ग्रहण फळगळीचे!

मोसंबीमध्ये सुरुवातीची फळे लहान असतानाची फळगळ काही प्रमाणात नैसर्गिक असली तरी पक्व फळांची गळ मात्र शेतकऱ्यांसाठी थेट नुकसानकारक ठरते.
Mosambi
Mosambi Agrowon

मराठवाड्याच्या दुष्काळी भागात केसर आंब्यापाठोपाठ (Kesar Mango) रुजलेले दुसरे महत्त्वाचे फळपीक म्हणजे मोसंबी! (Mosambi) मागील दोन दशकांपासून राज्यात खासकरून मराठवाड्यात मोसंबीची लागवड (Mosambi cultivation) वाढत आहे. संत्रा फळपिकांमध्ये नवीन वाणांची वानवा, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, बहर नियोजन-व्यवस्थापनातील अडचणी, फळगळीची (Fruit Fall In Orance) मोठी समस्या, कमी उत्पादकता, वाहतूक-विक्री-निर्यात-प्रक्रिया अशा सर्वच पातळ्यांवर समस्यांचा डोंगर पाहता विदर्भातील संत्रा पट्ट्यातही शेतकऱ्यांचा कल मोसंबी लागवडीकडे असल्याचे दिसून येते. मोसंबी फळपिकाला शेतकऱ्यांच्या पसंतीचे कारण म्हणजे कोरोना आणि त्यानंतरच्या काळात व्हिटॅमिन सी करिता मोसंबीला मागणी वाढून दरही बऱ्यापैकी मिळतोय.

Mosambi
Mosambi : कृषिकन्यांकडून मोसंबी बाग आराखड्याचे प्रात्यक्षिक

याचबरोबर निश्चित फळधारणा अन् फळगळ कमी म्हणून देखील मराठवाड्यासह राज्यात मोसंबी खालील क्षेत्र वाढत आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून मोसंबीला देखील फळगळीचे ग्रहण लागलेले असून ते सुटण्याचे नाव घेत नाही. मागील वर्षी (२०२१) प्रतिकूल हवामानामुळे मोसंबीचा कोणताच बहर शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मृग बहराची फळे काढणीच्या वेळी कोरोना लॉकडाउनमुळे उत्पादकांना मोसंबी फळे विक्री करता आली नाहीत. तर आंबिया बहराच्या उत्पादनात फळगळीने २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट आली. यावर्षी तर आंबिया बहराची गेल्यावर्षी पेक्षा अधिक भीषण परिस्थिती असल्याचे दिसून येते. प्रतिकूल हवामानामुळे आंबिया बहरामध्ये प्रथमतः फळ सेटिंग कमी झाले. त्यानंतर गुंडीगळ (लहान फळांची गळ) ६० ते ७० टक्क्यांपर्यंत झाली. अन् आता मोठी फळे सुद्धा गळत आहेत. काही भागात ही फळगळ २० टक्क्यांपर्यंत असल्याने यावर्षी देखील मोसंबी बागेतून हाती काही लागेल की नाही, अशी चिंता अनेक उत्पादकांना लागलेली आहे.

Mosambi
Mosambi : आधी गुंडीगळ, आता फळगळ

मोसंबीमध्ये सुरुवातीची फळे लहान असतानाची फळगळ काही प्रमाणात नैसर्गिक असली तरी पक्व फळांची गळ मात्र शेतकऱ्यांसाठी थेट नुकसानकारक ठरते. फळगळीची कारणे अन्नद्रव्याची कमतरता, संजिवकांचे असंतुलन, रोग-किडींचा प्रादुर्भाव, बागेला अति किंवा कमी पाणी पुरवठा अशा व्यवस्थापनातील त्रुटींबरोबर अलीकडे तापमानातील चढ-उतार, वादळे, अतिवृष्टी, अनावृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे सुद्धा फळगळीचे प्रमाण वाढले आहे. यातील महत्त्वाची अडचण म्हणजे शेतकऱ्यांना नेमकी फळगळ कशामुळे होते, हे कळत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपाययोजना न झाल्यामुळे फळगळ वाढून शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशावेळी कृषी विद्यापीठे तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने वेळोवेळी होणाऱ्या फळगळींच्या नेमक्या कारणांचा शोध घेऊन त्यांना प्रभावी उपाय सांगायला हवेत. संत्रा-मोसंबीप्रमाणे बहुतांश फळांमध्ये आता हवामान बदलामुळे बहर नियोजन फारच जिकिरीचे ठरतेय. अशावेळी बदलत्या हवामानानुसार फळनिहाय बहर व्यवस्थापनात देखील काही बदल करता येतील का, हे यातील तज्ञांनी पाहावे.

नवीन वाण, प्रगत लागवड तंत्र, शास्त्रशुद्ध बाग व्यवस्थापन याबाबत संशोधनापासून ते काढणीपश्‍चात व्यवस्थापन आणि प्रक्रिया अशा पातळ्यांवर सर्वच लिंबूवर्गीय फळपिके राज्यात दुर्लक्षित राहिली आहेत. त्यात मोसंबी हे फळपिक सर्वाधिक दुर्लक्षित राहिले आहे. मोसंबी लागवडीसाठी न्युसेलर, सातगुडी याबरोबर काही स्थानिक वाणांची लागवड होते. ही सगळी वाणं कीड-रोगांना अधिक बळी पडतात. या वाणांचा रस काढल्याबरोबर लगेच प्यावा लागतो. नाही तर कडवट होऊन खराब होतो. त्यामुळे मोसंबीचे फळ ताजे खाण्यापासून ते गाड्यावर काढून मिळणाऱ्या रसापलीकडे कधी गेले नाही. ब्राझील, इस्राईलसारखे देश प्रक्रियेसाठी मोसंबीची वाण विकसित करून शेतकऱ्यांना देत असताना आपल्याकडे मात्र अशी वाणं शेतकऱ्यांना मिळत नाहीत. इस्राईलने घन-सघन पद्धतीने मोसंबीची लागवड करून उत्पादकता वाढ साधली आहे. आपल्याकडे मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच मोसंबीची लागवड केली जाते. फळपिकांचा क्लस्टरनिहाय विकास, असे सरकारचे धोरण राहिले आहे. अशाच क्लस्टरद्वारे मोसंबीचे शाश्वत उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री-निर्यात असा सर्वांगांनी विकास व्हायला हवा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com