Veterinary : वेळेत बदल कुणासाठी?

पशू चिकित्सालयांच्या वेळेत बदल कुणाच्या सोयीसाठी करायचा, पशुपालक की पशुवैद्यक? याचाही विचार झाला पाहिजेत.
Animal Care
Animal CareAgrowon

पशुवैद्यकीय सेवा शुल्कात (Veterinary Service Charge) वाढ केल्यानंतर आता हा विभाग पशू चिकित्सालयाच्या (Veterinary Clinic) कामकाजाच्या वेळापत्रकात अडकला आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वीच (४ जानेवारी २०२१) राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपार ४.३० (जेवणाची सुटी १ ते १.३०) आणि शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती. त्याचवेळी पशुपालकांना अकस्मात प्रसंगी २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार, अशी तळ टीप टाकून त्याला शासन मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार त्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी देखील सुरू झाली.

परंतु आता या नव्या वेळेऐवजी पूर्वीच्याच वेळा कायम ठेवण्याची मागणी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी पशुसंवर्धन सचिवांकडे केली आहे. पशुचिकित्सालयाच्या बदलत्या वेळापत्रकाचा वर्षभरानंतर आढावा घेतला असता त्यांना कृत्रिम रेतनासह अनेक बाबतीत कमालीची घट झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पूर्वीच्याच वेळापत्रकाची मागणी केली आहे. या मागणीला पशुवैद्यक संघटना विरोध करीत असून सध्याचे वेळापत्रक पशुपालक तसेच पशुवैद्यकांसाठी देखील सोयीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विभागाच्या कामाकाजात घट हे कोरोनासह इतर सेवासुविधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झाली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Animal Care
पशु उपचार महागले

दीड वर्षांपूर्वी पशू चिकित्सालयांची वेळ ही वर्षातील दोन सत्रांत विभागलेली होती. फेब्रुवारी ते सप्टेंबर सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते ६ आणि शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १२. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी ३ ते ५ आणि शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ अशा पशुचिकित्सालयाच्या वेळा होत्या. पशुवैद्यकांच्या अनेक पिढ्या या प्रकारे कामकाज करून सेवानिवृत्त झाल्या आहेत. पशुपालकांनाही या वेळापत्रकात अडचण नव्हती. या वेळेत विभागाचे कामकाजही चांगले चालत होते.

अशा परिस्थितीत त्याचवेळी वेळापत्रकात बदल करताना आयुक्तांनी नीट आढावा घेतला नव्हता का, असा प्रश्न आता सध्याचे वेळापत्रक रद्द करून जुन्याच वेळेची मागणी करताना उपस्थित होतोय. पशू चिकित्सालयांच्या वेळेत बदल कुणाच्या सोयीसाठी करायचा, पशुपालक की पशुवैद्यक? याचाही विचार झाला पाहिजेत. राज्यात बागायती तसेच जिरायती असे दोन्ही प्रकारचे शेतकरी पशुपालन करतात. शिवाय अल्प-अत्यल्प भूधारकापासून ते मोठ्या बागायतदारापर्यंतचे शेतकरी शेती सांभाळून पशुधन पाळतात.

पशु प्रजनन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वंध्यत्व निवारण शिबीर

एवढेच नव्हे तर भूमिहीन शेतकरी, शेतमजूरही मजुरी करून दोन-चार जनावरे पाळतात. अशा सर्व शेतकऱ्यांना पशू चिकित्सालयाचे कोणतेही एक वेळापत्रक सोयीचे ठरणार नाही. कोरडवाहू शेती, अल्प-अत्यल्प भूधारक, भूमिहीन शेतमजूर यांना सध्याचे दिवसभराचे वेळापत्रक अडचणीचे ठरत आहे. कारण त्यांना शेती-पशुधन सांभाळून मजुरी देखील करावी लागते. तर बागायती शेतकऱ्यांना सध्याचे वेळापत्रक सोयीचे ठरत आहे. सध्याचे वेळापत्रक पशुवैद्यकांच्याही सोयीचे आहे. बहुतांश पशुवैद्यक शहराच्या ठिकाणी राहतात. त्यामुळे ९ वाजता जाऊन ४.३० पर्यंत ते परत येऊ शकतात. पूर्वीच्या वेळापत्रकात त्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिकित्सालयात थांबावे लागते. पशुवैद्यकीय सेवा ह्या शेतकऱ्यांच्या दारात घरपोच देण्याबाबतही शासनाचे आदेश आहेत.

सध्याच्या वेळापत्रकानुसार ९ ते ४.३० पर्यंत पशुवैद्यक दवाखान्यात थांबल्यावर घरपोच सेवा कधी देणार? असा प्रश्नही उपस्थित होतो. पूर्वीच्या वेळापत्रकात दुपारी पशुवैद्यक घरपोच सेवा देऊ शकतात. अशा प्रसंगी आयुक्तालयाने पशू चिकित्सालयाचे वेळापत्रक ठरविण्यासाठी समिती स्थापन करायला हवी. या समितीने राज्यात विभागवार सर्वेक्षण करून पशुपालक, पशुवैद्यक यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. शिवाय प्रामुख्याने पशुपालकांच्या सोयीनुसार विभागनिहाय वेगवेगळ्या वेळा देता येतील का, हेही पाहावे. असे झाले तर कोणावरही अन्याय होणार नाही, पशुसंवर्धन विभागाचे कामकाजही सुरळीत चालेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com