मशागत की शून्य मशागत?

शून्य मशागतीद्वारे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळून शेतकऱ्यांच्या गाठीशी चार पैसे शिल्लक राहू शकतात.
मशागत की शून्य मशागत?
Zero CultivationAgrowon

देशाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या व्यवसायात ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या गुंतलेली आहे. असे असताना शेतीच्या अत्यंत मूलभूत समजल्या जाणाऱ्या मशागतीबाबत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. कोणत्याही पिकाची लागवड (Sowing) करायची असेल तर जमीन खोल नांगरून (Plowing) घ्यावी, एखादी वखरपाळी द्यावी, येथूनच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सुरू होते. शेतीची मशागत (Cultivation) केली म्हणजे जमीन लागवड योग्य होते, घातक तण आणि रोग-किडींचा बंदोबस्त करण्यासाठी मशागत ही बाब आवश्यक मानली जाते. शून्य मशागत हे सुद्धा एक तंत्रज्ञान असून यातील जाणकार याचे महत्त्व वरचेवर सांगत असतात. अॅग्रोवन वऱ्हाड ग्रुपवर दोन दिवसांपासून या विषयावर चांगलीच चर्चा रंगत आहे. त्या चर्चेतून हेच स्पष्ट होते, की शेतीची मशागत की शून्य मशागत (Zero Cultivation) याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञांकडून अजूनही शेतीच्या या मूलभूत विषयाबाबत शेतकऱ्यांना ठोस प्रबोधन होत नाही.

राज्यातील बहुतांश शेतकरी पिकाच्या पेरणीपूर्वी मशागत करतातच! गंमत म्हणजे मशागत ते काढणी-मळणीपर्यंत पिकांचे उत्तम व्यवस्थापन केले तरी बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळते. त्याचे कारण मातीचे होत असलेले घनीकरण हे आहे. जमिनीची नांगरट केल्याने मातीची उलथापालथ होऊन जमिनी खराब होत आहेत. त्यात आता राज्यात यांत्रिकीकरण वाढल्याने ८० टक्क्यांहून अधिक मशागतीची कामे ट्रॅक्टरने होत आहेत. बरेच शेतकरी तर ट्रॅक्टरनेच पेरणीही करतात. ट्रॅक्टरच्या वजनाचा अतिरिक्त दाब पडून मातीचे घनीकरण होत आहे. घनीकरणामुळे मातीची रचना बदलते, मातीमध्ये हवा-पाणी जाण्यासाठीची छिद्रे कमी होतात, पिकांच्या मुळांची वाढ कमी होऊन उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटते. नैसर्गिक स्थितीत असलेल्या जमिनीची मशागत केली असता तिच्यातील कार्बनसह इतरही पोषक घटकांचे प्रमाण कमी होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. खोल मशागतीने मातीची धूप वाढत असल्याने अनेक देशांना धुळीच्या वादळांना सामोरे जावे लागत आहे. जमिनीचे घनीकरण, मातीची धूप, त्यातील कर्बाचे कमी होणारे प्रमाण हे सर्व टाळायचे असेल तर आता जगभर शून्य मशागत तंत्राचा वापर वाढत आहे.

शेतात बियाणे पेरता यावे, पिकाला पाणी देण्यासाठी सऱ्या, वाफे करता यावेत आणि तण तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता शेतकरी नांगरणी करतात. नांगरट न करता ही तिन्ही उद्दिष्टे आपण साध्य करू शकलो तर पिकांची वाढ, उत्पादनवाढ यासाठी नांगरणीची काहीही आवश्यकता नाही. आता पेरणीऐवजी टोकन पद्धतीने लागवड तंत्राचा प्रसार होतोय. कपाशीची तर सर्रासपणे टोकन केली जाते, बरेच शेतकरी सोयाबीनही टोकन पद्धतीने लावत आहेत. उन्हाळ्यात कडक झालेली जमीन पावसाच्या एक-दोन पाण्याने मऊ होते. अशा जमिनीत कोणत्याही पिकाची नांगरट न करता टोकन करता येते. टोकन पद्धतीत पेरणीपेक्षा बियाणे कमी लागते. खरिपातील बहुतांश पिकांना पाणी देण्याची गरज नाही. शिवाय ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करताना सरी, वरंबे अशा रचनेची गरज नाही. सरी, वरंब्याची रचना करण्यासाठी दरवर्षी नाही तर तीन वर्षांत एकदा मशागत करायला हरकत नाही. तण नियंत्रणासाठी तणनाशके उपलब्ध आहेत, त्यांचा समजून उमजून वापर केला तर तण नियंत्रणात राहते.

कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी खोल नांगरटीशिवाय एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीत इतर अनेक प्रभावी उपाय आहेत, त्यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. आज आपण पाहतोय मशागतीपासून ते सर्वच पीक उत्पादन खर्च खूप वाढला आहे, शेती तोट्याची ठरतेय. अशावेळी शून्य मशागतीद्वारे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळून शेतकऱ्यांच्या गाठीशी चार पैसे शिल्लक राहू शकतात. शून्य मशागत हे तंत्र सर्व प्रकारच्या जमिनींमध्ये आणि सर्वच पिकांमध्ये सुद्धा वापरता येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com