शेतीमाल विक्रीची बिकट वहिवाट

शेतीमालाची विक्री व्यवस्था सुधारल्याशिवाय शेतकऱ्यांचे हित साध्य होणार नाही म्हणून येत्या काळात शेतीमाल विक्री आणि प्रक्रिया याकडे कृषी आणि संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
शेतीमाल विक्रीची बिकट वहिवाट
AgricultureAgrowon

विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन घेऊनही विक्री व्यवस्था नसल्यास शेतकऱ्यांची गरिबी कदापि हटणार नाही, हे मात्र परखड सत्य आहे. शेतकऱ्याला पिकवता येते मात्र विकता येत नाही, असे आपण नेहमीच म्हणतो. शेतीमाल विक्री व्यवस्थेचे अनेक टप्पे किंवा प्रकार आपल्याकडे आहेत. मात्र प्रत्येक प्रकारात किंवा पद्धतीने वेगवेगळ्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याकडे मात्र कोणाचेही लक्ष गेलेले दिसत नाही. विकेल ते पिकेल, हे सरकारी धोरण असले तरी पिकवलेले सर्व चांगल्या दरात कसे विकले जाईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आपला शेतकरी शेतीमाल निर्यातीच्या माध्यमातून बाहेरच्या देशात, देशांतर्गत, जिल्हा अंतर्गत, स्थानिक पातळीवर, प्रक्रिया कंपनीस, कारखान्यास, विविध माध्यमांतून शेतकरी शेतीमालाची विक्री करतो. मात्र या सर्व साखळीत अनेकदा शेतकरी लुटला जातो, त्याची फसवणूक होते, त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. या प्रकारामुळे शेतकरी अडचणीत येतो त्याचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे वर्षानुवर्षांचं पिढ्यान् पिढ्याचं दारिद्र्य शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. विक्री व्यवस्थेतील या सर्व दोषांना अनेक बाबी आणि घटक जबाबदार आहे. मात्र त्यात सुधारणा करणारे कोणतीही धोरण आजवर राबवले गेले नाही. शेतीमाल उत्पादनासाठी अनेक प्रकारच्या अनुदान योजना आपल्याकडे आहेत. मात्र विक्रीसाठी सक्षम योजना आणि यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.

द्राक्ष, भाजीपाला पिके, कांदा आपल्या देशातून बऱ्यापैकी निर्यात होतो. त्यातून परकीय चलनदेखील मोठ्या प्रमाणात आपल्याला प्राप्त होते. मात्र निर्यातीची ही वाट इतकी सरळ आणि सोपी नाही. कांद्यासारख्या पिकांच्या निर्यातीच्या सरकारी धोरणांच्या हस्तक्षेपामुळे अनंत अडचणी निर्माण होत आहे. देशांतर्गत बाजारभाव कमी राहावे म्हणून निर्यात थांबवणे, करशुल्क लावणे, आयात करणे हे सर्व गलिच्छ प्रकार शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या बदलत्या धोरणामुळे अनेक व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. सरकारी धोरणातील ही अस्थिरता संपूर्ण विक्री व्यवस्थेला घातक ठरत आहे. देशांतर्गत बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने स्वतःचा पैसा खर्च करावा शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रकार थांबविला पाहिजे.

कांद्याचे दर वाढल्यास व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लावणे, इन्कम टॅक्स, ईडीची रेड पाडणे या सर्व बाबींमुळे दर कोसळतात आणि शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो. द्राक्ष निर्यात करणाऱ्या कंपन्यांसाठी सुद्धा सरकारने काही नियम अटी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे पैसे बुडणे, पैसे थकणे यासारखे प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावरून उपाययोजना होणे अपेक्षित आहे. शेतीमाल निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेला संरक्षण असणे गरजेचे आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतीमाल विक्रीचे अधिकृत ठिकाण आहे. मात्र बाजार समित्या राजकारण्यांचे अड्डे झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मालापेक्षा मतांचा घोडेबाजार तिथे मोठ्या प्रमाणात चालतो. बाजार समिती निवडणुकांमध्ये तेथे शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणे गरजेचे आहे. त्यासाठी काही नियम झाले पाहिजे. अनेक पिकांच्या विक्रीचे पैसे बाजार समितीमध्ये देखील लटकतात.

त्यासाठी बाजार समितीने शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला पाहिजे. दोन ते चार लाखांचे डिपॉझिट घेऊन लायसन्स मिळते. त्यातून मात्र करोडो रुपयांचा माल जर उधारीत घेत असतील तर बाजार समितीने व्यापाऱ्‍यांच्या डिपॉझिट रक्कममध्ये वाढ करणे गरजेचे आहे किंवा माल खरेदी अगोदरच संपूर्ण रक्कम बाजार समितीत प्रीपेड करणे आवश्यक आहे. यातून शेतकऱ्यांचे पैसे समितीने अदा करण्याचा पर्याय निघू शकतो. शेतीमालाचे वांदे पाडणे, व्यापाऱ्यांच्या वजन काट्यात तफावत असणे, अचानक बाजार भाव पाडणे, नवीन व्यापाऱ्यांना खरेदीत न उतरू देणे सर्व बाबींवर बाजार समितीने नियंत्रण ठेवणे शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

गहू, हरभरा, मका, सोयाबीन इत्यादी पिकांची हमीभावाने सरकारी खरेदी होत असते. मात्र ही व्यवस्था म्हणजे निव्वळ दिखाऊपणा आणि धूळफेक आहे. मोजक्या शेतकऱ्‍यांचा माल हमीभावात घेणे, किचकट निकष लावून शेतीमाल खरेदी टाळणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. हमीभावाच्या खरेदीत देखील रोख पेमेंटची व्यवस्था होणे अपेक्षित आहे, शिवाय खरेदी प्रक्रियेत सुलभता होणे गरजेचे आहे. उत्पादित शेतीमालाला हमीभावाइतका बाजारभाव जर मिळत नसेल तर उर्वरित रकमेचा परतावा सरकारने शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. राज्यातील विविध बाजार समितीची नियमावली, शेतीमाल पॅकिंगच्या पद्धती, आडत-हमाली च्या पद्धती त्यांचे प्रमाण, मार्केटच्या वेळा, पेमेंटचा प्रकार या सर्व बाबी एकसारख्या आणि नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे.

आठवडे बाजार किंवा लोकल मंडीत, शहरात रस्त्याच्या कडेला, थेट शहरात बऱ्यापैकी शेतकरी शेतीमाल विकतात. भाजीपाला, फळे, धान्य यांसारखी उत्पादने दैनंदिन आणि आठवडे बाजारात विकणारा शेतकरी वर्ग हा शक्यतो सामान्य गरीब आणि अल्पभूधारक असतो. बाजारात ठोक स्वरूपात माल देण्यापेक्षा किरकोळ स्वरूपात माल विकल्याने त्यांना चांगले बाजारभाव मिळतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे जागा पट्टीचे ठेकेदार शेतकऱ्यांवर अन्याय करतात. शेतकऱ्यांकडून जागा पट्टीच्या नावाखाली अनधिकृत, अवैध, बेकायदेशीररीत्या, कोणत्याही प्रकारची पावती न देता खंडणी प्रमाणे पैसे वसूल केले जातात. सर्वसाधारणपणे या प्रकारात सत्ताधारी नेते आणि ठेकेदार त्यांच्या संगनमताने हे सर्व प्रकार होताना आढळतात. अनेकदा ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना दमदाटी करणे, शेतीमाल फेकून देणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, अपमान करणे यासारखे प्रकार होतात. गरीब आणि शेतकरी असल्याने त्यांच्याकडे सहन करण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. अशा घटनांमध्ये ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची, सरकारी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची, सत्ताधाऱ्यांची पद गच्छंती करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी देखील याबाबत लेखी तक्रार करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांमध्ये एकी असणे आवश्यक आहे. शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये थेट शेतावर व्यापाऱ्यांना शेतीमाल देण्याची देखील पद्धत आपल्याकडे आहे. ही पद्धत सोपी सुलभ वाटत असली तरी त्यात बऱ्याचदा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. द्राक्ष पिकाचे दरवर्षी करोडो रुपये घेऊन व्यापारी पळून जातात. बाहेरच्या राज्यातील तसेच कोणतीही ओळख नसताना देखील लाखो रुपयांचा शेतीमाल ते खरेदी करतात. अशा व्यापाऱ्यांचे व्हेरिफिकेशन करून त्यांना लायसन देणे आवश्यक आहे. शेतीमालाचा करार करून खरेदी केल्याचे देखील फ़सवे प्रकार घडतात, यामध्ये देखील अनेकदा करार करणारी कंपनी रोपे विकून, बियाणे विकून आपला गाशा गुंडाळून पीक तसेच सोडून जाताना आढळते. याकडेही सरकारी यंत्रणेचे लक्ष देणे अपेक्षित आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com