Pomegranate : ‘डॉलर अर्नर’कडे दुर्लक्ष नको

डाळिंब हे फळपीक हवामानास संवेदनशील असल्याने बदलत्या हवामानास अनुरूप बहर व्यवस्थापनाचे विविध पर्याय उत्पादकांना मिळायला हवेत.
Pomegranate
PomegranateAgrowon

फळबागांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शास्त्रशुद्ध बाग व्यवस्थापनात राज्यात द्राक्ष (Grape) उत्पादकांनंतर डाळिंब (Pomegranate) उत्पादकांचाच क्रमांक लागतो. बागेचे उत्तम व्यवस्थापन, भरघोस उत्पादन (Pomegranate Production) आणि देश-विदेशांतील बाजारांत मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे (Pomegranate Rate) या फळपिकाचा उल्लेख सर्वत्र ‘डॉलर अर्नर’ (Dollar Earner Crop) असा होऊ लागला. डाळिंब लागवडीने (Pomegranate Cultivation) अनेक शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी दिलेली आहे. परंतु मागील दशकभरापासून डाळिंबाचे आगार (Pomegranate Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे पीक संकटांच्या गर्तेत आहे.

Pomegranate
Pomegranate : डाळिंबाची लाली उतरली

डाळिंबावरील वाढता कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बदलत्या हवामान काळात बहर नियोजनात येत असलेल्या अडचणींमुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. मागील तीन वर्षांपासून तर अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने डाळिंब शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. २०१९ आणि २० या दोन वर्षांच्या काळात लॉकडाउनमुळे बाग व्यवस्थापनापासून ते डाळिंब विक्री-निर्यातीत मोठ्या अडचणी आल्या. लॉकडाउनचे संकट ओसरल्यानंतर मागील वर्षी मोठ्या तयारीने आणि आशेने देखील शेतकऱ्यांनी डाळिंबाचा आंबिया आणि मृग बहर धरला.

Pomegranate
Pomegranate : डाळिंबाला पावसाचे ग्रहण

सुरुवातीच्या चांगल्या पावसाने फळधारणा बऱ्यापैकी झाली. परंतु त्यानंतर सततचा पाऊस आणि वातावरणातील चढ-उताराने हे दोन्ही बहर वाया गेले. हस्त बहरात देखील अपेक्षित फूल-फळधारणा झाली नाही. या वर्षीचे चित्र तर अजून भीषण आहे. मृग बहरातील वाढत्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे हा बहर ५० टक्क्यांनी घटला आहे. डाळिंबावर मर तेलकट डाग रोग आणि शूट होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव तर आहेच, परंतु आता परतीचा पाऊस झाला नाही तरच हे पीक वाचेल, असे चित्र असल्यामुळे उत्पादकांत चिंतेचे वातावरण आहे.

डाळिंब लागवड, उत्पादन आणि निर्यातीत आपल्या राज्याने आघाडी घेतली असली तरी मागील काही वर्षांपासून संशोधन, विक्री, प्रक्रिया, निर्यात याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. त्यात बदलत्या हवामानाशी अनुरूप बहर व्यवस्थापन उत्पादकांना मिळत नाही. देशपातळीवर ५० टक्के मृग, तर २५ टक्के हस्त आणि २५ टक्के क्षेत्रावर डाळिंबाचा आंबिया बहर घेतला जातो. राज्यात मात्र ३५ टक्के क्षेत्रावर प्रत्येकी मृग आणि आंबिया तर उर्वरित ३० टक्के क्षेत्र हस्त बहराखाली असते. अशावेळी राज्यात मृग बहर ५० टक्क्यांनी घटला असेल तर त्याचे गांभीर्य आपल्या सर्वांच्या लक्षात यायला हवे. तेलकट डाग, मर रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बागा काढून टाकाव्या लागत असताना त्यांना संशोधनातून प्रभावी उपाय कधी मिळणार आहेत.

या रोगांचा बागेत प्रादुर्भाव झाल्यावर प्रभावी नियंत्रण मिळू शकत नसल्यास रोग प्रतिकारक नवीन जाती शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. अलीकडे तर रस शोषक पतंग तसेच शूट होल बोरर या किडीही घातक ठरत असताना त्यांच्यावरही परिणामकारक उपाय द्यावे लागतील. हवामान बदलाचा फटका आता सर्वच फळपिकांना बसत आहे, त्यात डाळिंब हे पीक त्यास फारच संवेदनशील असल्याने कमी-अधिक पाऊस-थंडी-उष्णतामान यामध्ये तिन्ही बहर व्यवस्थापनाचे विविध पर्याय संशोधनातून डाळिंब उत्पादकांसमोर ठेवावे लागतील. डाळिंब बागा कीड-रोगमुक्त ठेवण्यासाठी ‘क्लीन कल्टिवेशन’ महत्त्वाचे असून, त्याचा प्रसार-प्रचारही शेतकऱ्यांमध्ये झाला पाहिजेत. डाळिंब उत्पादनासाठी खर्चही वाढलेला असताना उत्पादकांना परवडणारा दर मिळाला पाहिजेत. परंतु तसे होताना दिसत नाही. डाळिंबाला किफायतशीर दर मिळवून द्यायचा असेल तर देशांतर्गत विक्री साखळी

सक्षम करावी लागेल. शीत साठवणुकीच्या सोयी देखील वाढवाव्या लागतील. शेजारील देशांबरोबर युरोपात डाळिंब निर्यातवृद्धीस चांगला वाव आहे. त्यासाठी अपेडासह केंद्र-राज्य शासनाने प्रयत्न वाढवायला पाहिजेत. डाळिंबापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ करण्याबरोबर सौंदर्य प्रसाधने तसेच औषध निर्मिती उद्योगात याचा वापर वाढवावा लागणार आहे. असे झाले तरच डाळिंबाचे डॉलर अर्नर म्हणून अस्तित्व टिकून राहील, अन्यथा नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com