Climate Change : हवामान बदल अन् आपली हतबलता

सध्याच्या सर्वच विपरीत अशा घटनांचा संबंध थेट हवामान बदलाशी लावणे कितपत योग्य आहे, हेही खोलात जाऊन पाहावे लागेल.
Climate Change
Climate ChangeAgrowon

वैश्‍विक तापमान वाढीमुळे (Global Warming) हवामान बदलले (Climate Change) आहे. हवामान बदलामुळे तापमानातील अस्थिरता (Temperature Instability Due To Climate Change) वाढली आहे. अरबी समुद्रातील (Arabian Sea) चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रताही वाढली आहे. मुसळधार पावसांच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय हवामान बदलामुळे पावसाचा अंदाज वर्तविणे कठीण झाले असल्याचे मत भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. हवामान बदल (Climate Change) ही वस्तुस्थिती असल्याचे थोडावेळ मान्य केले तरी त्यावर सर्व ढकलून मोकळे होण्याऐवजी त्यानुसार संशोधन, मॉडेल विकास आणि त्यातून अचूक अंदाज अशा कृतींचे नियोजन हवामान खात्याला करावे लागणार आहे. जागतिक पातळीवरचेच हवामान बदलतेय.

Climate Change
Climate Change: कसा करायचा हवामान बदलाचा सामना ?

त्यामुळे त्याचे परिणाम शेतकऱ्यांसह देशभरातील जनतेला भोगावेच लागतील म्हणून हातावर हात धरून बसणे योग्य नाही. हवामान बदल हे एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करून त्याबाबत संशोधन, अभ्यास वाढविणे गरजेचे होते. ते या देशात झाले नाही, त्यामुळेच ‘आयएमडी’च्या संचालकांना हवामान बदलाबाबत हतबलता व्यक्त करावी लागत आहे. सध्याच्या सर्वच विपरीत अशा घटनांचा संबंध थेट हवामान बदलाशी लावणे कितपत योग्य आहे, हेही खोलात जाऊन पाहावे लागेल. ते करण्याऐवजी संशोधन संस्थांनीच त्याबाबत ‘पॉलिटिकल स्टेटमेंट्स’ देणे योग्य नाही. मॉन्सूनची निर्मिती, प्रवास ही सर्व खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याबाबत अंदाज वर्तविणे हे आव्हानात्मक काम आहे.

दूरवरील जागतिक घटकांबरोबर स्थानिक घटकांचा सुद्धा हवामान अथवा मॉन्सूनवर प्रभाव दिसून येतो. परंतु आपला संशोधन आणि अंदाजासाठीचा सर्व भर हा जागतिक घटक जसे अल निनो, ला निना यावर दिसून येतो. हे जागतिक घटक मॉन्सूनच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आहेत. परंतु केवळ त्यांच्या अभ्यास, निरीक्षणातून अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नसल्याने आता विभागनिहाय स्थानिक पातळीवरील बदलत्या घटकांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल.

Climate Change
Climate Change : हवामान बदलामुळे मुसळधार पावसाच्या घटनांत वाढ

वैश्‍विक तापमानवाढीबाबत सध्या अधिक बोलले जातेय. परंतु आपल्या राज्यातील वेधशाळांतील तापमानाच्या नोंदी पाहिल्या तर जेव्हा वैश्‍विक तापमानवाढ नव्हती त्यावेळचे वाढते तापमान पाहिले तर आपला विश्‍वास सुद्धा बसणार नाही. एप्रिल-मे मध्ये आता विभागानुसार तापमानाचा पारा ४२ ते ४८ अंश सेल्सिअस दरम्यान चढलेला दिसतो. त्याचवेळी वैश्‍विक तापमानवाढीपूर्वी म्हणजे १९१२ मध्ये चंद्रपूर ४८ अंश सेल्सिअसच्या वर, १९४७ मध्ये अकोला ४८ अंश सेल्सिअस, १९५५ मध्ये भिरा (रायगड) ४५.५ अंश सेल्सिअस, १९६७ मध्ये नगर ४४ अंश सेल्सिअस, १९८९ मध्ये जळगाव ४८.४ अंश सेल्सिअस वर तापमानाचा पारा गेल्याच्या नोंदी आहेत. १९९० पूर्वी जेव्हा वैश्‍विक तापमानवाढीचा फारसा बोलबाला नव्हता त्या काळात राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस पडला असून पूर, महापूराने थैमान घातले होते.

१९६१ दरम्यान पुण्याजवळचे पानशेत धरण हे अतिवृष्टीमुळे फुटले होते आणि त्या वेळी वैश्‍विक तापमानवाढ नव्हती. दुष्काळाच्या बाबतीतही यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही. १९४१-४२, १९५१-५२, १९७१-७२ तसेच १९८४-८५ या वैश्‍विक तापमानवाढीपूर्वी अनावृष्टीने तीव्र दुष्काळाचा सामना राज्याने केला आहे. चक्रीवादळांच्या बाबतीतही तसेच आहे. चक्रीवादळे वाढलीत असे आता म्हटले जात असताना पूर्वीही ती होतीच. विशेष म्हणजे मागील आठ महिन्यात एकही चक्रीवादळ आले नाही, हे असे का? याचाही विचार झाला पाहिजे. पूर्वीसारखाच पाऊस आताही पडतोय, तर मग नुकसान अधिक का होतेय, असे कोणी म्हणत असेल तर त्याला मानवच जबाबदार आहे. आपण आपले डोंगर, त्यातील जैव विविधता, आपल्या नद्या, एवढेच नाही तर आपले शेतं, शिवार-शहरे यांवर नको तेवढे अतिक्रमण केले आहे. नेहमीच हवामान बदल, पावसाला दोष देण्यापेक्षा निसर्गाला ओरबाडणेही आपण थांबविले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com