वसुंधरेचा पारा वाढला तर...

हवामानातील बदलामुळे पिकांमध्ये फुलधारणा व फळधारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादन कमी होऊ शकते. पीक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतीतून मिळणारा नफा कमी होऊन शेती व्यवसाय तोट्यात येऊ शकतो.
Climate change
Climate changeagrowon

हवामान बदलाचे पीक उत्पादनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतात. पहिला प्रत्यक्ष होणारा परिणाम म्हणजे पृथ्वीभोवतीच्या वातावरणात होणारा बदल. उदा. कार्बन डायऑक्साइड आणि ओझोनच्या प्रमाणात होणारा बदल. याचबरोबर मिथेन, नायट्रोजन डायऑक्साइड व क्लोरोफ्ल्यूरोकार्बन या वायूच्या प्रमाणात होणारा बदल. हवामान बदलामध्ये तापमान, पाऊस आणि आर्द्रता यामध्ये बदल संभवतात. याचबरोबर हवामान बदलातील(Climate change) विपरीत परिणाम म्हणजे समुद्र पातळीत वाढ, प्रवाहात बदल आणि चक्रीवादळे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम पिकांवर चांगला किंवा वाईट होऊ शकतो. हवामान बदलाचे परिणाम अक्षांश व रेखांशानुसार चांगले किंवा वाईट असू शकतात. थंड प्रदेशावर चांगला परिणाम तर उष्ण व वाळवंटी प्रदेशावर विपरीत प्रभाव पडू शकतो. पिकांच्या वाढीचा(Crop growth) कालावधी हा वातावरणातील तापमानावर अवलंबून असतो. तापमानात वाढ झाल्याने पिकांच्या वाढीचा वेग वाढतो. परिणामी पिकांची पेरणी ते काढणीचा कालावधी १ ते ४ आठवड्यांपर्यंत कमी होऊ शकतो. पीकवाढीचा कालावधी कमी झाल्याने त्याचा विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ शकतो.


तापमानवाढीचे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम संभवतात. दोन अंशांनी जर तापमानात वाढ झाली, तर भाताच्या उत्पादनात ०.७५ टन प्रतिहेक्टर घट होईल, तर ०.५ अंशांनी जरी तापमान वाढले, तर गहू उत्पादनात ०.४५ टन/हेक्टर एवढी घट संभवते. तापमानामध्ये एक ते दोन अंशांनी वाढ झाली, तर सोयाबीन उत्पादन ३५ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते. वातावरणात वाढत्या कार्बन डायऑक्साइडचे चांगले आणि विपरीत असे परिणाम होऊ शकतात. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्याने प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेत वाढ होऊन पीकवाढीवर चांगला परिणाम होईल. सद्यपरिस्थितीत हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ३८० पीपीएम, तर ऑक्सिजनचे प्रमाण २,१०,००० पीपीएम(PPM) असल्याने पिकांना नेहमी कार्बन डायऑक्साइडसाठी स्पर्धा करावी लागते. कार्बन डायऑक्साइड वाढीचा सी-३ पिकांवर जास्त परिणाम संभवतो, तर सी-४ पिकांवर जास्त परिणाम जाणवणार नाही. पिके पर्णरंध्रांच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साइडचे ग्रहण करीत असतात आणि पर्णरंध्रांची उघडझाप ही पिकांच्या गरजेनुसार होत असते. हवेमध्ये जर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले, पिकांना ते सहज मिळाले, तर पर्णरंध्रांची उघडझाप कमी होऊन बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. परिणामी, पानांमध्ये तयार होणारा प्राणवायू अधिक प्रमाणात साचून प्राणवायू व कार्बन डायऑक्साइडचे संतुलित प्रमाणावर परिणाम होऊन पीक उत्पादनावर विपरीत परिणाम संभवतो. सी-३ वर्गातील वनस्पतींमध्ये वाढीच्या प्रक्रियेला चालना मिळून शाकीयवाढ होऊन अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ शकते.

हवामानातील बदलामुळे उत्पादित अन्नधान्य व चारा पिकांच्या प्रतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरणातील वाढते तापमान आणि कार्बन डायऑक्साइडचा एकत्रित परिणाम म्हणजे अन्नधान्यामधील मानवी आहाराच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेल्या प्रथिने, लोह आणि झिंक या अन्नघटकांचे प्रमाण कमी होणार आहे. अभ्यासावरून असे सिद्ध झालेले आहे, की वाढत्या कार्बन डायऑक्साइडमुळे पिकांमध्ये नत्र व इतर मूलद्रव्यांची उचल कमी झाल्याने उत्पादित अन्नधान्याची पौष्टिकता कमी होऊन त्याचा परिणाम मानवी आहार, पोषण आणि आरोग्यावर होऊ शकतो. चारा पिकांमधील नत्र मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने जनावरांमध्ये प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. चाऱ्याची पचनक्रिया जठरामध्ये असणाऱ्या उपयुक्त जिवाणूंच्या संख्येवर अवलंबून असते आणि या जिवाणूंची संख्या वाढीसाठी पुरेशा प्रमाणात नत्र या मूलद्रव्याची जास्त गरज असते. नत्राचा पुरवठा कमी झाल्याने त्याचा परिणाम पचनक्रिया मंदावून वाढ खुंटणे, रोगप्रतिकारकशक्ती व प्रजनन प्रक्रियेवर होऊ शकतो.

वाढत्या तापमानामुळे जमिनीची उत्पादकता आणि उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु याचबरोबर सुपीक जमिनीत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्याने जमिनीमध्ये वाढणाऱ्या नायट्रेटमुळे मानवी आरोग्यास हानिकारक ठरू शकते. उष्ण कटिबंधात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलद होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ शकते. थंड प्रदेशामध्ये सेंद्रिय पदार्थाचे विघटन प्रक्रिया जलद होऊन वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. हवामान बदलामुळे काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढून जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊ शकते. जमिनीतील माती व पाणी यांच्या संतुलित प्रमाणात बदल होऊन जमिनीच्या गुणधर्मावर परिणाम होऊ शकतो. कोरडवाहू जमिनीत ओलावा झपाट्याने कमी होऊन पिकांना पाण्याची जास्त गरज भासेल तर दलदलीच्या प्रदेशातील जमिनी पिकाखाली आणता येऊ शकतील.
भारतामध्ये शेती व्यवसाय हा प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता पावसाचे आगमन आणि त्याचे प्रमाणात एक सारखेपणा दिसून येत नाही. शास्त्रज्ञांच्या मते पश्‍चिमेकडील समशीतोष्ण प्रदेशामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ होणार, तर मध्य भारतात पावसाचे प्रमाण २०५० पर्यंत २० ते ५० टक्के कमी होऊ शकते. पाऊसमानच नाही तर पाऊस पडण्याच्या कालावधीतही बदल संभवतो. छत्तीसगड प्रदेशात मे व जूनमध्ये होणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भात पिकांच्या लागवडी व उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. तर महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेशांत वादळीवारे आणि खारफुटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Climate change
माॅन्सूनची आज प्रगती नाही

हवामानातील बदलामुळे पावसाचा अंदाज वर्तविणे अवघड होणार आहे. काही भागांमध्ये अतिपाऊस, तर काही भागांमध्ये दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पावसाची शाश्‍वती नसल्याने शेती व्यवसायाचे नियोजन करणे अवघड होऊ शकते. तापमानात वाढ झाल्याने काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण आणि ओलाव्याचा कालावधीत वाढ झाल्याने पिकांवरील रोग व किडींच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. आर्द्रता आणि तापमान वाढ यांचा एकत्रित परिणाम म्हणजे बुरशीजन्य रोगांस अनुकूल वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढू शकतो. पिकांना मूलतः नायट्रेट नायट्रोजनचा पुरवठा वाढल्याने पिकांची शाकीय वाढ जास्त होऊन पीक लुसलुशीत झाल्याने रस शोषणाऱ्या व इतर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव आहे. वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्साइडमुळे गवताची वाढ झपाट्याने होऊन ते पिकांना हानिकारक ठरू शकतात व गवत नियंत्रणावरील खर्चातही वाढ होऊ शकते.

यापुढील काळ शेती क्षेत्रासाठी फारच महत्त्वाचा राहणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाच्या नियमांची पायमल्ली करून आपण निर्धोकपणे राहूच शकत नाही. चंगळवादाची सवय लागलेल्या मानवाने विसरता कामा नये की याच चंगळवादातून निसर्गाचा ऱ्हास होऊन सर्व काही संपू शकते. या वसुंधरेचा पारा वाढला तर या सृष्टीची उलथापालथ होण्यासाठी फारसा अवधी लागणार नाही. शेती करणारा शेतकरी आणि शेतीला बळ देणाऱ्या निसर्गाला पाठबळ दिले आणि त्याच्या रक्षणासाठी कार्यक्रम राबविला तर मानवाच्या पोषणासाठी अन्नधान्याचे उत्पादन काढण्यासाठी दोघेही सदैव तयार असतील. शेती-शेतकरी यांना योग्य सन्मान देऊन निसर्गाचे संवर्धन करून अन्नधान्य सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com