World Food Day : अन्नदात्यालाही मागे सोडू नका

अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत या देशातील अन्नदाता प्रचंड मेहनतीने अन्नधान्याचे उत्पादन घेऊन जगाची भूक भागवीत असताना त्यालाही पोटभर अन्न मिळाले पाहिजे.
World Food Day
World Food DayAgrowon

काल १६ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अन्न दिन’ (World Food Day) म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. आणि याच्या एक दिवस आधीच वैश्‍विक भूक निर्देशांकात (Global Hunger Index) १२१ देशांच्या क्रमवारीत आपला देश १०७ व्या स्थानी पोहोचला आहे. मागील वर्षी या क्रमावारीत आपण १०१ व्या स्थानी होतो. अर्थात भूक निर्देशांकात आपली घसरण सुरू आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे देशात कुपोषणाचे (Malnutrition) प्रमाण सातत्याने वाढत असून अन्य देशांच्या तुलनेत हे खूपच अधिक असल्याचे दिसून येते.

World Food Day
Food Security : जगाला मिळावी शाश्वत अन्नसुरक्षा...

आजही जगभरातील लाखो लोकांना पुरेसे अन्न मिळत नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. अनेकांचा आहार सकस नसल्यामुळे त्यांचे कुपोषण होते. अशा सर्वांना पुरेसे अन् सकस आहार मिळावा, असा उदात्त हेतू हा दिवस साजरा करण्यामागचा आहे. यावर्षीची जागतिक अन्न दिनाची थीम अथवा संकल्पना ‘लीव्ह नो वन बिहाइंड’ अर्थात कोणालाही मागे सोडू नका, अशी आहे. हवामान बदलाचे संकट, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन दरम्यान मागील आठ महिन्यांपासून चालू असलेले युद्ध यामुळे जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे.

World Food Day
Soybean Rate : पावसामुळे सोयाबीन बाजाराचे चित्र बदलणार

हवामानाच्या समस्या अगदी टोकाला पोहोचल्या आहेत. या समस्यांची तीव्रता कमी केल्याशिवाय जगभरातील लोकांना अन्नसुरक्षा देता येणार नाही, असा निर्वाणीचा संदेश यंदाच्या जागतिक अन्न पुरस्कारप्राप्त महिला शास्त्रज्ञ डॉ. सिंथिया रोसेन्झविग यांनी दिला आहे. असे असताना भारत देशात मात्र हवामान बदल हा विषय अजूनही चर्चेच्या पातळीवरच आहे. हवामान बदलाचे येथील शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामाच्या अनुषंगाने ठोस असे काही होताना अजूनही दिसत नाही, ही बाब चिंताजनक आहे.

आज आपण पाहतोय, प्रतिकूल हवामानामुळे जगभरातील शेती धोक्यात आली आहे. इंग्लंड. अमेरिका तसेच युरोपातील इटली, फ्रान्ससह अनेक देश या वर्षी अभूतपूर्व अशा दुष्काळाचा सामना करीत आहेत. दुष्काळग्रस्त या देशांमध्ये अन्नधान्यांसह फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊन तेथील अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. भारतात तर मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी, महापुराचे थैमान चालू आहे.

या देशात विपरीत अशा हवामान परिस्थितीमुळे तिन्ही हंगामातील पिके वाया जात आहेत. कोरोनानंतरच्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक व्यापारही प्रचंड बदलला आहे. आपल्या देशाची अन्नसुरक्षा लक्षात घेऊन अनेक देश शेतीमाल निर्यातीबाबत हात आखडता घेत आहेत. देशातच पुरेसा साठा निर्माण करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. त्यामुळे आयात-निर्यातील मोठे फेरबदल झाले असून, त्याचाही फटका अनेक देशांना बसतोय. अलीकडे भारताने गहू आणि तुकडा तांदळाच्या निर्यातबंदीचे निर्णय अन्नसुरक्षेच्या भीतीतूनच घेतले. असेच निर्णय इतर शेतीमाल निर्यातदार देशांनी सुद्धा घेतले आहेत.

त्यामुळे अन्नसंकट तर वाढलेच, परंतु संबंधित शेतीमाल आधारित उद्योगही धोक्यात आले आहेत. मानवी जीवन जगण्यासाठी अन्न ही मूलभूत गरज आहे. सर्वांना पुरेसे अन् सकस अन्न पुरविणे ही सरकारची पण प्राथमिक जबाबदारी आहे. देशातील सर्व जनतेला दोन वेळचे पोटभर अन्न मिळालेच पाहिजे, त्यात कोणीही मागे राहू नये, हेही खरे आहे. परंतु भारत देशात अन्नदात्यावरच उपासमारीची वेळ आली आहे.

सध्याच्या अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतही या देशातील अन्नदाता प्रचंड मेहनतीने अन्नधान्यासह इतरही शेतीमालाचे उत्पादन घेऊन देशातील जनतेबरोबर निर्यातीतून जगाची भूक भागविण्याचे मोलाचे काम करतोय. अशावेळी तोही उपाशी राहिला नाही पाहिजे, जगला पाहिजे, ही काळजीही शासनाने घेतली पाहिजे. जगभरातील ९० टक्के लहान शेतकरी हे ८० टक्के अन्न उत्पादनाचा वाटा उचलतात. भारतात तर ८५ टक्के शेतकरी हे अल्प-अत्यल्प भूधारक असून, यातील बहुतांश अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. आपल्‍या देशाबरोबर जगाची अन्नसुरक्षा अबाधित राखणाऱ्या या अन्नदात्यालाही मागे सोडू नका.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com