडदाची लागवड का घटतेय?

राज्यात लांबलेल्या पावसाने आतापर्यंत ३५ टक्क्यांनी पेरण्या पिछाडीवर आहेत. याचा सर्वाधिक फटका मूग, उडीद या पिकांना बसला आहे. जून अखेरपर्यंत पाऊस लांबला तर मूग, उडीद ही पिके घेऊ नयेत, अशी कृषी विद्यापीठांची (Agriculture Universities)देखील शिफारस आहे. परिणामी, राज्यात मूग, उडदाचे क्षेत्र या वर्षी घटणार आहे.

खरीप हंगामात तुरीनंतरची महत्त्वाची पिके म्हणून मूग आणि उडीद या पिकांकडे पाहिले जाते. अल्प-अत्यल्प भूधारक शेतकरी जिरायती शेतीत ही पिके घेतात. मूग, उडीद ही पिके दोन-अडीच महिने अशा कमी कालावधीत येत असल्याने पीक फेरपालटासाठी महत्त्वाची मानली जातात. शिवाय ही पिके आंतरपीक म्हणूनही घेतली जातात.

कुटुंबासह देशाच्या अन्नसुरक्षेत या पिकांचे मोठे योगदान राहिले आहे. आपण कडधान्य पिकांचे पारंपरिक उत्पादक आहोत. असे असताना आजही आपल्याला २५ ते ३० टक्के डाळींची आयात करावी लागते. त्यामागची प्रमुख कारणे म्हणजे संशोधन ते विक्री-प्रक्रियेपर्यंत ही पिके दुर्लक्षित राहिली आहेत. पावसाच्या बदलत्या पॅटर्ननुसार या पिकांची वाणं विकसित झाली नाहीत, प्रगत लागवड तंत्र शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

आंतरपीक म्हणून घेतलेल्या कडधान्य पिकांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष नसते. त्यामुळे या पिकांची उत्पादकता खूपच कमी आहे. सध्या उपलब्ध वाणांची सलग लागवड करून शास्त्रशुद्ध व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केल्यास तूर, मूग, उडीदाच्या उत्पादकतेत चार ते पाच पटीने वाढ होऊ शकते. कडधान्यांच्या उत्पादकतेत आपण आपण करू शकलो तर मोठे परकीय चलन खर्च करून डाळी आयात करण्याची गरज आपल्याला पडणार नाही.

हमीभावाच्या (MSP) बाबतीत बोलायचे झाले तर मागील वर्षी कडधान्यांच्या हमीभावात प्रतिक्विंटल ५० ते ६५ रुपये, तर या वर्षी मुगाच्या हमीभावात ४८० रुपये आणि तूर, उडदाच्या हमीभावात केवळ ३०० रुपये वाढ करण्यात आली आहे. आधीच अत्यंत कमी उत्पादकता त्यात हमीभावही कमी त्यामुळे कडधान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाहीत.

ऐन हंगामात कडधान्य घेण्यास कोणीही तयार राहत नाही. कडधान्यांच्या शासकीय खरेदीतही वर्षानुवर्षे अनेक अडचणी असून त्या दूर केल्या जात नाहीत. परकीय चलन खर्च करून आयात कराव्या लागणाऱ्या कडधान्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी देशातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात नाही. उलट डाळींचे दर वाढू लागले की खुली आयात, निर्यातबंदी, साठा मर्यादा, व्यापाऱ्यांवर धाडी अशा अस्त्रांचा वापर करून दर नियंत्रणात ठेवले जातात.

थेट कडधान्य विकण्यापेक्षा शेतकऱ्यांनी डाळी, बेसन पिठे करून विकली तर त्यांना दोन पैसे अधिक मिळू शकतात. परंतु त्याबाबत एकतर शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन नाही आणि त्यासाठीच्या सेवासुविधा देखील गावपातळीवर नाहीत. कडधान्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी महाराष्‍ट्रासह देशभर संशोधन ते प्रक्रिया असा कालबद्ध कार्यक्रम राबवावा लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com