तंत्रज्ञान अवगुण वगळता येणारे

भारताने अखेर जिनोम एडिटिंगच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. सरकारने जिनोम एडिटिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे मोठ्या प्रमाणात शिथिल केली आहेत. त्यामुळे आता या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात देखील अनेक असाध्य बाबींवर मात करता येऊ शकेल.
Dr. C. D. Mayee
Dr. C. D. MayeeAgrowon

‘जिनोम एडिटिंग’ सध्या जगामध्ये सर्वांत जास्त चर्चिलेले तंत्रज्ञान असून, या शतकातील जैव तंत्रज्ञानामधील एक पुढचे पाऊल आहे. अनेकांनी याच्या शोधाला क्रांतिकारक शोध म्हटले आहे. ज्या दोन महिला शास्त्रज्ञांनी, जेनिफर दौंडा आणि इम्यनुअल चारपेंटींअर, याचा शोध लावला त्यांना २०२० चा ‘नोबेल पुरस्कार’ देण्यात आला आहे. या क्रांतिकारक शोधामुळे अनेक असाध्य रोगावर उपाय निघू शकतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच या तंत्रज्ञानाने शास्त्रज्ञांना कल्पकतेने पिकामधील ‘डीएनए’मध्ये अचूक बदल करता येतो. त्यामुळे वनस्पतीच्या जिनोम मधील अवगुण वगळून त्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचे एकत्रीकरण करता येते. सध्या पिकांमध्ये अनेक असाध्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव पाहावयास मिळतो. तसेच हवामान बदलामुळे पिकांची आनुवंशिक क्षमता कमी होते. ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास या वर्षी मार्चच्या सुरुवातीलाच हवामानामध्ये आमूलाग्र बदल होऊन तापमान ४-५ अंश सेल्सिअसने वाढले. त्यामुळे पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश येथील गव्हाच्या पिकामध्ये दाणे भरण्याच्या वेळेस उष्णतेमुळे दाण्याचा आकार कमी झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गव्हाच्या एकंदरीत उत्पन्नामध्ये १०० लक्ष टनांनी घट येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. जिनोम एडिटिंगमुळे अशा प्रकारची दुर्बलता निर्माण करणारे जनुकच काढून टाकता येतात आणि पिकामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्य वाढविता येते.

जीएम आणि जिनोम एडिटिंग या तंत्रज्ञानामध्ये बराच फरक आहे. सर्वसामान्यांना मात्र हे दोनही सारखेच तंत्र असल्याचे वाटते. जीएमला विरोध करणारे मुख्यतः त्यापासून निर्माण होणाऱ्या पिकांचा मानव व पर्यावरण सुरक्षेबद्दल साशंक असतात. या उलट जिनोम एडिटिंगमध्ये नवीन जनुकांचा वापर न करता वाईट जनुके बाजूला करता येतात. त्यामुळे पिकांच्या नैसर्गिक संरचनेमध्ये काहीच बदल होत नाही. उदाहरणार्थ ः बीटी कापसामध्ये ‘बॅसिलस’ जिवाणूचा जनुक कापसाच्या जिनोमला जोडला जातो. परंतु जर एडिटिंग तंत्रज्ञान वापरले तर त्यामध्ये कापसाच्या जिनोममधील बोंड अळी पूरक जनुक काढून कापसाच्या जिनोमची संरचना जशीच्या तशी ठेवता येते.

नैसर्गिक संरचनेमध्ये बदल होत नसल्यामुळे अमेरिकेमध्ये या तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या पिकांना नियंत्रक आणि नियामक अटीतून मुक्त केले आहे. भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपासून शास्त्रज्ञ अशा प्रकारचे नियामक लागू न करण्यासाठी आणि ‘जीईएसी’च्या (जेनेटिक इंजिनिअरींग अप्रूव्हल कमिटी) कक्षातून मुक्तता करण्यासाठी वारंवार विनंती करत होते. अखेर भारताने या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. याचा सर्व शास्त्रज्ञांना आनंद झाला आहे. सरकारने या संदर्भात जिनोम एडिटिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे मोठ्या प्रमाणात शिथिल केली आहेत. त्यामुळे आता या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात देखील अनेक असाध्य बाबीवर मात करू शकेल. काही देशामध्ये जिनोम एडिटिंगद्वारे भाज्या, तेलबिया, तृणधान्य आणि कडधान्य यांची व्यावसायिक शेती विकसित केली आहे. सध्या जगामध्ये या तंत्रज्ञानाने विकसित केलेले हाय-ओलिक ॲसिड सोयाबीन तसेच कॅनोला (मोहरी), काळी न पडणारी अळिंबी व बटाटे बाजारात उपलब्ध आहेत. भारतामध्ये या तंत्रज्ञानाने विकसित केलेली लोहयुक्त केळी चंडीगडच्या संस्थेमध्ये परवानगीसाठी वाट पाहत आहेत. सध्या शेतीला भेडसावत असणारा हवामान बदल हा मोठा धोका आहे, हे सर्व मान्य आहे. त्यावर मात करावयाची असल्यास आपल्याला जिनोम एडिटिंग सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागणार आहे. उत्पादनात वाढ, रोग- किडी प्रतिकारक वाण तसेच पोषणयुक्त, निर्यातक्षम पिके तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना आता हे तंत्र भारतात वापरता येईल.

आयसीएआर (भारतीय कृषी संशोधन संस्था), विद्यापीठे, भारत सरकारचे जैवतंत्रज्ञान विभाग यांनी सुधारित पीक पद्धतीसाठी जिनोम संपादनाचा वापर करून नुकतेच मोठे कार्यक्रम हाती घेतले आहेत. ‘डीबीटी’ने (डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी)...... ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ स्थापन करण्याचा आणि जिनोम संपादनाद्वारे चांगल्या पीक वाणांसाठी कार्यक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. २००६ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने डॉ आर. ए. माशेलकर यांच्या अध्यक्षतेत एक निर्णय घेतला होता आणि आर-डीएनए...... फार्मा उत्पादनांना जीएमओ नियमन यंत्रणेच्या कक्षेबाहेर केले होते. या उत्पादनांचे नियमन आता भारताच्या औषधी महानियंत्रकाद्वारे केले जाते. यांचा परिणाम असा झाला, की आज आपल्याला आर-डीएनए एम-आरएनए..... तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेली लस कोरोनासारख्या साथीच्या रोगाशी लढण्यासाठी योग्य वेळी मिळू शकली.

जिनोम संपादित पिकांवर केंद्राकडून मिळालेली बहुप्रतीक्षित सूट लक्षात घेता, भारत सरकारच्‍या पर्यावरण मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि जैव तंत्रज्ञान विभाग एकमेकांशी सल्लामसलत करून, ईपीए (इन्व्हायर्न्मेंट प्रोटेक्शन एजन्सी)..... नियम १९८९ अंतर्गत जिनोम संपादित पिकांवरील मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित करू शकतील जेणेकरून कृषी शास्त्रात वेगाने होत असलेले बदल छोट्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतील. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘जिनोम एडिटिंग’ तंत्रज्ञानाचा लाभ केवळ शेतकरी आणि देशाच्या कल्याणासाठी होईल, याबद्दल शास्त्रज्ञ खात्रीलायकरीत्या सांगू शकतील. भारतामधील अनेक सक्षम संस्था जनुकीय संपादनाच्या संशोधनावर मोठ्या प्रमाणात काम करून पिकाचा विकास करतील याबद्दल खात्री वाटते.

काळानुरूप प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतात. कृषी क्षेत्रात देखील ते होत आहेत. याचाच परिणाम म्हणून एकेकाळी अन्नधान्याचा तुटवडा असलेला भारत आज अन्नधान्याची निर्यात करतो आहे. वेळेत उपयोगी बदलांची गरज ओळखल्याने आणि त्याचा अवलंब केल्याने विकासाचा मार्ग प्रशस्त होत असतो. आता अशा तंत्रज्ञानाने देशाला खाद्यतेल आणि डाळवर्गीय पिकांमध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. अन्नधान्याच्या बाबतीत खरी आत्मनिर्भरता लवकरच जगाला पाहायला मिळणार आहे.

(लेखक कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com