‘मतलबी वारे’

मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला, हे जाहीर करण्यात भारतीय हवामानशास्र विभागाने घाई केल्याचा आरोप स्कायमेट या खासगी संस्थेने केला आहे.
‘मतलबी वारे’
Monsoon UpdateAgrowon

देशात यंदा मॉन्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाल्याचे जाहीर केल्यानंतर त्या पाठोपाठ यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होणार, असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसकट उद्योग व आर्थिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. मॉन्सूनच्या वाऱ्यांचा पुढचा प्रवास कसा होणार याबाबत आता उत्सुकता आहे. परंतु या दरम्यान वादाचे वादळही घोंघावू लागले आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला, हे जाहीर करण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने घाई केली; त्यांनी आपणच निश्‍चित केलेले निकष पाळले नाहीत, असा आरोप स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग ही सरकारी संस्था आहे. तिने आपण आधी जाहीर केलेल्या अंदाजाला पुष्टी मिळावी, अशा बेताने जाणूनबुजून घाई करत मॉन्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब केले, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. हवामानशास्त्र विभागाने सुरुवातीला या गंभीर आरोपाची दखलच घेतली नाही. परंतु पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी हा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळला. शास्त्रीय प्रक्रिया आणि निकषांचे पूर्ण पालन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हवामानशास्त्र विभाग आणि स्कायमेट यांच्यातील वाद इतक्यातच शमण्याची चिन्हे नाहीत. परंतु त्यानिमित्ताने काही मूलभूत मुद्दे ऐरणीवर आले आहेत. भारतासारख्या देशाचा खंडप्राय आकार आणि टोकाची भौगोलिक विविधता लक्षात घेता इथल्या हवामानाचा अंदाज बांधणे हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि कठीण काम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या आघाडीवर अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे, हे मान्यच करावे लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला या विभागावर हंगामाच्या सुरुवातीला पावसाचे अनुकूल अंदाज देण्यासाठी सरकारचा दबाव असतो, अशी चर्चा होत असते. शेतीनिविष्ठा उत्पादक कंपन्यांचे व्यावसायिक हितसंबंध, अर्थकारणातील काही क्लिष्ट गणिते, सरकारचे राजकीय हेतू, उद्योगविश्‍वातील कंपन्यांचे लागेबांधे इत्यादी कारणांमुळे हा दबाव टाकण्यात येतो, अशी चर्चा उघडपणे केली जाते. त्याच बरोबर कमोडिटी मार्केटमध्ये हवामानविषयक अंदाजांचा उपयोग करून एक प्रकारचा सट्टा खेळला जातो, असेही आरोप केले जातात.

हवामानशास्त्र विभागातील भ्रष्टाचाराची काही प्रकरणेही उघडकीस आलेली आहेत. दुसऱ्या बाजूला स्कायमेट या खासगी कंपनीवरही अनेक आरोप झालेले आहेत. तिचे हवामानाचे अंदाज चुकल्याबद्दल टीकाही झालेली आहे. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी कृषी विभागाने हवामानशास्त्र विभागाऐवजी स्कायमेटचा अंदाज प्रमाण मानून नियोजन केले आणि तोंडावर आपटण्याची वेळ आली, त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे वरवर वाटते तेवढे हे वादाचे वादळ साधे-सरळ नाही. त्यात ‘मतलबी वाऱ्यां’चा वाटा मोठा आहे. हा वादाचा आणि आरोप-प्रत्यारोपांचा चिखल चिवडण्याऐवजी मॉन्सूनचे आगमन आणि पावसाचे प्रमाण याविषयी भाकीत करताना शास्त्रीय प्रक्रियेशी छेडछाड होणार नाही, शास्त्रकाट्याच्या कसोटीचे पावित्र्य जपले जाईल, याचा कसोशीने आग्रह धरला पाहिजे.

शेतकऱ्यांसाठी हवामानविषयक अंदाजाची माहिती किती उपयुक्त ठरते, हा यातला दुसरा कळीचा मुद्दा आहे. दीर्घकालीन पावसाचा अंदाज, संपूर्ण राज्याचा किंवा मध्य महाराष्ट्र-मराठवाडा यासारख्या प्रादेशिक विभागांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी फारसा कामाचा नसतो. आपल्या तालुक्यात वा पंचक्रोशीत किंवा धरण क्षेत्रात पुढील महिना-पंधरा दिवस-आठवड्यात पावसाची स्थिती काय असेल, तापमान-आर्द्रता काय असेल याचा अंदाज कळाला तर शेतकऱ्यांना पीकपाण्याचे नियोजन करता येते. त्यावर सखोल काम व्हायला पाहिजे. हवामानविषयक संस्थांमधील आरोप-प्रत्यारोप आणि वादामध्ये या जमिनी वास्तवाकडे दुर्लक्ष होऊ नये, ही अपेक्षा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com