Climate Change : हवामान बदलाची चिंता अन् चिंतन

आपल्या ठरावीक ऋतूचक्रावर आधारित पारंपरिक पीक पद्धतीच्या शेतीचे बदलत्या हवामान काळात नुकसान वाढले आहे, हे मान्यच करावे लागेल.
Climate Change
Climate ChangeAgrowon

World Climate Day : आज २३ मार्च - जागतिक हवामान दिन. सध्या सर्वत्र चर्चा ही वैश्विक तापमानवाढ (Global Warming) आणि त्या आनुषंगिक हवामान बदलाची (Climate Change) आहे. महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागांतील जनता उन्हाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवतेय.

डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यानचा हिवाळा गायब झाल्यासारखेच वाटतेय. दोन वर्षांपूर्वी हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या अनेक वर्षांच्या सरासरी तारखा बदलून नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.

पावसाळ्यात कमी कालावधीत जास्त तीव्रतेच्या पावसाचे प्रमाण वाढले. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा वाढल्या. चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढून त्यांचा मॉन्सूनवर चांगलाच परिणाम जाणवतोय. हे सर्व वैश्विक तापमानवाढीचे परिणाम म्हणता येतील.

अर्थात तापमानवाढ आणि त्या आनुषंगिक हवामान बदलाने ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव येतोय. त्यामुळे आपल्या ठरावीक ऋतूचक्रावर आधारित पारंपरिक पीक पद्धतीच्या शेतीचे बदलत्या हवामानाने नुकसान वाढले आहे, हे मान्यच करावे लागेल.

Climate Change
Climate Change : शेतकऱ्यांवर ‘वादळी’चे संकट

यावर्षी तर ‘एल निनो’च्या प्रभावामुळे भारतात कमी पाऊसमान होईल, असा अंदाज अमेरिकेतील समुद्र तसेच हवामान विषयक अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने व्यक्त केला आहे.

त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरत असताना एल निनोचा भारतीय मॉन्सूनवरील परिणाम आत्ताच ठरविणे घाईचे ठरेल, असे भारतीय हवामान तज्ज्ञांनी मत व्यक्त करून थोडाफार दिलासा देण्याचे काम केले आहे.

भारतीय हवामान खाते लवकरच (एप्रिलमध्ये) यावर्षीच्या मॉन्सूनबाबत आपला पहिला अधिकृत हवामान अंदाज वर्तवेल. त्यानंतरच नेमका पाऊस कुठे, कसा पडेल हे स्पष्ट होईल.

वैश्विक तापमानवाढीची सर्वत्र चर्चा असताना आणि त्याचे भारतीय शेतीवर प्रतिकूल परिणाम जाणवत असताना त्याबाबत सखोल अभ्यास होऊन त्या आनुषंगिक शेतीचा अंगीकार व्हायलाच पाहिजेत, यात शंकाच नाही.

हवामान आणि शेती तज्ज्ञ यांच्या समन्वयातून पिकांच्या नव्या जाती, लागवड-व्यवस्थापन पद्धती शेतकऱ्यांना मिळायलाच हव्यात. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या अनुभवातून हवामान बदलास पूरक शेती कशी करता येईल, हेही पाहावे.

महत्त्वाचे म्हणजे विपरीत अशा हवामानाच्या (गारपीट, वादळी पाऊस, चक्रीवादळे, ढगफुटी) नोंदी भूतकाळात डोकावल्यास अनेक सापडतात. त्यामुळे हे आत्ताच घडत आहे, असेही काही नाही. फक्त सध्याच्या हवामान बदलाच्या काळात त्यांचे प्रमाण वाढले आहे.

Climate Change
Climate Change : मराठवाडा जात्यात तर राज्याचा इतर भाग सुपात!

वाढते औद्योगीकरण, शहरीकरण यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायुचे उत्सर्जन वाढून पूर्वीच्या काळच्या तापमानाच्या तुलनेत पृथ्वीचे आत्ताचे सरासरी तापमान १.१ अंश सेल्सिअसने वाढले आहे.

वैश्विक तापमानवाढ ही जागतिक पातळीवरील तापमानाची सरासरी आहे. त्यामुळे पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी तेवढे तापमान वाढले असेही मुळीच नाही. वातावरणात घडणाऱ्या अनेक असाधारण घटना हवामान बदलास सूचक असतात, असेही काही नाही.

अनेकदा त्यामागे स्थानिक हवामान घटक काही वेळा तर हवामानाव्यतिरिक्त इतरही काही घटक जबाबदार असतात. मॉन्सूनबाबत बोलायचे झाले तर ‘नेमेची येतो पावसाळा’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामुळे मॉन्सूनचे आगमन थोडे मागे-पुढे होईल, तो कमी-जास्त बरसेल.

परंतु तो दरवर्षी येतो आणि आपल्या स्वच्छंदी वृत्तीने मनसोक्त बरसूनही जातो. त्यामुळे एल निनो असो की ला निना त्याची फारशी चिंता करायचे कारण नाही.

यापूर्वी एल निनो प्रभावाच्या काळात देशात अनेकदा चांगला पाऊस पडला आहे आणि चांगल्या पावसाच्या काळात ते सगळे ला निनाचे वर्ष होते, असेही नाही. मॉन्सूनच्या कृपेमुळेच देशभर वैविध्यपूर्ण शेती होते. महाराष्ट्र तर शेतीत देशाच्या एक पाऊल कायम पुढेच आहे.

हे सर्व करीत असताना हवामान बदलाचे घातक परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल साधण्याचेही काम देशात झाले पाहिजेत. वृक्षतोड थांबवून कर्ब उत्सर्जनही कमी केले पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com