विघ्नहर्त्याच्या सजावटीत ‘प्लॅस्टिक’चे विघ्न नको

Plastic Flowers
Plastic FlowersAgrowon

प्लॅस्टिकची फुले दिखाऊ आणि टिकाऊ असली तरी ती पर्यावरणास (Environment) हानिकारक आहेत. त्यामुळे आपल्या सजावटीला नैसर्गिकपणा देखील येत नाही. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर (Kovid-19) यावर्षी सण-उत्सव सर्वत्र धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. सण-उत्सवांवर कोणतेही बंधन नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सण-वार-उत्सवाचा हा काळ शेतकऱ्यांसाठी देखील फुले-फळे आणि इतरही शेतीमालाचा उठाव, तसेच चांगल्या दराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.

फुलशेतीचा (Flower Farming) तर हंगामच श्रावण महिन्यापासून ते दसरा-दिवाळीपर्यंत मानला जातो. या काळातच येणाऱ्या गणेशोत्सवात सजावट तसेच गणरायाला फुले वाहण्यासाठी म्हणून फुलांना मोठी मागणी असते. या वर्षी सण-उत्सवांवर बंदी नसल्याने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील आधीपासूनच नियोजन करून झेंडू, अॅस्टर, कागडा, शेवंती, निशिगंध, कमळ ही उघड्यावर येणारी तसेच ऑर्किड, जरबेरा, कार्नेशन, गुलाब ही पॉलिहाउसमध्ये येणारी फुले मोठ्या प्रमाणात बाजारात आणली आहेत.

परंतु त्याच वेळी बाजारात या सर्व फुलांच्या प्लॅस्टिक प्रतिकृतीही आलेल्या असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नैसर्गिक फुलांना मागणी कमी झाली असून त्याचा फटका दरालाही बसला आहे. प्लॅस्टिक फुलांना ना गंध असतो ना नैसर्गिकपणा, परंतु त्यांच्यात दिखाऊपणा आणि टिकाऊपणाही असतो. अशी फुले नैसर्गिक फुलांपेक्षा स्वस्तही असतात.

त्यामुळे ग्राहकांचा कल प्लॅस्टिक फुले, तोरणमाळा यांच्याकडे अधिक असल्याचे दिसते. हे असेच चालू राहिले तर आपल्या येथील फुलशेती धोक्यात येऊ शकते. प्लॅस्टिकची फुले दिखाऊ आणि टिकाऊ असली तरी ती पर्यावरणास हानिकारक आहेत. त्यामुळे आपल्या सजावटीला नैसर्गिकपणा देखील येत नाही. शिवाय देवाला फुले अर्पण करण्याचा जो भाव असतो, तो प्लॅस्टिक फुलांतून साध्य होत नाही.

सण-उत्सव आता नैसर्गिक-पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा, असे सर्वत्र बोलले जाते. त्यासाठी गणेशोत्सवात आपण ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ऐवजी शाडू मातीच्या, गोमय गणेशमुर्त्यांचा वापर वाढवीत आहोत. अशावेळी त्याच गणेशाच्या सजावटीसाठी प्लॅस्टिक फुले असो की तोरणमाळा यांचा वापर करायचाच कशासाठी? प्लॅस्टिक पर्यावरणास किती घातक आहे, याची सर्वांनाच जाण आहे. अशावेळी विघ्नहर्त्याच्या सजावटीसाठी प्लॅस्टिकचे विघ्न नकोच.

प्लॅस्टिक बंदीच्या घोषणा राज्यात अनेक वेळा झाल्या, याबाबतचे निर्णयही झाले. परंतु हे सगळे कागदावरच राहिले, हे खेदाने नमूद करावे लागते. बाजारात उपलब्ध प्लॅस्टिकची फुले तसेच बहुतांश सजावट साहित्य हे चिनी बनावटीची आहे. एकीकडे ‘आत्मनिर्भर भारत’च्या गप्पा मारायच्या त्याच वेळी दुसरीकडे आपले पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्यासाठी दुसऱ्या देशातील आपल्या येथील पर्यावरणास घातक वस्तू वापरायच्या, हे कितपत योग्य आहे, याचाही विचार झाला पाहिजेत.

आपल्या देशात शेतीमालाचे भाव वाढत असताना तत्काळ निर्यात बंदी (Export Ban) लादली जाते. आता चिनी प्लॅस्टिक फुले तसेच इतर सजावटीच्या साहित्याने देशातील शेतकरी मातीत जात असताना त्यावर आयात बंदी लादण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवायला हवे. यासाठी शेतकरी, त्यांच्या संघटना यांनी आग्रही भूमिका घेऊन केंद्र सरकारवर दबाव वाढवायला पाहिजेत. प्लॅस्टिकची फुलांची देशांतर्गत निर्मिती आणि विक्री थांबायला हवी.

प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणण्यासाठी सोशल मीडियावर ‘बॅन प्लॅस्टिक फ्लॉवर्स’ असा ट्रेंड चालविला जात आहे. या ट्रेंडची व्याप्ती वाढवायला हवी. ग्राहकांनीही सामंजस्याने विचार करून सण-उत्सवात प्लॅस्टिकचा वापर टाळायला हवा. सण-उत्सव हे आनंद, आत्मशांतीसाठी आपण साजरे करतो.

अशावेळी ते साजरे करताना कृत्रिम प्लॅस्टिकऐवजी नैसर्गिकरीत्या शेतात उत्पादित फुलांचा (Natural Flowers) वापर त्यात आपण केला तर हा आनंद नक्कीच द्विगुणित होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक फुलांचा वापर वाढला तर त्यांना मागणी वाढून दरही चांगला मिळेल. अर्थात, पारंपरिक सण-उत्सवातून आपल्या देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला तर ते चांगलेच आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com