मॉन्सूनची हुलकावणी

या वर्षी मॉन्सूनच्या चांगल्या पावसाबरोबर लवकर आगमनाचा देखील अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मॉन्सूनचे आगमन आणि वाटचालदेखील फारच धीम्या गतीने सुरू आहे.
Monsoon
MonsoonAgrowon

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपण वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण, मुंबईसह पुण्यात वेळेवर मॉन्सून आणून पोहोचविला आहे. पुण्यात १० जूनला मॉन्सून दाखल होतो. या वेळी आयएमडीनुसार तो ११ जूनला पुण्यात आलेला असून, एका दिवसातच म्हणजे १२ जूनपर्यंत मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र व्यापलेला देखील असेल असेही स्पष्ट केले आहे.

त्याचवेळी कृषी विभागासह आयएमडीनेच उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १७ ते २३ जूनदरम्यान पाऊस कमी असून, या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा इशाराही आता दिला आहे. अर्थात, एकीकडे आपणच वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मॉन्सूनचे वाटचाल सुरू असलेल्याचे दाखवायचे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोपवायचेही, असे आयएमडीचे दुटप्पी वर्तन चालू आहे.

आयएमडीने तांत्रिकदृष्ट्या नियमात बसवून मॉन्सूनला आणले असले तरी शेतकऱ्यांना मात्र नकाशावर मॉन्सूनची रेख कुठे पोहोचली याच्याशी काही देणेघेणे नसते त्यांना पेरणीसाठी चांगला पाऊस पाहिजे असतो. खरे तर मॉन्सून केरळसह मुंबई, पुण्यात दाखल झाल्याचे आयएमडी सांगत असले तरी आता जूनचा पहिला पंधरवाडा संपत आला असताना मॉन्सूनचा चांगला पाऊस कुठेच पडताना दिसत नाही. मॉन्सूनचा पाऊस सर्वव्यापी आणि रिमझिम स्वरूपाचा असतो.

सध्या राज्याच्या बऱ्याच भागात तुटक स्वरूपात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडतोय. मॉन्सूनचे एकंदरीत वातावरण राज्यात सध्यातरी कुठे दिसत नाही. आयएमडी ठोस अन् अचूक अंदाज देत नाही. त्यातच राज्यात तथाकथित हवामान तज्ज्ञांचा सुळसुळाट झाला असून, त्यांच्या उलटसुलट अंदाजाने शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.

आयएमडीने या वर्षीच्या मॉन्सूनबाबत पहिला दीर्घकालीन अंदाजात देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आपल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात आयएमडीने देशात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडेल असेही सांगितले. चांगल्या पाऊसमानाबरोबर या वर्षी मॉन्सूनचे आगमन लवकरच होईल, असाही आयएमडीचा अंदाज होता.

गतवर्षीपेक्षा या वर्षी केरळात मॉन्सूनचे आगमन पाच दिवस आधीच होणार, असे आयएमडीने स्पष्ट केल्यावर राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी सुखावला होता. प्रत्यक्षात मात्र या वर्षी मॉन्सूनचे आगमन आणि वाटचालदेखील फारच धीम्या गतीने सुरू आहे. गेल्या वर्षी तसा मॉन्सून पाहावयास मिळाला. गेल्या वर्षी राज्यात मॉन्सून दाखल झाल्याबरोबर त्याने दोनच दिवसांत राज्य व्यापले होते. तसे चित्र या वर्षी अजिबात दिसत नाही.

अजूनपर्यंत केरळातच पुरेसा पाऊस झाला नाही. या सर्व परिस्थितीचा शेतकऱ्यांनी सारासारा विचार करून पेरणीसाठी थांबायला पाहिजेत. आधीच बी-बियाणे, खते यांचे दर प्रचंड वाढल्याने दुबार पेरणी कोणत्याही शेतकऱ्याला परवडणारी नाही. सर्वसामान्यपणे बहुतांश शेतकरी पेरणीसाठी पुरेसा पाऊस होऊ देतात.

ओल चांगली खोल गेल्यावरच पेरणी करतात. शास्त्रीय भाषेत यालाच ७० ते १०० मिलिमीटर पाऊस, असे म्हटले जाते. जमिनीत पुरेशी ओल झाली तरी पेरणी केल्यानंतर बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी एक-दोन दिवसांत पाऊस झाला पाहिजेत. तसे झाले नाही तर उगवण चांगली होत नाही. राज्याच्या बऱ्याच भागांत २३ जूनपर्यंत पाऊस पडणार नाही अथवा कमी पडणार म्हणजे जूनचे जवळपास चार आठवडे कोरडे जाणार आहेत.

खरिपातील बहुतांश पिकांची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येत असल्याची शिफारस असली, तरी १० जूननंतर पेरणीला जसजसा उशीर होत जाईल, तसतसे उत्पादन घटते. त्यामुळे उशिरा पेरण्या झाल्या आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत मॉन्सून अंदाजानुसार अधिक प्रमाणात बरसला तरी तो नुकसानकारकच ठरेल. या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी आणि शासन यांनी पुढील नियोजन करायला हवे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com