निसर्ग चंचलतेला अनुरूप शास्त्र करा विकसित

HEC - RAS नावाचे एक सॉफ्ट वेअर वापरून धुमाळांनी कृष्णा नदीचे एक मॉडेल तयार केले आहे. नदीची लांबी, रुंदी, काटछेद, उतार, नदीवरील छोटी मोठी बांधकामे आणि नदीतील प्रवाहाचा सर्व जल-शास्त्रीय तपशील त्या मॉडेलमध्ये घातला की नदीचे अॅनिमेशन दिसायला लागते.
Monsoon
MonsoonAgrowon

निसर्गाचे अगम्य, अनाकलनीय आणि गूढ स्वरूप पावसाच्या रूपात नेहमी पाहायला मिळते. पर्जन्यमानातील दोलायमानता आणि तीव्र चढ-उतारांद्वारे निसर्ग जणू आपल्याला सांगतो आहे, की मला गृहीत धरू नका. प्रथम सर्व अंदाज खोटे ठरवत जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. धरणातील जलसाठे झपाट्याने कमी होऊ लागले. पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी पाणी कपातीची भाषा सुरू झाली. आणि आता बघता बघता पूर्ण चित्र अकस्मात बदलले. इतके बदलले, की काही ठिकाणी परत पुराचा धोका निर्माण झाला. या जळासारखे चंचल दुसरे काही नाही!

महाराष्ट्रात १ जून ते ११ जुलै २०२२ या कालावधीत ३८०.८ मिमी पाऊस पडला. जो सर्वसाधारण पर्जन्यमानापेक्षा (३२१) पेक्षा १९ टक्के जास्त आहे. तर गुजरातमध्ये २८२.९ मिमी म्हणजे सर्वसाधारण पर्जन्यमानापेक्षा (१९६) ४४ टक्के जास्त पाऊस पडला. हवामान बदलामुळे किती नाट्यमय बदल होऊ शकतात याचे अजून एक उदाहरण म्हणजे छोटा उदेपूर, अहमदाबाद, पंचमहाल इत्यादी गुजरातमधील भागात १० जुलै रोजी झालेला पाऊस. छोटा उदेपूर जिल्ह्यात उणे १९ ते १०६ इतका मोठा पर्जन्यमानातील बदल फक्त २४ तासांत झाला.

Monsoon
Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

पावसाची महाराष्ट्रातील जिल्ह्यानिहाय ताजी आकडेवारी तक्त्यात दिली आहे. कंसातील आकडे नॉर्मलपेक्षा किती जास्त वा कमी पाऊस पडला हे दर्शवतात. नांदेड येथे सर्वांत जास्त तर सांगलीला सर्वांत कमी पाऊस पडला. दुष्काळी भागात पावसाने सरासरी ओलांडली!

मराठवाडा, विदर्भ : मध्य महाराष्ट्र कोकण

नांदेड (७६), औरंगाबाद (४३), लातूर (५३), परभणी (५३), बीड (५०), उस्मानाबाद (३१), जालना (१०),

हिंगोली (-९) गडचिरोली (३७), चंद्रपूर (३४), वर्धा (३३), नागपूर (२३), गोंदिया (७),

अमरावती (-१), भंडारा (-१), बुलडाणा (-४), वाशिम (-२२), अकोला (-१२), नाशिक (५८), धुळे (४०), पुणे(१४), सोलापूर (८), अहमदनगर (७), नंदुरबार (७), जळगाव (४), सातारा (-३), कोल्हापूर (-४), सांगली (-४६), पालघर (३३), सबअर्बन मुंबई (३०) सिंधुदुर्ग (२८), ठाणे (२१), रत्नागिरी (१४), रायगड (११), मुंबई (९)

पावसाच्या या अकस्मात बदलणाऱ्या स्वरूपामुळे पूर-व्यवस्थापन हे अत्यंत अवघड आणि जोखमीचे होऊन बसले आहे. धरणात पाणी साठवले तरी पंचाईत आणि पाणी सोडले तरी पंचाईत. वर्षभर विविध गरजा भागवण्यासाठी पाणी लागते म्हणून त्याचा साठा करण्यासाठी तर आपण धरणे बांधली. निसर्गाची चंचलता लक्षात घेऊन जेव्हा उपलब्ध आहे तेव्हा पाणी साठवा. धरणे लवकर भरा हे तत्त्व त्यातून आले. अनेक ठिकाणी बरीच वर्षे ते यशस्वीही होते. पण काही ठिकाणी धरण लवकर भरून ठेवले आणि अचानक पूर आला तर संकटेही येतात. धरण नक्की किती भरायचे आणि किती पाणी नेमके केव्हा सोडायचे हे अचूक ठरवणे ही अवघड बाब आहे. ते शास्त्रही आहे आणि कला ही! पण नक्की किती टक्के शास्त्र आणि किती टक्के कला, हे निश्‍चित सांगणे अशक्य असल्यामुळे पूर-व्यवस्थापन हा आज तरी एका अर्थाने जुगार आहे. या परिस्थितीत बदल करता येईल का? निसर्गाच्या चंचलतेला अनुरूप शास्त्र विकसित करता येईल का?

एकात्मिक जलाशय प्रचालन (Integrated Reservoir Operation) हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले आणि त्याची अचूकता वाढवत नेली तर वरील प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत. विज्ञानाने मार्ग दाखवला आहे! शास्त्रीयदृष्ट्या ते शक्य आहे. त्याची सामाजिक-आर्थिक बाजू आपण सांभाळू शकलो तर यश मिळू शकते. जल संपदा विभागातील मुख्य अभियंता हनुमंतराव धुमाळ यांनी या विषयावर नुकतीच पीएचडी प्राप्त केली आहे. काय केले आहे त्यांनी? त्यांच्या पीएचडी-थिसिसमध्ये तपशील उपलब्ध आहे. त्या आधारे एकात्मिक जलाशय प्रचालन हा प्रकार आहे तरी काय हे पाहूया.

HEC - RAS नावाचे एक सॉफ्ट वेअर वापरून धुमाळांनी कृष्णा नदीचे एक मॉडेल तयार केले आहे. नदीची लांबी, रुंदी, काटच्छेद, उतार, नदीवरील छोटी मोठी बांधकामे आणि नदीतील प्रवाहाचा सर्व जल-शास्त्रीय तपशील त्या मॉडेलमध्ये घातला की नदीचे अॅनिमेशन दिसायला लागते. म्हणजे नदी कशी वाहते आहे, पूर आल्यावर पाणी पातळीत किती वाढ होईल, पाणी नदीपात्राबाहेर किती व कसे पसरेल, नदीकाठच्या कोणत्या भागात पुराचे पाणी साठेल, हे सगळे दृश्यमान होते. पर्जन्यमानात बदल झाला, धरणातून सोडलेले पाणी कमी जास्त केले, नदीच्या खालच्या अंगाला असलेल्या धरणात पाणी अडवले गेले, नदीवरील बांधकामे काढून टाकली किंवा त्यात बदल केला की मॉडेल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवते.

धुमाळांनी त्या आधारे अलमट्टी धरणाचा महाराष्ट्रातील पुराशी काही संबंध नाही, पूरनियमनासाठी धरणातून सोडलेले पाणी योग्य होते, नदीचे सरळीकरण केले तर त्याचा फायदा होईल इत्यादी गोष्टी सिद्ध करण्यासाठी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की पूरनियमन करण्यासाठी कोणत्या नदीतून किती पाणी कधी सोडायचे, एकाच वेळी किती व कोण कोणत्या नद्यांतून पाणी सोडता येईल हे ही ठरवता येईल. म्हणजेच एकात्मिक जलाशय प्रचालन करता येईल. धुमाळ म्हणतात ते तात्त्विकदृष्ट्या शक्य कोटीतले आहे. व्यावहारिक अडचणी या असणारच! त्यावर मात करता येईल. एकात्मिक जलाशय प्रचालन ही काळाची गरज आहे. ते अंमलात आले तर पूर-व्यवस्थापनातील जुगार कमी होईल.

१९९० च्या दशकात माजलगाव प्रकल्पात Dynamic Regulation हा कालवा-स्वयंचलितीकरणाचा प्रयोग यशस्वी झाला होता. पण त्याचे महत्त्व तत्कालीन वरिष्ठांना समजले नाही. त्यांनी त्याची भ्रूणहत्या केली. इतिहासाची पुनरावृत्ती झाली नाही तर नवा इतिहास घडू शकतो.

(लेखक जलतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com